Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

धक्कातंत्राची प्रतीक्षा..
जयप्रकाश पवार

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांचाच मित्र असलेला काँग्रेस पक्ष चांगलाच हैराण झाला आहे. या निवडणुकीत तर नंदुरबारच्या जागेवरच दावा करण्याची हिंमत दाखविली गेली. पण, २००४ च्या निवडणुकीत कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या भाजपच्या डॉ. सुहास नटावदकरांनी काँग्रेसशी जबरदस्त टक्कर देत थेट दुसरे स्थान पटकावले होते. डॉक्टर महोदयांनी हाच जोर, उत्साह, तडफ अन् जिद्द या निवडणुकीतही दाखविली तर दुसऱ्यावरून पहिल्या स्थानाकडे कूच करताना ते हे स्थान काबीज करूच शकत नाहीत, असा दावा आजघडीला कुणीही करू शकणार नाही.

‘विकासाची दूरदृष्टी आवश्यक’
नुकत्याच जाहीर झालेल्या लाकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विचार करता नाशिक हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशपातळीवरील एक प्रगतीशील मतदारसंघ असल्याचे दिसते. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक अशा सर्व दृष्टीकोनातून विकसित होण्यास या मतदारसंघाला चांगला वाव आहे. अशा प्रगतीच्या मार्गावर असणाऱ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी अत्यंत दूरदृष्टीचा असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे कल्पकता, मेहनत, जबाबदारपणा, संघटन कौशल्य हे गुणही असणे अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचे तर,भान राखून विकासाचा आराखडा आखणारा व त्याच्या पूर्ततेसाठी बेभान होवून काम करणारा उमेदवार असणे आजच्या स्थितीत गरजेचा आहे.

मंदीतली चांदी!
भाऊसाहेब : परचाराचा धडाका लै जोरात सुरू झाला म्हनायचा, भावराव.
भाऊराव : हो, उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्तानं सगळ्यांनीच शक्तीप्रदर्शनाचा अटोकाट प्रयत्न केला.
भाऊसाहेब : कोनाचा दनका जास्त जोरात व्हता, पन?
भाऊराव : ते या भावडय़ालाच विचारा, गेला होता ना तो सगळीकडे..
भावडय़ा : सगळ्यांच्याच रॅल्या चांगल्या झाल्या.
भाऊसाहेब : त्ये दिसलं पेपरातल्या फोटूतून, पन जास्त गर्दी कुनाची हुती?
भाऊराव : गर्दीचं काय खरंय, या भावडय़ासारखी मंडळी टपलेलीच असतात, कधी बोलावणं येतयं त्यासाठी.
भावडय़ा : तुम्हाला काय कळणार रॅलीतली गंमत..

धुळ्यात पटेल-पाटील मनोमीलनाचे प्रयत्न
धुळे / वार्ताहर
उमेदवारी न मिळाल्यामुळे आ. रोहिदास पाटील समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रारंभी हादरलेली काँग्रेस-राष्ट्रवादी, रिपाइं आघाडी आता धुळे लोकसभा मतदारसंघात चांगलीच सावरली असून शहरात झालेल्या निर्धार मेळाव्यातून त्याचे प्रत्यंतर आले. या मेळाव्यात धार्मिकतेच्या आधारावर मते मागणाऱ्यांना निवडून द्यायचे नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

व्यक्तिमत्त्व विकास - २७
नको त्रागा, कामाला लागा
‘अ‍ॅन इनकन्व्हिनियंट ट्रथ’ या डॉक्युमेंटरीचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. ऐकले नसेल तर त्याविषयी इथे वाचल्यावर तुमच्या नक्कीच हे नाव लक्षात राहील. दूरदर्शनवर देखील या लघुपटाविषयी चर्चा झाल्या आहेत. काय आहे त्याचे वैशिष्टय़? तर ही डॉक्युमेंटरी बनवली आहे अमेरिकेतील अल् गोर या पर्यावरणप्रेमी, नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकेच्या माजी उपाध्यक्षांनी.

पोलीसपाटील संघटनेची निवडणूकभत्ता देण्याची मागणी
देवळा / वार्ताहर

पोलीस पाटलांना शासनाने निवडणूक काळातील कामाचा भत्ता द्यावा अशी मागणी महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माधवराव पगार यांनी निवेदनाव्दारे केली आहे. कोणत्याही निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दोन दिवस आधीपासून ते मतपेटय़ा पोहचविण्यापर्यंत पूर्ण वेळ पोलीस पाटलांकडून मोफत सेवा करून घेतली जाते. तसेच मतदार केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांची व्यवस्था देखील पोलीस पाटलांकडूनच पाहिली जाते. वरिष्ठ पातळीवरील सर्व अधिकारी सुद्धा सर्व बाबतीत पोलीस पाटलांना जबाबदार धरतात, मात्र शासन पोलीस पाटलांच्या मागण्यांकडे डोळेझाक करण्यात येत आहे. निवडणूक काळात इतर अधिकाऱ्यांप्रमाणे रोख स्वरुपात ३०० रुपये भत्ता शासनाने रितसर द्यावा अशी मागणी माधवराव पगार यांनी केली आहे.

ससदे परिसरात बिबटय़ाचा धुमाकूळ
शहादा / वार्ताहर

तालुक्यातील ससदे शिवारात बिबटय़ांनी धुमाकूळ घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटय़ांनी दोन शेतमजुरांवर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर येथील नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, लोकांच्या मागणीनुसार बिबटय़ाला पकडण्यासाठी सापळा लावला आहे. ससदे येथील छोटू रजेसिंग भिल (३०) व दिलीप कथू भिल (२८) हे शेतीकामावरून घरी परत येत असताना दोन बिबटय़ांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या तावडीतून उभयतांची कशीबशी सुटका झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून बिबटय़ांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. त्यानुसार उपवनसंरक्षक सुरेश मोरे, वनक्षेत्ररक्षक चंदेल व सारंगखेडा येथील पोलीस घटनास्थळी पोहचले. बिबटय़ांचा शोध घेण्यास सुरूवात झाली असली तरी सतत दोन दिवस शोध घेवूनही बिबटे मिळाले नाहीत.

नंदुरबार येथे डॉक्टरांसाठी चर्चासत्र
नंदुरबार / वार्ताहर

शहरातील डॉक्टरांसाठी येथील कन्यादान मंगल कार्यालयात नुकतेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. इंडियन मेडीकल असोसिएशनच्या येथील शाखेच्या वतीने हा उपक्रम पार पडला. चर्चासत्रास ६० डॉक्टर्स उपस्थित होते. डॉ. अनिल शहा यांनी बनविलेल्या तीन उपकरणांची देशपातळीवर निवड झाली असून त्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सी. डी. महाजन यांनी दक्षिण अफ्रिकेत जागतिक स्तरावर सादर केलेल्या शोधनिबंधाचे वाचन केले. आधुनिक पद्धतीने फिक्सेटर वापरून कमी खर्चात फ्रॅक्चरवर उपचार करता येतो असे त्यांनी सांगितले. प्रास्तविक डॉ. जयंत शहा यांनी, सूत्रसंचलन डॉ. विजय पटेल यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जे. टी. पाटील यांनी केले.

नियोजनाअभावी उसवाडमध्ये पाणीटंचाई
चांदवड / वार्ताहर

तालुक्यातील उसवाड येथे ग्रामपंचायतीच्या योग्य नियोजनाअभावी ऐन उन्हाळ्यात पाणी असूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. गावातील प्रमुख जलवाहिनीला जोडलेले नळ कनेक्शन तसेच गावात नळांसाठी करण्यात आलेले मोठे खड्डे आदी कारणांनी पाणीपुरवठा ठप्प झाला असून ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष वेधून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे. ऊसवाडसाठी राहूड येथील बंधाऱ्याजवळील विहीरीपासून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तेथील पाण्याच्या टाकीत पाणी टाकले जाते व गावात नळांव्दारे पाणीपुरवठा केला जातो. बरेच नळकनेक्शन बिगर डिपॉझिटचे झाल्याचे ग्रामस्थांची ओरड आहे. नळांना पाणी येत नाही म्हणून मोठे खड्डे तयार करून पाणी मिळविण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केला. त्यामुळे नळ पाणीपुरवठा योजना संपूर्ण कोलमडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. बंधाऱ्यात पाणी उपलब्ध असून विहीरीतही पुरेसे पाणी असूनही गावात टंचाई जाणवू लागल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.