Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

झीज अजिंठा-वेरुळ लेण्यांची

 

भारतात जागतिक वारसा म्हणून प्राप्त झालेले एकूण २८ ठिकाणे आहेत. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्य़ात अजिंठा आणि वेरुळ लेण्यांचा समावेश आहे. या ऐतिहासिक आणि जागतिक स्थळाचा विकास राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या समन्वयाने आणि जपान इंटरनॅशनल बँक या जपान सरकारच्या वित्तीय संस्थेच्या सहकार्याने केला जात आहे. या संस्थेकडून ३०० कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. २००४ पासून अजिंठा-वेरूळ विकास कामांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. २०१० पर्यंत हा टप्पा पूर्ण होणार आहे. या लेण्यांचे संवर्धन आणि विकास कामे प्रगतीपथावर आहेत. १७०० वर्षांपूर्वी अजिंठा आणि वेरुळ या लेण्यांची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजपावेतो या बसाल्ट खडकाच्या अंतरंगात कोरलेली ही शिल्पं अजिंठा आणि वेरुळमध्ये दिसतात. आता या दगडांची झीज होणे सुरू झाले आहे. त्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या संवर्धनासाठी करार करण्यात आला. या कराराची समाप्ती बुधवारीच संपली. आज भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने आपला अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागाला सोपविला आहे आणि या अहवालात आताच संवर्धनाची पावले उचलली नाही तर भविष्यात अजिंठा - वेरुळ लेण्यांची झीज होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या विभागाचे महानिरीक्षक पी. एम. तेजळे यांनी हा इशारा दिला आहे. या विभागाने केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी सात करार केले. त्यातील चार करार हे महाराष्ट्रासाठी तर तीन करार हे मध्य प्रदेशातील आहेत. अजिंठा -वेरुळ, पितळखोरा आणि औरंगाबाद लेणी यांच्या संवर्धनासाठी सर्वेक्षण विभागाने आपला अहवाल सादर केला आहे. पहिला टप्पा हा प्राथमिक अवस्थेचा होता.
या टप्प्यामध्ये वातावरणाचा व प्रदूषणाचा लेण्यावर परिणाम होऊ नये म्हणून भारतीय सर्वेक्षण विभागाने काही सूचना पुरातत्त्व विभागाला केल्या होत्या. प्रदूषण कमी व्हावे म्हणून ४ किलोमीटर दूर अंतरावर सर्व गाडय़ा पार्क करण्यात येऊ लागल्या. लेण्यांच्या खाली असलेली सर्व दालने हटविण्यात आली. तसेच एका वेळी लेणी पाहताना ३० पर्यटकांनाच परवानगी देण्यात आली. पर्यटकांची संख्या वाढली तर त्याचा परिणाम आद्र्रतेवर होतो. आद्र्रतेचा थेट परिणाम लेण्यांवर होतो. तसेच या लेण्यांमध्ये छायाचित्रण करण्यासही परवानगी नाकारली. फ्लॅश केल्यामुळे लेण्यांमधील तापमान वाढले जाते. हे तापमान कमी होण्यासाठी ही सूचना
करण्यात आली होती. या सूचनांचे तंतोतंत पालन सर्वेक्षण विभागाने केले.
अजिंठा लेण्यांमध्ये ३९३ खडकांची झीज होत आहे. त्यातील दगडे ठिसूळ होत चालली आहे. त्याचा परिणाम शिल्पांवर होत आहे. छत, भिंत, खांब आणि तळ यावर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका खांबांवर झाला आहे. तब्बल ५०० पैकी ३०८ खांबे धोक्यात आली आहेत असे या अहवालात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने म्हटले आहे.
अजिंठा आणि वेरुळ लेण्यांमध्ये पा होई होई या दगडाचा वापर करण्यात आला आहे. हा दगड मूर्ती आणि शिल्पकाम करण्यासाठी उपयुक्त आहे. या दोन्ही लेण्यांमधील दगडे आता झिजू लागली आहेत. लेण्यांच्या छतावर मातीचा थर साचला आहे. पाणी झिरपणे चालू आहे. अजिंठा लेण्यांमधील १३ क्रमांकाच्या लेण्यांमध्ये फेब्रुवारी २००५ मध्ये दरड कोसळणार अशा सूचना भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने पुरातत्त्व विभागाकडे केल्या होत्या. पण या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे जुलै २००७ मध्ये दरड प्रत्यक्षात कोसळली. अजिंठा लेण्यांमधून वाघूर नदी वाहते. केवळ पावसाळ्यातच या नदीला पाणी असते. पाण्याचा मारा हा थेट लेण्यांच्या दगडांवर बसतो. त्यामुळे पाण्याचा मारा किंवा धडका कमी करण्यासाठी संवर्धक भिंत तयार केली पाहिजे. तसेच पाण्याचा वेग कमी केला पाहिजे अशा सूचना या विभागाने दिल्या आहेत. दगडांचा अभ्यास करण्यासाठी थ्री डी पद्धतीने आणि लेसर यंत्रणेचा वापर करण्यात आला. अजिंठा लेण्यांमध्ये तब्बल ९१ दगडांच्या पापुद्रांना धोका पोहोचला आहे. त्याकडे आगामी काळात लक्ष द्यावे लागणार आहे. निझामाच्या काळात अजिंठा लेण्यांच्या वरती धरण बांधण्यात आले होते. पण आता हे धरण अस्तित्वात नाही; त्यामुळे पाण्याचा वेग वाढल्याने ते पाणी सरळ लेण्यांमध्ये पाझरते. केवळ पावसाळ्यामध्येच काही ठिकाणी लेण्यांमध्ये ओल येते आणि काही लेण्यांमध्ये ओल येते ती १५ ते २० दिवसांनंतर. त्यामुळे छतावरच पाणी अडवा पाणी जिरवा अशा पद्धतीची योजना करणे गरजेचे आहे. या प्रतिबंधक उपाययोजना केल्या गेल्या तर अजिंठा -वेरुळ लेण्यांमधील शिल्पांचे आयुष्य निश्चितपणे वाढणार आहे.
प्रमोद माने
pramod.mane@expressindia.com