Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
क्रीडा

भारतीय संघ इतिहास घडविणार
न्यूझीलंड संघाला हवा विजय
वेलिंग्टन, १ एप्रिल / पीटीआय
पराभवाच्या खाईतून बाहेर निघून दुसरी कसोटी अनिर्णीत राखल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून इतिहास घडविण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली असल्यामुळे ही मालिका गमाविण्याची भीती भारतीय संघाला नाही तरीही कोणतीही दिरंगाई न दाखविता ३४ वर्षांनी बेसिन रिझव्‍‌र्हवर विजय मिळविण्याचे स्वप्न भारतीय संघ पाहात आहे. दुसरीकडे दुसऱ्या कसोटीत विजय मिळविण्याची संधी हुकलेला यजमान न्यूझीलंडचा संघ मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी आकाशपाताळ एक करणार आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावलेली असल्यामुळे निदान कसोटी मालिकेत प्रतिष्ठा कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

तिसऱ्या कसोटी सामन्यात मॅकक्युलमला विजयाची आशा
वेलिंग्टन, १ एप्रिल / पीटीआय

मायदेशातील थंड हवामानाचा फायदा उठवित भारताविरुद्धचा तिसऱ्या व अंतिम कसोटी सामना जिंकत मालिकेत बरोबरी राखण्याचा विश्वास न्यूझीलंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज ब्रेन्डन मॅकक्युलम याने व्यक्त केला आहे. आतापर्यंत कसोटी मालिकेत भारतीयांचेच वर्चस्व राहिले आहे. शुक्रवारी हवामान थंड राहील. अशा गोठवण्याऱ्या वातावरणाची भारतीय चमूला निश्चितच अपेक्षा नसेल. सामन्याच्या दिवशी सूर्यदर्शनही होईल की नाही याची शाश्वती नाही. पण असे हवामान राहिल्यास किवी संघाला त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मॅकक्युलम या वेळी म्हणाला.

दमछाक आणि उत्साहाची नेपियर कसोटी -ख्रिस मार्टीन
वेलिंग्टन, १ एप्रिल / पी. टी. आय.

नेपीयर कसोटीवर पूर्णपणे यजमान न्यूझीलंड संघाचेच वर्चस्व होते; पण भारतीय संघाने ही कसोटी अनिर्णीत राखत आपली सुटका करून घेतली. ही कसोटी किवी संघासाठी शारीरिक व मानसिकदृष्टय़ा दमछाक करणारी असली तरी आपण या कसोटीत वर्चस्व गाजविले ही बाब वेलिंग्टन कसोटीसाठी संघाचा उत्साह वाढवील, असे वेगवान गोलंदाज ख्रिस मार्टीन याने म्हटले आहे.

वेगवान खेळपट्टी व थंड वातावरणाची चिंता नाही - कर्स्टन
वेलिंग्टन, १ एप्रिल / पी. टी. आय.

वेगवान गोलंदाजीला सहाय्य करण्याची परंपरा लाभलेल्या बसीन रिझव्‍‌र्हच्या खेळपट्टीमुळे भारतीय संघ अजिबात विचलित झालेला नसून, येथील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी दरम्यान येथील वातावरणाशी जुळवून घेण्यात त्यांना जराही त्रास होणार नाही, असे संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी म्हटले आहे. येथील खेळपट्टी, थंड वातावरण किंवा जोरदार बोचरे वारे यावर वाद घालण्यात अर्थच नाही; पण या मैदानावर गेल्या ३४ वर्षांत भारतीय संघाला कसोटी सामना मात्र जिंकता आलेला नाही ही गोष्ट खरी आहे, असे कर्स्टन यांनी म्हटले आहे.

नदाल, फेडरर उपान्त्यपूर्व फेरीत दाखल
सोनी एरीक्सन ओपन
फ्लोरिडा, १ एप्रिल/ पीटीआय

स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदालने सोनी एरीक्सन टेनिस स्पर्धेत एकामागून एक विजय साकारीत उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. स्विर्त्झलंडच्या स्टॅनिस्लास वॉवरींकावर नदालने ७-६ (२), ७-६ (४) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. या सामन्यात नदालला १२ वेळा वॉवरींकाची सर्विस भेदण्याची संधी होती. पण त्याला फक्त एकदाच यामध्ये यश आले.

आयपीएल विजेतेपदासाठी अमरे उत्सुक
मुंबई, १ एप्रिल / क्री. प्र.

गेली तीन वर्षे मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षकपद भूषविताना मिळालेला अनुभव मला इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपद भूषविताना उपयोगी पडेल, असा विश्वास भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई रणजी संघाला ३८वे विजेतेपद मिळवून देण्यात अमरे यांचा मोलाचा वाटा होता.

सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
चाचणीत २३ जिल्ह्य़ातील १७० मल्लांचा सहभागी
पुणे, १ एप्रिल/प्रतिनिधी
उना (हिमाचल प्रदेश) येथे ४ ते ७ एप्रिल दरम्यान होणाऱ्या सब ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड आज येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी जाहीर केला. लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात झालेल्या निवड चाचणीमधून हा संघ निवडण्यात आला.

टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिरासाठी पाटकर, सहस्त्रबुद्धे यांची निवड
भारतीय संघ आज रवाना होणार
नवी दिल्ली, १ एप्रिल / पीटीआय
२०१० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय संघात माधुरिका पाटकर, पूजा सहस्त्रबुद्धे यांची निवड झाली आहे. हे शिबिर उद्यापासून चीनच्या राष्ट्रीय टेबल टेनिस सेंटर येथे सुरू होत आहे. वीसजणांच्या भारतीय संघात ऑलिम्पिकपटू अचंता शरथ कमाल व महिला गटातील राष्ट्रीय विजेती कुमारसेन शामिनी यांचा समावेश आहे.

आशियाई गोल्फ स्पर्धेत रशीद खान विजयी
नवी दिल्ली, १ एप्रिल/पीटीआय

भारताच्या रशीद खान याने फाल्दो चषक आशियाई ग्रां.प्रि. गोल्फ स्पर्धेत विजेतेपद राखले. या स्पर्धेत विजेतेपद राखणारा तो पहिलाच खेळाडू आहे. ही स्पर्धा मिशन हिल्स (चीन) येथे आयोजित करण्यात आली होती. रशीदने एलजी चषक हौशी खेळाडूंच्या स्पर्धाच्या मालिकेत यंदा चार विजेतेपदांची कमाई केली. चीनला रवाना होण्यापूर्वी त्याने एलजी रामबाग खुली स्पर्धा जिंकली होती. मिशन हिल्स स्पर्धेत त्याने २११ पेनल्टी गुण नोंदविले.

पेसचे आव्हान संपुष्टात
फ्लोरिडा, १ एप्रिल/ पीटीआय

चौथ्या मानांकित लिएन्डर पेस आणि त्याचा झेक प्रजासत्ताकचा सहकारी लुकास ड्लॉही यांचे मयामि टेनिस स्पर्धेतले आव्हान आज अखेर संपुष्टात आले आहे. पेस-ड्लॉही जोडीचा बिगर मानांकित फ्रॅन्टीसेक सेरमार्क आणि मिशेल मर्टीनेक जोडीने दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पेस-ड्लॉही जोडीने सामन्यामध्ये बऱ्याच संधी गमावल्या आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाला. पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये सेरमार्क-मर्टीनेक जोडीने पेस-ड्लॉही जोडीच्या दोन सव्‍‌र्हिस भेदून सामन्यावर सहज वर्चस्व मिळविले. पेस-ड्लॉही जोडीला सव्‍‌र्हिस जास्त प्रभावी करता आली नसली तरी त्यांना सेरमार्क-मर्टीनेक जोडीवर आक्रमण करणेही जमले नाही. त्याचबरोबर पेस-ड्लॉही जोडीचा बचावही या सामन्यात चांगला झाला नाही. दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या महेश भूपतीचे आव्हान संपुष्टात आले होते, आज पेसही स्पर्धेतून बाबेर पडला असून भारतीयांच्या साऱ्या नजरा आता सानिया मिर्झावर खिळल्या आहेत. सानियाने तैवानच्या चुंग चिया-जंगच्या साथीने स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.