Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे रडगाणे सुरूच
वृत्तान्त चमू / नाशिक, धुळे

रेल्वेमार्ग म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नसून विकासाचाही मार्ग आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवलीच नाही. याचा अनुभव मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वेमार्गाच्या बाबतीत सर्वाना घ्यावा लागत आहे. एखाद्या पक्षाचा अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रातील एकाही खासदाराने हा प्रश्न लावून धरला नाही. अलिकडेच या प्रश्नी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी त्या दृष्टीकोनातून अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू झाल्याचे दिसत नाही. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची क्षमता असलेल्या या रेल्वेमार्गाची मागणी थोडीथोडकी नव्हे तर शंभर वर्षांपासून स्थानिक जनता करीत आहे.

लोकप्रतिनिधींचे सहकारी पतसंस्थांच्या बिकट अवस्थेकडे दुर्लक्ष
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ात ९५० नागरी सहकारी पतसंस्थांपैकी ९० टक्के संस्था सद्यस्थितीत कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंद पडल्या असून नियमांचे पालन न करणाऱ्या या पतसंस्थांकडे हजारो ठेवीदार आपल्याच पैशांसाठी दयायाचना करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या कल्याणाच्या गप्पा करणाऱ्या कोणत्याच लोकप्रतिनिधींनी या अनागोंदीविरोधात ब्र काढलेला नाही हे विशेष.

वनबंधू परिषदेतर्फे शनिवारी हनुमान चालीसा महापठण
प्रतिनिधी / नाशिक

येथील वनबंधू परिषदेच्यावतीने येत्या शनिवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत सव्वा कोटी हनुमान चालीसा महापाठ या प्रकल्पाअंतर्गत ५०० हून अधिक साधकांच्या सामुहीक हनुमान चालीसा महापाठाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, नेमीचंद पोद्दार आणि सुनिल चांडक यांनी दिली.

दिंडोरीत रूसवे फुगवे सुरूच
नाशिक / प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नरहरी झिरवाळ व माकपचे उमेदवार जीवा पांडु गावित यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघातील तिन्ही प्रमुख पक्षांमधील प्रचार रंगतदार उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी..
अभ्यासक्रम, तो पूर्ण करण्याची प्रक्रिया, त्यासाठी योजलेली अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन किंवा परीक्षा हे कोणत्याही शिक्षण पद्धतीतील महत्वाचे चार स्तंभ आहेत. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रबिंदू असून त्याच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाबरोबर व्यापक अशा समाजाच्या सर्वागीण विकासाची अपेक्षा त्यात गृहित आहे.

सेना, मनसे पाठोपाठ राष्ट्रवादीचेही शक्तिप्रदर्शन
नाशिक / प्रतिनिधी

रणरणत्या उन्हात मोठय़ा संख्येने लोटलेले कार्यकर्ते, महिलांची लक्षणिय उपस्थिती, उपमुख्यमंत्र्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग अशा वातावरणात बुधवारी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी व आरपीआय मित्र पक्ष आघाडीचे नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार समीर भुजबळ आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नरहरी झिरवाळ यांनी आपली नामांकन पत्रे दाखल केली. आदल्या दिवशी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी शोभायात्रेच्या माध्यमातून केलेल्या शक्ती प्रदर्शनाला जोरदार शह देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

महावीर फार्मसी महाविद्यालयात तणाव व्यवस्थापनावर व्याख्यान
नाशिक / प्रतिनिधी

किशोरवयीन विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच बदलत्या वयोवस्थेमुळे विविध ताणतणावांचा सामना करावा लागतो. झपाटय़ाने बदलणाऱ्या जीवनशैलीमध्ये हे अपरिहार्य आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी ताणतणावाचे सुयोग्य पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऱ्हदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. महावीर फार्मसी महाविद्यालयात, ‘ताण-तणाव व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष हरीष संघवी, सचिव शशांक मणेरिकर, डॉ. महेश पडवळ, प्राचार्य ए. एम. देशपांडे, प्राचार्य प्रशांत पाटील, प्रा. आर. एस. नारखेडे उपस्थित होते. पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगिकार, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हानीकारक ठरत असल्याचे सांगून निकोप मैत्री तारणरहित कौटुंबिक संबंध, उत्तम आहार व पुरेसा व्यायाम ही चतु:सूत्री ताण-व्यवस्थापनासाठी महत्वाची आहे. भारतीय संस्कृतीतील उच्च मूल्ये व एकत्र कुटुंबपद्धती तणाव व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही धर्माधिकारी यांनी नमूद केले. सूत्रसंचलन प्रा. ए. ए. सर्वज्ञ यांनी केले तर आभार डॉ. माया पडवळ यांनी मानले.

महामार्ग चौपदरीकरण याविषयी आज चर्चासत्र
नाशिक / प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गाच्या गोंदे ते पिंपळगाव दरम्यान होणाऱ्या चौपदरीकरण कामांसदर्भात येथे गुरूवारी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया व अशोका बिल्डकॉन यांच्यावतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स शाखेच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता हे चर्चासत्र होणार आहे. अशोका बिल्डकॉनला गोंदे ते पिंपळगाव बसवंतपर्यंत बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा (बीओटी) या धर्तीवर साधारणत: १५०० कोटीचे चौपदरीकरणाचे काम मिळाले आहे. त्याअनुषंगाने आयोजित या चर्चासत्रात अशोक कटारिया, सतीश पारख कामाबद्दल सर्व माहिती व तो महामार्ग कसा होणारा त्याची व्हिडीओ कॅसेट व त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती देणार आहेत. कुणाला या कामाबद्दल काही शंका असल्यास त्यावर चर्चा करणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्र गोठी व जोसेफ जोशी यांनी केले आहे.

‘एम्पॉवरमेंट ऑफ वूमन’ कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी
गृहिणींना आपल्या शिक्षणाचा व कलेचा वापर योग्य तऱ्हेने करून घरखर्चासाठी हातभाव लावणे तसेच समाजसेवा करता येणे कसे शक्य आहे, याविषयी सहज संस्थेतर्फे ‘एम्पॉवरमेंट ऑफ वूमन’ कार्यशाळा महात्मानगरमध्ये नुकतीच घेण्यात आली. १६ एप्रिल रोजी ही कार्यशाळा पुन्हा घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी व क्षेत्रात कोणकोणती कामे मिळू शकतील याची माहिती कार्यशाळेत देण्यात आली. घरूनच इंटरनेटवर विविध प्रकारची कामे सहज करता येतात. स्वत:चा व्यवसाय कसा सुरू करता येईल, याचीही व्यवस्थित कल्पना देण्यात आली. घरातील जबाबदाऱ्या व आपली कामे साध्य करण्यासाठी वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दलही माहिती देण्यात आली. उत्तम दर्जाचे शिक्षण हीच काळाची गरज आहे आणि यातूनच सखोल ज्ञान व व्यवहारिक कुशलता असलेली पिढी निर्माण होऊ शकते, या भावनेने सहज संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापिका सुनिता राणा यांनी दिली. लवकरच लहान मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळांचे नियोजनही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वैद्य अभिजित सराफचा गौरव
नाशिक / प्रतिनिधी

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा ३० पेक्षा अधिक देशात आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार करणाऱ्या दीर्घायु इंटरनॅशनल या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘आर्य औषधी तेजामृत संशोधन उत्तम ग्रंथ पुरस्कार’ नाशिक येथील वैद्य अभिजित सराफ यांना नुकताच प्रदान करण्यात आला. ‘भावप्रकाश निघण्टु प्रदीप’ या आयुर्वेदीय संकलनपर ग्रंथाबद्दल सराफला गौरविण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांच्या हस्ते पुणे येथे संस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

नवानगर येथे संत संमेलन
प्रतिनिधी

तालुक्यातील नवानगर येथे संतसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. येथील श्री साधना आश्रम सेवा समितीच्या वतीने एकादश कुण्डीय महायज्ञ आणि संत समेलनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गोमाई नदीतीरावर आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे. संमेलनाची सुरूवात शोभायात्रेने करण्यात आली. या प्रसंगी पारंपरिक वाद्यांच्या साथीने शोभायात्रेत सहभागी झालेल्या संतांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तारादास बापू , स्वामी ब्रह्मानंद सरस्वती, रघुनंदन सरस्वती, त्र्यंबकेश्वरानंद महाराज, कृपाचैतन्य महाराज, भारतीबाबा, अशोकानंद महाराज, संतोषदास महाराज, स्नेहानंद सरस्वती महाराज, सुरेंद्रदास महाराज, राजारामदास महाराज, राजेंद्र ठुबे आदी संतमुनी शोभायात्रेत सहभागी झाले होते. येत्या ६ एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या संमेलनात रोज संतगण प्रबोधन करीत आहेत. रोज होम-यज्ञ व जनजागरणाचे कार्य सुरू आहे. संमेलनाला जाण्यासाठी शहादा ते नवानगर जादा बसेसचे आयोजन शहादा एस. टी. आगाराने केले आहे.

बहिणाबाईंच्या कवितांवर कार्यक्रम
प्रतिनिधी

नाशिक येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयाच्या महिला मंचतर्फे चार एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. नाशिक येथील निर्मल अष्टपुत्रे, पुष्पलता चोपडे आणि रोहिणी नायडू या त्र्यंबकरोड वरील सिंचन भवन परिसरातील कुसुमाग्रज सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम सादर करतील. कार्यक्र मास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम निर्मळ, उपाध्यक्ष डॉ. संजय बेलसरे, कार्याध्यक्ष किशोर पाटील यांनी केले आहे.

करिअर मार्गदर्शन चर्चासत्र
पाल्याची आवड व कौशल्य ओळखून त्यास योग्य त्या क्षेत्रात काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी नाशिकच्या आनंदनिकेतन शाळेतर्फे विभा देशपांडे यांचे येत्या ४ एप्रिल रोजी सायंकाळी पाचला व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. शरणपूररोड येथील वैराज कलादालनमध्ये होणाऱ्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आनंद निकेतन, नाईस वजन काटय़ाजवळ, कामगारनगरसमोर, नाशिक किंवा २३५१२८६, ९४२१५०७७८२ या क्रमांकावर संपर्क साधा.