Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दर्जेदार शिक्षणासाठी..

 

अभ्यासक्रम, तो पूर्ण करण्याची प्रक्रिया, त्यासाठी योजलेली अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन किंवा परीक्षा हे कोणत्याही शिक्षण पद्धतीतील महत्वाचे चार स्तंभ आहेत. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रबिंदू असून त्याच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाबरोबर व्यापक अशा समाजाच्या सर्वागीण विकासाची अपेक्षा त्यात गृहित आहे. व्यक्ती आणि पर्यायाने समाजविकास गतीमान राहण्यासाठी कोणत्याही अभ्यासक्रमाची व्यापक उद्दीष्टय़े त्या त्या विद्याशाखांतील अभ्यास मंडळांनी निश्चित केलेली असतात. विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठे आणि राज्याची शिक्षणमंडळे यांची उच्च शिक्षणाची धोरणे त्यादृष्टीने मार्गदर्शक ठरतात. दर्जेदार शिक्षणासाठी अनेक उपाय योजले जातात. त्यात परीक्षा पध्दतीत सुधारणांची अधिक गरज आहे. त्याविषयी माहिती देणारा लेख.
अभ्यासक्रमाला पूरक असे काही शैक्षणिक उपक्रम केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम अधिक व्यापक आणि व्यक्तीला स्वयंपूर्ण बनण्यासाठी शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे सतत कार्यरत असतात. त्यातूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यातून निरंतर जीवनशिक्षणाची प्रक्रिया राबविणे, परस्परपूरक आणि परस्पराश्रयी असे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांना देणे, जीवनमूल्यांवर आधारित शैक्षणिक उपक्रम शिक्षणात आणणे, स्थानिक गरजेनुसार आणि जागतिकीकरणाकडे नेणारी शैक्षणिक उद्दीष्टय़े नजरेसमोर ठेवून विद्यार्थ्यांचा विकास साधणे, आजच्या खासगीकरण, उदारीकरण, व्यापारीकरणाच्या युगाशी निगडित माहिती तंत्रज्ञानाची दर्जेदार शिक्षण-प्रणाली राबविणे यासारख्या अनेक व्यापक शैक्षणिक हेतुंना अभ्यासक्रमात स्थान मिळत आहे. नव्हे ती काळाची गरज आहे.
व्यापक शैक्षणिक उद्दिष्टय़े साध्य करण्यासाठी पारंपरिक वर्गशिक्षण पद्धती आता काहीशी मागे पडू लागली आहे. मात्र ती त्याज्य नाही. प्रात्यक्षिक, क्षेत्रीय अभ्यास, अत्याधुनिक अशा वैज्ञानिक, शैक्षणिक उपक्रमांचा वापर, प्रकल्प अहवाल, शोध निबंध, स्वयं अध्ययन आणि संवाद कौशल्ये इत्यादी अंगांना अध्यापन पद्धतीत आज अधिक स्थान मिळू लागले आहे. जागतिक स्पर्धेत ज्ञानाचा प्रस्फोट होत असताना विद्यार्थ्यांना वरीलप्रमाणे साधनांच्या सहाय्याने गतीमान करण्यासाठी शिक्षकांनाही आपली पारंपरिक अध्यापन पद्धती अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जात आहे.
‘नॅक’ने देखील अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन यात चांगल्या चांगल्या पद्धतींचा आणि उपक्रमांचा स्वीकार करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘नॅक’च्या पाहणीनुसार तसा स्वीकार अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांनी केलेला असल्याचे ‘नॅक’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. १) यात विहीत वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या योजना, विशिष्ट संख्येचा विद्यार्थी गट एकेका शिक्षकाकडे सुपूर्द करणे आणि त्यांच्याकडे अधिक लक्ष देऊन त्यांचा अभ्यासक्रम समाधानकारक पूर्ण करून घेणे, अशा विद्यार्थ्यांच्या गटाकडून विशिष्ट प्रकल्प पूर्ण करून घेणे, भाषाविषयक प्रयोगशाळांचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर करणे आणि विषय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांची श्रवण कौशल्य आणि संवाद कौशल्य वाढविणे, त्यासाठी सीडी प्लेअर, ओएचपी, ध्वनिमुद्रिका इत्यादी साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्याची प्रक्रिया आज सर्वत्र जोरात सुरू आहे. यात सैद्धांतिक अभ्यासक्रमाबरोबरच प्रात्यक्षिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची प्रक्रिया अपेक्षित आहे.
मूल्यमापन किंवा परीक्षा पद्धतीची प्रक्रिया : शैक्षणिक गुणवत्तेसाठी पारंपरिक किंवा काळाशी निगडित अशा बदलत्या अभ्यासक्रमाच्या उद्दीष्टय़पूर्तीसाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी परीक्षा हेच माध्यम परंपरागत स्वरुपात योजले जाते. या परीक्षा पद्धतीत लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, मौखिक परीक्षा अशा पद्धती आजही सर्वच विद्यापीठात उपयोजल्या आहेत. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात आणि विषयाच्या ज्ञानात कितपत भर पडली, याचेच मूल्यमापन करणे येथे प्रमुख कार्य आहे. पुन्हा येथे विद्यार्थ्यांचा परिसर, अध्यापक, त्याची अध्यापन पद्धती, शैक्षणिक संस्थेचे भौतिक आणि शैक्षणिक वातावरण या घटकांचाही त्याच्या मूल्यमापनाशी कळत नकळत संबंध येतो.
शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करताना समाजातील समानता, त्यातून आलेली संख्यात्मकता आणि त्या संख्येची गुणवत्ता राखणे हे भारतासारख्या विकसनशील देशात अवघड आहे. वेळोवेळी आखलेल्या शैक्षणिक धोरणात शिक्षणात सुधारणा करण्याच्या बाबींवर भर देण्यात आलेला आहे. शासनाचा शैक्षणिक विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगानेही अभ्यासक्रमाची गुणवत्ता, शिक्षकांची किमान पात्रता याबाबत वेळोवेळी नियमावली तयार करून शैक्षणिक गुणवत्तेशी तडजोड होणार नाही, अशीच भूमिका घेतलेली दिसते. त्यातून सार्वजनिक परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षांचे निकाल नेहमी समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्थिती प्रगत करण्यास मदत करतील, असे गृहीत धरले आहे. तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेतही तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा पद्धती अवलंबलेली आहे.
या परीक्षा पद्धतीतून शैक्षणिक गुणवत्ता वाढ होते काय, हा खरा प्रश्न आहे. आपला अनुभव सांगतो की, या पारंपरिक परीक्षा पद्धतीत अनेक दोष आहेत. एकतर काही वार्षिक परीक्षा या स्मरणशक्तीवर आधारित आहेत. ‘घोका आणि ओका’ या पद्धतीमुळे वर्षभर अभ्यास न करता शेवटी शेवटी अभ्यास करणारे विद्यार्थी आणि सतत अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्या गुणवत्तेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तांत्रिक प्रश्नपत्रिकांमुळे अभ्यासक्रमाची पुस्तके, संदर्भग्रंथ यांच्या वापराऐवजी बाजारातील अपेक्षित उत्तरांची पुस्तके वापरताना काही विद्यार्थी आढळून येतात. त्यामुळे त्यांच्या उत्तरांत मूलभूत मुख्य भाग येत नाही. तसेच याप्रकारे उत्तीर्ण झालेला विद्यार्थी बाहेरच्या स्पर्धेत कमी पडतो. त्याला काही अपवाद असतात. पण परिणामी गुणवत्तायुक्त विद्यार्थी फारच थोडे बाहेर पडतात. काहीवेळा उत्कृष्ट निकाल ही देखील एक सूज असते, असे लक्षात येते. तसेच अंतर्गत मूल्यमापन सतत होत असल्याने विद्यार्थी त्यात अडकून पडतो, आणि अवांतर वाचन करीत नाही. त्यामुळे त्याच्या व्यापक ज्ञानाला आणि व्यक्तीमत्व विकासाला मर्यादा पडतात.
(क्रमश:)
प्राचार्य डॉ. पी. एस. पवार
समन्वयक, पुणे विद्यापीठ, विभागीय कार्यालय, नाशिक