Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
व्यक्तिवेध

‘अ‍ॅण्ड आय शॅल लाफ विथ अ बिटर लाफ’- हे निकोलाय गोगोलचे शेवटचे शब्द. त्याच्या मॉस्कोमध्ये असलेल्या कबरीवरही ते कोरलेले आहेत आणि आता त्याच्या दुसऱ्या जन्मशताब्दी वर्षांत ते शब्द पुन्हा आपल्या अर्थवत्तेचा प्रत्यय देत आहेत! गोगोलसारख्या जगप्रसिद्ध नाटककार- प्रहसनकार- कथाकाराला शोभावी अशीच ही नाटय़पूर्ण घटना! गोगोल कुणाचा असे वादंग दोन देशांदरम्यान माजले आहे. गोगोल म्हणजे ‘इन्स्पेक्टर जनरल’ म्हणजेच ‘अंमलदार’ हे समीकरण नाटय़प्रेमी महाराष्ट्राच्या डोक्यात पक्के बसलेले आहे. गोगोलचे मूळ रशियन भाषेतले हे नाटक जगातल्या असंख्य भाषांतून नाटकांच्या, चित्रपटांच्या आकृतिबंधात, विविध अवतारांत गेल्या दोनशे वर्षांत असंख्य वेळा पुन: पुन्हा जन्माला येत राहिले आहे. इतका त्यातला उपरोध धारदार, सार्वकालिक आणि सार्वदेशिक आहे. महाराष्ट्राला गोगोलची आणखी

 

ताजी दुसरी ओळख म्हणजे त्याच्या ‘अ टेल ऑफ हाउ इव्हान इव्हानोविच क्वारल्ड विथ इव्हान निकिफोरोविच’ या कलाकृतीवरून अरुण खोपकरांनी बनवलेला ‘कथा दोन गणपतरावांची’ हा चित्रपट. ‘तारास बुल्बा’ ही गोगोलची प्रसिद्ध कादंबरी. दिग्दर्शक जे. ली थॉम्पसनने युल ब्रायनर आणि टोनी कर्टिसला घेऊन या कादंबरीवर १९६२ मध्ये बनवलेला चित्रपटही गाजला होता. झुम्पा लाहिरीच्या ‘नेमसेक’मध्ये मुलाचे नावही ‘गोगोल’ ठेवले आहे! खरे तर ‘इन्स्पेक्टर जनरल’ हे एकच नाटक लिहिले असते तरी हा रशियन लेखक अजरामर झाला असता. अर्थात आता त्याला ‘रशियन’ म्हणायचे की नाही, हाच तर मोठा वाद त्याचे दुसरे जन्मशताब्दी वर्ष सुरू होता होता सुरू झाला आहे! निकोलाय गोगोलचा जन्म झाला १८०९ साली सध्याच्या युक्रेनमध्ये- सोरोचिन्त्झी गावात. त्यावेळेला हा झारच्या रशियन साम्राज्याचा भाग होता. वयाच्या १२ व्या वर्षी तो कीव्ह (आजच्या युक्रेनची राजधानी) जवळच्या एका शहरातल्या शाळेत जाऊ लागला. अभ्यासात अजिबात रस नव्हता, पण सुदैवाने शाळेत थिएटर होते, नाटके व्हायची आणि गोगोलला हवे ते वातावरण मिळाले. १९ व्या वर्षी गोगोल पीटर्सबर्गला आला. आधुनिक रशियन साहित्याचा अध्वर्यू पुष्किन याच्या सहवासात तो आला आणि त्याच्या प्रेरणेनेच ‘इन्स्पेक्टर जनरल’ हे नाटक आणि ‘डेड सोल्स’ ही कादंबरी त्याने लिहिली. नंतरच्या आयुष्याचा बराच काळ त्याने जर्मनी, स्वित्र्झलड, फ्रान्स, इटली असा फिरण्यात घालवला. अमेरिकेला जायला म्हणून बोटीत बसलेला गोगोल बोट लागल्यामुळे आणि मायभूमीची आठवण यायला लागल्यामुळे अध्र्या वाटेतूनच परत फिरला. रशियन भाषेतल्या त्याच्या पुस्तकांचे त्याच्या हयातीतच फ्रेंच, जर्मन भाषांत अनुवाद झाले. ‘इन्स्पेक्टर जनरल’, ‘डेड सोल्स’, ‘द नोज’सारख्या साहित्यकृतींतून रशियन समाजाचे, प्रशासन यंत्रणेचे, सामान्यांच्या आणि अधिकारी वर्गाच्या परस्परसंबंधांचे खुमासदार आणि धमाल औपरोधिक चित्रण गोगोलने केले, तसेच ‘इव्हिनिंग ऑन द फार्म नियर डिकान्का’सारख्या साहित्यकृतीतून युक्रेनियन संस्कृतीचेही चित्रण केले. त्याचा तारास बुल्बा हा युक्रेनमधल्या लोकजीवनातलाच नायक आहे. उत्तरायुष्यात गोगोल रहस्यवादाकडे वळला. मॉस्कोमध्ये त्याचे १८५२ साली निधन झाले. गेल्या शतकाअखेर सोविएत रशियाचे विघटन झाले आणि युक्रेन हा स्वतंत्र देश झाला. त्यामुळे आता गोगोलची दुसरी जन्मशताब्दी साजरी करताना युक्रेन आणि रशिया हे दोन ‘गणपतराव’- नव्हे, देश गोगोलवर आपला हक्क सांगण्यासाठी भांडत आहेत. रशियाने गोगोल म्युझियमचे उद्घाटन करीत आणि ‘तारास बुल्बा’वरच्या टीव्ही-शोची निर्मिती करीत बाजी मारायचा प्रयत्न केला आहे, तर युक्रेनने गोगोलचे जन्मगाव ज्या पोलतावा भागात आहे तिथे गोगोल महोत्सव आयोजित केला आहे. व्लादिमिर यावोरिवस्की या युक्रेनियन कादंबरीकाराने म्हटले आहे की, गोगोल हा जर वृक्ष असेल, तर त्याचा शेंडा रशिया हा असला तरी त्याची मुळे युक्रेनमध्ये आहेत आणि गोगोलचे विभाजन करणे म्हणजे हवेचे, आकाशाचे, चिरंतनाचे विभाजन करण्याचा प्रयत्नच होय. तेच खरे आहे. कारण गोगोलसारखा कलावंत जेव्हा काळावर मात करून उरतो; साऱ्या देशांमध्ये साऱ्या समाजांमध्ये आणि संस्कृतींमध्ये पोहोचतो आणि रुजतो तो जगाचा नागरिक म्हणूनच ओळखला गेला पाहिजे.