Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
विशेष

श्वास!
‘‘डॉक्टर, गेले दोन महिने मला अचानक धाप लागते. छातीत धडधडतं. डाव्या हाताला मुंग्या येतात. छातीत दुखतं. कार्डिऑलॉजिस्टकडून सगळा तपास करून झाला, डॉक्टर्स म्हणतात मानसिक आहे! मनात इतकी भीती बसलीय माझ्या, की आताशी मी माझ्या प्रत्येक हालचाली हळू करतो. एकटा बाहेरसुद्धा जात नाही. आता श्वासच अडतो म्हटल्यावर करायचं तरी काय माणसाने?’’ आठ महिन्यांपूर्वी बँकेतून व्ही. आर. एस. मिळाल्यापासून याचं वागणंच बदललंय! घरीच असतात. हल्ली हल्लीतर कोणाशी फोन नाही, बाहेर जाणं नाही. कुठे येता का म्हटलं तरी कंटाळा! मित्र नकोत, नातेवाइक नकोत, काहीच नको! रात्र-रात्र जागेच असतात. उशिरा अकरा अकरा वाजेपर्यंत झोपतात नि नंतर दिवसभर जांभया देत असतात नि उसासे टाकत असतात..!’’

झीज अजिंठा-वेरुळ लेण्यांची
भारतात जागतिक वारसा म्हणून प्राप्त झालेले एकूण २८ ठिकाणे आहेत. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्य़ात अजिंठा आणि वेरुळ लेण्यांचा समावेश आहे. या ऐतिहासिक आणि जागतिक स्थळाचा विकास राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या समन्वयाने आणि जपान इंटरनॅशनल बँक या जपान सरकारच्या वित्तीय संस्थेच्या सहकार्याने केला जात आहे. या संस्थेकडून ३०० कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. २००४ पासून अजिंठा-वेरूळ विकास कामांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. २०१० पर्यंत हा टप्पा पूर्ण होणार आहे. या लेण्यांचे संवर्धन आणि विकास कामे प्रगतीपथावर आहेत. १७०० वर्षांपूर्वी अजिंठा आणि वेरुळ या लेण्यांची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजपावेतो या बसाल्ट खडकाच्या अंतरंगात कोरलेली ही शिल्पं अजिंठा आणि वेरुळमध्ये दिसतात. आता या दगडांची झीज होणे सुरू झाले आहे.

‘मनातली शाळा’
लेखकाने कितव्या वर्षी स्वत:चे पुस्तक लिहावे यावर काही बंधन आहे काय? संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली असे म्हणतात. अर्थात ते ‘ज्ञानेश्वर’ होते म्हणून त्यांना ‘ज्ञानेश्वरी’ लिहिणे शक्य झाले असावे. इतरांना ते जमले असतेच याची खात्री देता येत नाही. परंतु पुस्तक लिहिणारा लेखक (किंवा लेखिका) वयाने मोठा असलाच पाहिजे असे काही बंधन नसावे. पुण्यातल्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका चिमुरडीने हे सिद्ध केले आहे. या चिमुरडीचे नाव आहे रुई अभय लिमये. तिने लिहिलेले ‘मनातली शाळा’ हे छोटेखानी पुस्तक नुकतचे प्रकाशित झाले. पुण्यातील ‘गरवारे बालभवन’ च्या कजा कजा मरू प्रकाशनातर्फे सईचे हे छोटेसे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे. (किंमत अवघी १५ रुपये). कै. वा. दि. वैद्य मुलींच्या शाळेत (नू. म. वि.) इयत्ता दुसरीमध्ये शिकणारी सई ‘गरवारे बालभवन’चीही विद्यार्थिनी आहे. मध्यंतरी गरवारे बालभवनमध्ये पर्यावरण विषयक प्रदर्शन भरले होते. त्यात दोन मोठी चित्रे होती. एका चित्रात होते नैसर्गिक जंगल तर दुसऱ्या चित्रात होते सिमेंट काँक्रीटचे जंगल. अर्थातच पहिलेच चित्र अनेकांना आवडले. सईही त्याला अपवाद नव्हती. तिच्या बालसुलभ मनाला प्रश्न पडला की, नैसर्गिक जंगल एवढे चांगले असताना आपण मग सिमेंट काँक्रीटच्याच जंगलात का राहतो? तिने हा प्रश्न तिच्या आईला विचारला तेव्हा आईने अगं जंगलात शाळाबिळा नसते. तू शिकून मोठी झाली की आपण जंगलात घर बांधू, असे सांगून वेळ मारून नेली. सईला ही कल्पना मात्र आवडली. आपण जंगलात घर बांधायचे व तिथल्या आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा काढायची असे तिने मनाशी ठरविले व तिच्या कल्पनेतील (मनातली) शाळा तिने आईला बोलून दाखविली व तिच्या आईने ‘तिच्याच शब्दात’ तिला लिहायला मदत केली. व सईचे हे पुस्तक आकाराला आले.
सई आपल्या ‘मनातली शाळे’बाबत म्हणते की, ‘आश्रमशाळा म्हणजे मुलं तिथंच राहणार. मग घरं हवीतच, पण प्रदूषणवाली नकोत. मातीची घरं मुलांना व आपल्याला राहायला. विजेचे दिवे नक्को! पलंगसुद्धा लाकडाचे किंवा दगडाचे. पण ते तर मुलांना टोचतील? मग त्यावर आपण छान मऊ गवत अंथरून देऊ! शाळेत मुलांना दूध लागेल. म्हणून आपण गायी पाळू, दूध मीच काढणार चुळ्ळुम - चुळ्ळुम! शिवाय त्यांना चरायला नेणं; अंघोळ घालणं, गोठा साफ करणं-आपण सगळ्या मुलांना ही कामं वाटूंन देऊ. मुलांनी सकाळी लवकर उठून प्रार्थना म्हणायची, झाडांना पाणी घालायचं, मग अंघोळ, कपडे धुणं, नदीवर.. येस.. मज्जा धम्माल?
सईचे हे निसर्गप्रेम पुस्तकाच्या प्रत्येक पानापानात व्यक्त झालेले दिसते. म्हणूनच पर्यावरणाबाबत जागृती होण्याच्या दृष्टीने ही ‘मनातली शाळा’ अतिशय उपयुक्त ठरली आहे. लहान मुलांनी तर या जंगलाच्या शाळेचा रस्ता न चुकता धरण्याची गरज आहे. या ‘शाळे’च्या प्रगतिपुस्तकाचा आलेख उंचावत गेल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे, असे म्हणायला हरकत नसावी.
श्रीकांत ना. कुलकर्णी