Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

नॅनो आली रे.. टाटांची स्वप्नवत नॅनो मंगळवारी टिळक रस्त्यावरील ‘पंडित ऑटोमोटिव्ह’च्या शोरुममध्ये दाखल झाली. तेव्हा तिला पाहण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

काँग्रेसने हाती घेतलेल्या कामांचीच पुणे पॅटर्नकडून पूर्तता- कलमाडी
पुणे, १ एप्रिल/ विशेष प्रतिनिधी

महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामांबद्दल आपण समाधानी असून काँग्रेसने हाती घेतलेली बहुतांशी कामे पुणे पॅटर्नने पूर्ण केली आहेत. आजवर केलेल्या विकास कामांच्या जोरावरच ही निवडणूक आपण जिंकू, असा विश्वास व्यक्त करून यापुढे शहरातील वाहतूक व्यवस्था व सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यावर आपण भर देणार आहोत, असे मनोगत खासदार सुरेश कलमाडी यांनी आज व्यक्त केले.

शिरोळे जमीनदार आणि कोटय़धीशही!
पुणे, १ एप्रिल / खास प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे हे कोटय़धीश जमीनदार आहेत. मुळशी, चाकण, उरुळीकांचन आणि भांबुर्डा येथे त्यांची मोठी जमीन आहे. मात्र त्यांच्याकडे केवळ साडेबारा तोळे सोने आहे. कराराने दिलेल्या जमिनीशिवाय त्यांच्या कुटुंबाकडे एकंदर ११ कोटी २९ लाखांची मालमत्ता आहे.शिरोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आर. एन. जोशी यांच्याकडे दिला. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या मालमत्ता विवरणपत्रामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली.

मराठी शाळेची शिक्षिका निघाली अमेरिकेतील प्रशिक्षणाला
पुणे, १ एप्रिल/ विशेष प्रतिनिधी

येथील अभिनव विद्यालय या मराठी शाळेतील विज्ञान व गणित शिक्षिका कांचन करंदीकर यांची अमेरिकेतील प्रशिक्षणासाठी निवड झाली असून अशा प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या पुण्यातील मराठी माध्यमाच्या शाळेतील पहिली शिक्षिका ठरण्याचा मान त्यांनी पटकाविला आहे. अमेरिकेतील ‘हनीवेल एज्युकेटर्स अ‍ॅट स्पेस अ‍ॅकॅडमीच्या’ वतीने गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षण शिबिरासाठी करंदीकर यांची ही निवड झाली आहे.

परीक्षा विभागाची परीक्षा
मुकुंद संगोराम

पुणे विद्यापीठाने आजवरच्या इतिहासात जे अनेक विक्रम केले आहेत, त्यामध्ये शिरपेचात मानाचा तुरा शोभावा असा विक्रम आता उघड झाला आहे. परीक्षा केंद्रित असलेल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांला किती ज्ञान मिळाले आहे, हे तपासण्यासाठी त्याला शिकवणाऱ्या शिक्षकाचे मत महत्त्वाचे मानले जात नाही. एखादा विद्यार्थी किती शिकला, त्याला मिळालेल्या ज्ञानाचा तो कसा उपयोग करू शकतो, हे खरे तर शिक्षकाएवढे दुसरे कुणीच सांगू शकत नाही. पण आपण पहिल्यापासून ज्ञान तपासण्यासाठी लेखी परीक्षेचे धोरण अवलंबिले. वर्षभर अभ्यास करणाऱ्या किंवा न करणाऱ्या विद्यार्थ्यांने लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी केली, तर तो हुशार या संज्ञेस पात्र ठरतो. परीक्षेच्या उत्तरपत्रिका लिहिणारे आणि त्या तपासणारे एकमेकांना आयुष्यात भेटण्याची शक्यता नसते, त्यामुळे या पद्धतीत उत्तरपत्रिका जर मन लावून तपासल्या तर गुणवत्तेची किमान परीक्षा घेता येणे शक्य असते, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

अजितदादांना धास्ती!
अजित पवार यांनी आतापर्यंतच्या अनेक भाषणात विलासरावांवर (लांडे)वेगवेगळी शेरेबाजी केली आहे. नुकत्याच झालेल्या थेरगावच्या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा विलास लांडे यांच्यावर कोटी केली . रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्य़ांत पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे घाटाखालचा आणि घाटावरचा असे सरळसरळ दोन भाग आहेत. मतदारसंघात सुरु असलेल्या वेगवेगळ्या आडाख्यांचा अजित पवार यांनी थेरगावच्या मेळाव्यात गमतीदार आढावा घेतला. हा कोण? तर, घाटाखालचा इच्छुक, तो कोण? तर, घाटावरचा इच्छुक, असे आपण सतत ऐकतो आहोत.

संधी आहे पण..
‘‘खरं म्हणजे पुण्यात भाजपला चांगली संधी आहे, पण..’’
‘‘राव, या पणवरच आपली गाडी अडू नये म्हणजे मिळवली’’
‘‘खरय तुमचं म्हणणं.., अहो, पुण्यात आपल्या पक्षाचा कॅंडिडेट ठरताना नेत्यांमध्येच किती धुमश्चक्री झाली. आता चांगला उमेदवार मिळाला, त्याला मराठा कार्डचा खणखणीत पाठिंबा मिळायच्या हालचाली सुरू झाल्या. त्यात मुस्लिमांनी आपली वेगळी चूल मांडायचं ठरवलयं, पण अजून पक्षाची यंत्रणाच झडझडून उभी राहिलेली दिसत नाहीये.’’

तिसऱ्या आघाडीचे विक्रम बोके उमेदवार?
पुणे, १ एप्रिल / खास प्रतिनिधी

पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय तिसऱ्या आघाडीने घेतला असून माजी पोलीस अधिकारी विक्रम बोके हे या आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहेत. तिसऱ्या आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास सध्याची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात डाव्या पक्षांनी तिसरी आघाडी उभी केली आहे.

सभा, बैठकांबरोबरच कलमाडींचा वस्त्यांमध्येही संपर्क
पुणे, १ एप्रिल/प्रतिनिधी

कार्यकर्त्यांचे मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, तसेच वस्त्यांमध्ये जाऊन गाठी-भेटी असे कार्यक्रम करत काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी आज दिवसभर शहराच्या विविध भागात संपर्क साधला. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त बाजीराव रस्त्यावरील जोशी यांच्या पुतळ्याला सकाळी कलमाडी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मधुकर निरफराके, दत्ता शिंदे, काकी पायगुडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. माजी महापौर दत्ता एकबोटे, दत्ता गायकवाड, विरोधी पक्षनेते आबा बागूल, नगरसेवक वीरेंद्र किराड, अरिफ बागवान, तसेच डॉ. सतीश देसाई, संदेश दिवेकर, बच्चूशेठ घुगरुवाले, जयंत गावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पर्वती परिसरात ‘मनसे’ची पदयात्रा
पुणे, १ एप्रिल/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणजित शिरोळे यांनी आज पर्वती परिसरामध्ये पदयात्रा काढून प्रचार केला. शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेच्या शिरोळे यांच्याकडून दुचाकी रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी वाडय़ा-वस्त्यांमध्ये पदयात्रा काढण्यात येत आहेत. पर्वती परिसरातील जनता वसाहत आदी ठिकाणी मनसेने प्रचार केला. सरचिटणीस दीपक पायगुडे, शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, रवींद्र धंगेकर, पर्वती विभागाचे अध्यक्ष भाऊ गदादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

लांडे यांनी घेतली प्रधान सरांची भेट
हडपसर, १ एप्रिल/वार्ताहर

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज हडपसर येथे येऊन ज्येष्ठ विचारवंत प्रा. ग.प्र. प्रधान, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राम तुपे यांची खास भेट घेऊन त्यांचे आशीवार्द घेतले व त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. या वेळी प्रा. ग. प्र. प्रधान सरांनी त्यांच्या विजयासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक चेतन तुपे, प्रवीण तुपे, विजय मोरे, श्रीरंग कदम, संस्थेचे अनिल गुजर आदी बरोबर होते.

एस. एम. जोशी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
पुणे, १ एप्रिल/ प्रतिनिधी

लोकनेते एस. एम. जोशी पुतळा समिती व चंद्रशेखर मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने एस. एम. जोशी यांच्या २१०व्या स्मृतिदिनानिमित्त बाजीराव रोड येथे एस. एम. जोशी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी खासदार सुरेस कलमाडी, माजी महापौर दत्ता एकबोटे, पत्रकार चंद्रकांत दीक्षित आदी उपस्थित होते. या वेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. तसेच ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘सध्याच्या राजकारण्यांकडे इच्छाशक्ती, दूरदृष्टीचा अभाव
पुणे, १ एप्रिल/प्रतिनिधी

सध्याच्या राजकारण्यांकडे पुण्यातील प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्ती व दूरदृष्टीचा अभाव आहे, अशी टीका बहुजन समाज पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डी. एस. कुलकर्णी यांनी केली. १९७३ साली पुण्याच्या विकासासाठी आखलेला १९८० ते १९९० या दहा वर्षांसाठीचा आराखडा आजही सुरू आहे. पुण्यातील रस्ते विकास, उड्डाणपूल, बीआरटी प्रकल्प ही सारी विनोदी उदाहरणे आहेत. तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांच्या समस्याही गंभीर आहेत, असे त्यांनी कर्वेनगर परिसरातील घरकुल लॉन्स येथे आयोजित सभेत सांगितले.

मृणालिनी काकडे बारामतीतून लढणार सुप्रिया शिष्टाई निष्फळ
पुणे, १ एप्रिल / खास प्रतिनिधी

पवार-काकडे घराण्यातील राजकीय वैरभाव संपुष्टात आणण्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार व शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी माजी खासदार संभाजीराव काकडे यांची घेतलेली भेट निष्फळ ठरली. सुप्रिया यांच्या विरोधात मृणालिनी काकडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला आहे. सुळे यांच्याविरोधात कोणताच राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करीत नसल्यामुळे आम्ही उमेदवार उभा केला आहे. येत्या ४ एप्रिल रोजी आमच्या उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, असे काकडे यांनी सांगितले. पवार आणि काकडे यांच्यात पारंपरिक राजकीय वैर आहे. या वैरभावातून पवार यांना काकडे घराण्याने कायम विरोध केला आहे.