Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

मराठी शाळांच्या नशिबी टाळेबंदी सत्ताधारी शिवसेनेची करामत
दिलीप शिंदे
मराठी अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या शिवसेनेने मराठी विद्यार्थ्यांची गळचेपी करण्यास सुरुवात केली असून खासगी संस्थेच्या इंग्रजी शाळेसाठी चक्क ठाणे महापालिकेच्या मराठी शाळेला टाळे ठोकले. आणखी काही शाळा याच पध्दतीने बंद होणार आहेत. एकीकडे शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे वेशीवर टांगले जात असताना, शाळांच्या इमारती खासगी संस्थांना आंदण देण्याचा सपाटा सत्ताधारी शिवसेनेने लावल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाच्या भ्रष्ट आणि गलथान कारभारामुळे महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे.

ठाण्यात १७ एप्रिलपासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’
ठाणे/प्रतिनिधी

मराठी लघुउद्योजकांनी व्यवसायात उभे राहावे आणि नवीन व्यापाराला संधी मिळवून देण्यासाठी मराठी व्यापारी मित्रमंडळातर्फे येत्या १७ ते २७ एप्रिलदरम्यान ठाण्यात महाराष्ट्र व्यापारी पेठेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी तरुणांनी व्यापारधंद्यात उतरून मोठे उद्योजक व्हावे, यासाठी कार्यरत असणाऱ्या मराठी व्यापारी मित्रमंडळातर्फे गेली १९ वर्षे मुंबईत दादर येथे व्यापारी पेठेचे आयोजन केले जाते.

पाणीयोजना पाण्यात!
रमेश पाटील

२००५-०६ या वर्षी आदिवासी उपयोजनेंतर्गत वाडा तालुक्यातील २४ नळपाणी पुरवठा योजनांसाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. परंतु येथील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित गावांतील पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजनांचा पुरता बोजवारा उडाला असून, निम्म्या पाणीयोजनाही आजतागायत पूर्ण झालेल्या नाहीत. मात्र या योजनांवर लाखो रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आल्याने ते पैसे अक्षरश: पाण्यात गेले आहेत.

ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेने उभारली वैचारिक गुढी
ठाणे/प्रतिनिधी

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेनेकडून मराठी वृत्तपत्रांची प्रतिकात्मक वैचारिक गुढी उभारण्यात आली होती.

डोंबिवली नागरी बँक पनवेलमध्ये
पनवेल/प्रतिनिधी

१९७० पासून कार्यरत असणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन मंगळवारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या हस्ते करण्यात आले. पनवेलमधील गोखले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी बँकेचे सदिच्छादूत आणि संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी, उद्योजिका मीनल मोहाडीकर, बँकेचे अध्यक्ष उदय कर्वे, तसेच आजी-माजी संचालक उपस्थित होते.

ठाणे महापालिकेची जकात घटली
ठाणे/प्रतिनिधी : ठाणे महापालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या जकात विभागाला आर्थिक मंदीचा फटका बसला असून, काल संपलेल्या आर्थिक वर्षांत सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका पालिकेत बसला आहे. मात्र राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत पालिकेस अधिक उत्पन्न मिळाले आहे. जकात विभागास यंदा ३८४ कोटींचे वार्षिक उद्दिष्ट देण्यात आले होते, मात्र ऑक्टोबरपासून जाणवू लागलेल्या आर्थिक मंदीनंतर पुनर्विनियोजना दरम्यान या विभागास ३६५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गेले तीन महिने जकात विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी विविध पातळ्यांवर मोहीम हाती घेऊनही त्यांना उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही. काल संपलेल्या आर्थिक वर्षांअखेर जकात वसुली ३४१ कोटी ४६ लाख झाली असून, त्यात मार्गस्थ फीपोटी ४७ कोटी ८२ लाख रुपयांचा समावेश आहे. जकात वसुलीचे हे प्रमाण ९३.६ टक्के असून, मागील वर्षांच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक मंदीमुळे बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. जकातीचे ३० टक्के उत्पन्न बांधकाम साहित्यातून मिळते, मात्र यंदा सुमारे ३० कोटी रुपये कमी मिळाले असून, आयटी कंपन्यांकडूनही १० ते १२ कोटी रुपये कमी मिळाले आहेत. मात्र राज्यात मुंबई हापालिकावगळता कोणत्याच महापालिकेस अपेक्षित उत्पन्न मिळाले नसून, ठाण्याची परिस्थिती इतर मनपापेक्षा बरी असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.मालमत्ता करवसुली विभागाने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी गेला महिनाभर धडक मोहीम राबविली होती. अनेकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. मात्र याही विभागाला उद्दिष्टपूर्ती करता आली नाही. मालमत्ता करापोटी १५७ कोटी, तर पाणीपट्टीपोटी ५८ कोटी रुपये जमा झाले. अर्थात गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली वाढली आहे.