Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सेना, मनसे पाठोपाठ राष्ट्रवादीचेही शक्तिप्रदर्शन
नाशिक / प्रतिनिधी

 

रणरणत्या उन्हात मोठय़ा संख्येने लोटलेले कार्यकर्ते, महिलांची लक्षणिय उपस्थिती, उपमुख्यमंत्र्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग अशा वातावरणात बुधवारी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी व आरपीआय मित्र पक्ष आघाडीचे नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार समीर भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नरहरी झिरवाळ यांनी आपली नामांकन पत्रे दाखल केली. आदल्या दिवशी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी शोभायात्रेच्या माध्यमातून केलेल्या शक्ती प्रदर्शनाला जोरदार शह देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
शोभायात्रेचे स्वरूप भव्य-दिव्य राहील याची दक्षता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या या दोन्ही जागांची नामांकन पत्रे दाखल करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील जातीने उपस्थित होते. प्रारंभी सकाळी साडे दहाच्या सुमारास पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव आदींच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस शहर कार्यालयात समीर भुजबळ यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी रोडवरील या कार्यालयापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. समीर भुजबळ व नरहरी झिरवाळ या दोन्ही उमेदवारासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची नेतेमंडळी मतदारांना अभिवादन करीत होती. उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री भुजबळ यांनी शोभायात्रेच्या अग्रभागी राहून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. बच्छाव, मावळते खासदार देवीदास पिंगळे, आ. डॉ. वसंत पवार, आ. जयप्रकाश छाजेड, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, आ. दिलीप बनकर, माजीमंत्री विनायकदादा पाटील, माजी महापौर दशरथ पाटील, माजी खासदार प्रतापराव वाघ, स्थायी समितीचे सभापती संजय चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, आरपीआयचे दादाभाऊ निकम, मुरलीधर पाटील यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत महिला व तरूणांची संख्याही लक्षणिय होती.
ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्थानिक पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. महात्मा गांधीरोडवरून निघालेली शोभायात्रा अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली परिसरमार्गे शालीमार, सीबीएसहून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. येथील शिवाजी स्टेडिअम मैदानावर शोभायात्रेचे जाहीर सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी बोलताना समीर यांनी रणरणत्या उन्ह्य़ात शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी झाल्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानले. नाशिकचा विकास हा मुद्दा घेवून काँग्रेस आघाडी लोकसभा निवडणुकीला सामोरी जात आहे. नाशिकला जगाच्या नकाशावर घेवून जाण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. पक्षाने आपल्याला उमेदवारी देवून तरूणांना पुढे आणण्याचे धोरण ठेवले असल्याचे ते म्हणाले. झिरवाळ यांनी केंद्र व राज्य सरकारची कामगिरी सर्वाना चांगली माहिती असल्याचे स्पष्ट केले. सर्वसामान्यांना न्याय देण्याची काँग्रेस आघाडीची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बच्छाव यांचेही यावेळी भाषण झाले. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली असून कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. प्रकाश लोंढे यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर टीकास्त्र सोडले. सभेचे सूत्रसंचालन आ. हेमंत टकले यांनी केले.