Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

श्वास!

 

‘‘डॉक्टर, गेले दोन महिने मला अचानक धाप लागते. छातीत धडधडतं. डाव्या हाताला मुंग्या येतात. छातीत दुखतं. कार्डिऑलॉजिस्टकडून सगळा तपास करून झाला, डॉक्टर्स म्हणतात मानसिक आहे! मनात इतकी भीती बसलीय माझ्या, की आताशी मी माझ्या प्रत्येक हालचाली हळू करतो. एकटा बाहेरसुद्धा जात नाही. आता श्वासच अडतो म्हटल्यावर करायचं तरी काय माणसाने?’’
आठ महिन्यांपूर्वी बँकेतून व्ही. आर. एस. मिळाल्यापासून याचं वागणंच बदललंय! घरीच असतात. हल्ली हल्लीतर कोणाशी फोन नाही, बाहेर जाणं नाही. कुठे येता का म्हटलं तरी कंटाळा! मित्र नकोत, नातेवाइक नकोत, काहीच नको! रात्र-रात्र जागेच असतात. उशिरा अकरा अकरा वाजेपर्यंत झोपतात नि नंतर दिवसभर जांभया देत असतात नि उसासे टाकत असतात..!’’
कॉलेजात असताना आय. एन. टी.साठी एक नाटक बसविलं होतं चेतन दातारनी. ‘नैनं छिन्दंन्ति शस्त्राणि’ त्यातील प्रोटॉगॉनिस्ट एक शीख दहशतवादी होता. त्याच्या एका सीनमध्ये तो भयंकर रागावतो. कलाकाराला काही केल्या राग वठवता येत नव्हता. दिग्दर्शक हर तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न करीत होता. दिग्दर्शक काहीतरी अपमानास्पद बोलला. झालं, कलाकाराचं डोकं फिरलं, मुठी आवळल्या, डोळे लालबुंद झाले, श्वास फुलला. दिग्दर्शक चटकन म्हणाला, ‘हेच तर करायचंय स्टेजवर!’
श्वसन ही अशी क्रिया आहे, जी आपल्या बऱ्याचशा कंट्रोलमध्ये असते, नि त्या क्रियेचे परिणाम आपण अनुभवत असतो. रागाने फुललेला श्वास, प्रेमाने भारलेला श्वास, दु:खाचा उसासा नि उमेदीचा श्वास न अनुभवलेली व्यक्तीच विरळा! फारसा विचार किंवा कष्ट न करता होणारी ही प्रक्रिया जेव्हा अडखळते तेव्हा उसासे, जांभया, धाप नि भीती यांची सुरुवात होते. वरच्यावर फक्त श्वसनसंस्थेशी निगडित वाटणारी ही श्वसनाची क्रिया आपल्या अंतर्मनाशी घनिष्ट संबंधांनी जोडलेली असते. वातावरण आणि व्यक्ती यांच्याशी ज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त क्षणोक्षणी दुवा साधणारी श्वसनाची प्रक्रिया ताणतणावाच्या समायोजनात अतिशय महत्त्वाची मानली जाते.
मेंदूला परिसराबद्दल ज्ञान होण्यासाठी डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ यांचा उपयोग होतो. या ज्ञानेंद्रियांतून मिळणारे संकेत मेंदू चरितार्थासाठी आणि स्वसंरक्षणासाठी वापरत असतो. या संकेतांचा उपयोग मेंदू माहिती निर्माण करण्यासाठी करतो आणि त्या माहितीचा उपयोग स्वानुभवावरून निष्कर्ष काढण्यासाठी! या निष्कर्षांवरून होत असतं परिस्थितीचं आकलन! हे आकलन सद्य आणि सत्य परिस्थितीचं वैयक्तिक चित्र मनात उतरवत असतं; पण हे काही चित्तासाठी चित्रं नसतं! त्यात परिस्थितीचे पडसाद असतात, अपेक्षांचे साद असतात. या भावनिक कंगोऱ्यांच्या गडद-फिक्या छटा चित्राला भावविश्व देत कधी व्यक्तीला खुलवतात, फुलवतात तर कधी पुरतं हरवून टाकतात! पण समजा मनातल्या रंगपेटीतलं वैविध्यच संपलं तर? म्हणून आपल्याला ‘तेच ते, तेच ते’ची भीती वाटते.
आता प्रत्येकाच्या आयुष्यात दिवसागणिक कुठे येणार असे रंगीन क्षण? आणि समजा नाही आले असे क्षण नि पडला चित्रकाराला या आगळ्या-वेगळ्या रंगांचा विसर, तर? म्हणजे रंगपेटीत रंग असूनसुद्धा कुंचल्याचा सराव मात्र सुटला, तर? तर, भावनांची आषाढदाटी होते. विचारांचा साज भावनांना सजवण्याऐवजी भावनाचं
खोटं विचारांची फरफट सुरू करतं. आयुष्यात काळजी, कंटाळा, कोप नि कसरच राहते. हे ताणतणावाचं ‘कुराज्य’ एका रात्रीत येत नाही आणि एकदा आलं, की एका रात्रीत जातही नाही!
वैद्यक शास्त्रात ‘श्वसना’ला फारच महत्त्व आहे. फारफार पूर्वी म्हातारी मेली, की जगतेय समजण्यासाठी नाकाशी सूत धरत. जीवन मरणातलं अंतर ‘एक श्वासाचं’ म्हणत! शास्त्राने केली कल्पनेवर कुरघोडी आणि कल्पनेचा ‘ठोकाच’ चुकला! डॉक्टरच्या हाती स्टेथोस्कोप आला नि जन्ममरणाचं नातं ठोक्यात अवघडलं.
आता शास्त्र मरणाची सांगड ‘मेंदू’ मरणाशी घालत आहे. जीवनाच्या सर्व प्रक्रियांचे सारथ्य मेंदू करतो, असा विचार प्रकट होतो आहे. शरीरातील प्रक्रियांच्या स्थितीची इत्थंभूत माहिती मेंदूपर्यंत पोहोचविण्यासाठी अत्यंत विकसित मज्जारज्जू संस्था, रक्ताभिसरणाचा वापर होतो. रक्तातील आवश्यक ऊर्जा स्तोत (अनघटक) प्राणवायू नि हारमोन्स, या जैविक प्रक्रिया व्यवस्थित चालवितात. शरीरात कोठेही बिघाड झाला तर त्यासाठी आवश्यक तरतुदी करण्याची क्षमता श्वसनावर बेतलेल्या रक्तपुरवठय़ाच्या पद्धतीवर असते.
शरीराचे बहुतेक अन्नघटक शरीरात साठविण्याची मुभा आहे; पण सर्व क्रियांना लागणारा प्राणवायू नि प्रक्रियांत तयार होणारा कार्बनडायऑक्साईड यांचं जीवनावश्यक प्रमाण राखण्याचं काम सेकंदागणिक श्वसनप्रक्रियेला करायला लागतं. रक्तातील या वायूंच्या प्रमाणावर शरीरातील नि मेंदूतील जीवनावश्यक प्रक्रियांची कार्यक्षमता अवलंबून असते आणि म्हणूनच मरणाच्या व्याख्येत आता श्वसनाचा वाटा ‘सूतराम’ राहिला नसला तरी स्वस्थ जीवनाच्या व्याख्येत श्वसनाला महत्त्व अजूनही आहे. वर्षांनुवर्षे योगविद्येत प्राणायामाला आधुनिक वैद्यकशास्त्रात दीर्घ श्वसनाला, चायनीच वैद्यकशास्त्रात शिस्तबद्ध श्वसनाला असलेलं महत्त्व याचेच द्योतक आहे.
म्हणजेच शरीराच्या अंतर्गत सुव्यवस्थेसाठी श्वसनप्रक्रिया क्षणाक्षणागणिक उपयुक्त असते. मेंदूमधलं या वायूचं काम विचारी मेंदू नि भावनिक मेंदू यामधला दुवा साधणाऱ्या Reticula Activating System (RAS) आणि तिच्याशी निगडित मज्जारज्जू संस्थेशी असतं. ताणतणावांच्या कुराज्यात (RAS) च्या अकार्यक्षमतेमुळे श्वसनांच्या स्नायूंवर आणि हालचालींवर विपरित परिणाम होतचो. ज्यामुळे रक्तातील वायूंचे प्रमाण, रक्ताभिसरणासाठी लागणारी रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी-जास्त होते आणि श्वसनप्रक्रिया, वायूंची फुप्फुसातील देवाण-घेवाण आणि शरीरातील देवाण-घेवाण, व्यवस्थित होत नाही. त्याचा परिणाम शरीर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतो. ही कमी होणारी कार्यक्षमता व्यक्तीला अजूनच ताणतणावांच्या समोर दुर्बल बनवते. न बदलणारी परिस्थिती, परिस्थितीबद्दलचं सततचं नकारात्मक आकलन, अनाहूतपणे ताणतणावांचे श्वसनावर होणारे परिणाम, त्यामुळे निर्माण होणारी नवीन शारीरिक आणि मेंदूतली अकार्यक्षमता आणि त्यातून होणारा अजूनही नकारात्मक स्वानुभव! एखाद्या भोवऱ्यात अडकल्यासारखा माणूस ताणतणावात नुसता अडकत नाही, तर अजून खोल खोल खेचला जातो.
बऱ्याच वेळा प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा त्या परिस्थितीकडे बघण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे झालेले श्वसनातील अनाहूत बदल, ताणतणावाचे परिणाम वाढवत असतात. अशा वेळी कृत्रिमपणे घडवून आणलेला श्वसनप्रक्रियेतील बदल बऱ्याच प्रमाणात ताणतणावाचे शरीरावरील परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मनामध्येसुद्धा अनावधनाने निर्माण झालेली निराशा बदललेल्या श्वसनाने कमी होऊ शकते. मनातल्या सुकलेल्या कुंचल्याला ओलावा लागतो नि रंगांचा वापर पुन:श्च करण्याची परिस्थिती तयार होऊ शकते.
वैद्यकशास्त्रात सांगितलेल्या दीर्घ श्वसनाच्या काही पद्धती : अ) पाठ सरळ ठेवून नेहमीसारखं बसावं. प्रयत्नपूर्वक जोर लावून संपूर्ण उच्छवास टाकावा. हलकेच श्वास घ्यायला सुरुवात करावी. जास्तीतजास्त हवा अंगात घ्यायचा प्रयत्न करावा. वरील पद्धत सावकाश चार-पाच वेळा करावी आणि झालेला फरक अनुभवावा.
ब) पलंगावर पाठीवर आडवं व्हावं. आपला एक हात पोटावर ठेवावा. अशा प्रकारे श्वास घ्यावा ज्यामुळे पोटावर ठेवलेला हात जास्तीतजास्त उचलला जाईल. हळुवार श्वास सोडावा. जोरकस प्रयत्न करून हात जास्तीत जास्त खाली जाईल, असा प्रयत्न करावा. अशा प्रकारच्या श्वसनासाठी कोणते स्नायू लागतात, हे लक्षात ठेवून पोटावर हात न ठेवता श्वसन शिकावे.
क) स्वस्थ बसून डोळे बंद करावेत. संपूर्ण उच्छवास टाकून, श्वासाची सुरुवात करावी. श्वासाबरोबर उजव्या हाताने ठेका धरून संपूर्ण श्वास पाच मात्रांत बांधण्याचा प्रयत्न करावा. (हे करीत असताना श्वसन जितकं नैसर्गिक ठेवता येईल तेवढं ठेवावं.) दीर्घ श्वास संपल्यावर त्याच ठेक्यात पाच मात्रांसाठी श्वास रोखून धरावा. सावकाश उच्छवास सुरू करून संपूर्ण उच्छवास पाच मात्रांसाठी खेचावा. (थोडक्यात, श्वास आणि उच्छवास यासाठी लागणारा वेळ नि वायूच्या फुप्फुसातील देवाणघेवाणीसाठी लागणारा वेळ सारखा असावा.)
अशा दीर्घ श्वसनामुळे ताणतणावांच्या झालेल्या परिणामामुळे अवघडलेला श्वास पूर्ववत होण्यास फायदा होतो. बऱ्याच वेळा न समजून शरीरदेखील हे बदलण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याला आपण ‘उसासा’ म्हणतो. काहींना दीर्घ श्वसनानंतर चक्कर आल्यासारखं वाटतं, किंवा डोक्यात हलकं हलकं वाटतं. प्रथम करणाऱ्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज भासते. श्वासाचं मेंदूतलं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल ना तर एक सोपा प्रयोग करा. रोखा आपला श्वास. बघा किती वेळ रोखू शकताय. खेचा स्वत:च्या मर्यादा! न सोसवून जेव्हा पुढचा श्वास सुरू होतो ना, तेव्हा अनुभवा मेंदूत काय होतं? प्रत्येक श्वासात हा अनुभव द्यायची ताकद आहे, पण त्यासाठी लागते जाणीव आणि शिस्त! ताणतणावांच्या समायोजनात सुरेश भटांच्या शब्दांत,
कालचे तेच जुने रंग नकोसे झाले
‘घे तुझा श्वास’ नवा रंग भरायासाठी।।

असा बदल घडवून आणला तर तो योग्यच ठरेल!
doc-ashishd@yahoo.com