Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९

रजेगावजवळ अपघातात तिघे ठार
गोंदिया, १ एप्रिल / वार्ताहर

गोंदिया-बालाघाट मार्गावरील रावणवाडी व रजेगाव दरम्यान मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात रजेगाव येथील तीन तरुण ठार झाले. रजेगाव येथील माणिकचंद तामराज रहांगडाले (२६), योगेश नत्थू बिसेन (२७) व देवेंद्र मयाराम बिसेन (२४) मंगळवारी धापेवाडा येथे एका लग्न समारंभात जाण्यासाठी गावावरून ७.३० वाजताच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एम.एच.३५ एच. २१९२) ने निघाले. रजेगाव-गोंदिया मार्गावरील प्लायवुड फॅक्टरीसमोर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की तिघेही घटनास्थळीच ठार झाले. दोघांच्या डोक्यांचा चेंदामेंदा झाला.

‘आभाळाचं पान’ कथासंग्रहाचे प्रकाशन
नागपूर, १ एप्रिल /प्रतिनिधी

श्रीकांत गोपाळ मुळे लिखित ‘आभाळाचं पान’ या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक व लेखक ह. मो. मराठे यांच्या हस्ते झाले. सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राम शेवाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार रवींद्र शोभणे, लेखक श्रीकांत गोपाळ मुळे आणि इला मुळे उपस्थित होते. रवींद्र शोभणे यांनी दीर्घ व लघुकथेची मीमांसा करून मुळे यांच्या ‘कथा गोठवलेल्या आयुष्याची’, ‘झेला’ आणि ‘आभाळाचं पान’ या तीन कथांवर विस्तृत भाष्य केले.

प्रचारासाठी केवळ १३ दिवस; उमेदवारांची होणार दमछाक
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या, गुरुवारी अखेरचा दिवस आहे. प्रचाराला जोमाने सुरुवात झाली असली तरी, प्रत्यक्षात प्रचारासाठी फक्त १३ दिवस मिळणार असल्याने उमेदवार व प्रचारकांची दमछाक होणार आहे. १६ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असल्याने विदर्भात सर्वत्र प्रचाराला वेग आला आहे. बहुतेक सर्वच मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती अपेक्षित आहेत. उन्हाच्या तडाख्यात प्रचारकांना प्रचार तोफा सांभाळाव्या लागतील. पदयात्रांच्या माध्यमातून ‘वारे पंजा आ गया पंजा’, ‘वारे घडी आ गयी घडी’, ‘वारे कमल आ गया कमल’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘बहेनजी के सम्मान मे बीएसपी मैदान में’ याशिवाय ‘आगे बढो’, ‘जिंदाबाद’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्याचे काम प्रचारक करत आहेत. ऑटोरिक्षा, सायकल रिक्षावर ध्वनिक्षेपक लावूनही प्रचार सुरू झाला आहे.

भंडाऱ्यात ग्राहक तक्रार निवारण समिती
भंडारा, १ एप्रिल / वार्ताहर

जिल्ह्य़ात घरगुती गॅस, केरोसिन तसेच रेशन दुकानातील धान्य वेळेवर व्यवस्थित न मिळणे त्यातील अनियमितता याबद्दल असलेल्या मोठय़ा तक्रारीच्या निमित्ताने ग्राहकांकरिता तक्रार निवारण समिती घोषित झाली असून खालील कार्यकारिणीकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष मो. आबिद सिद्धीकी यांनी केले आहे. कार्यकारिणी अशी- अध्यक्ष- मो. आबिद सिद्धीकी, सचिव- अनिल गायधने, उपाध्यक्ष- मुकेश थानथराटे, कुंदा वैद्य, तुमसर. विकास मदनकर, भंडारा. सहसचिव-शोभा मारुती बुरडे, मोहाडी. सहसचिव- मो. अलताफ लाखनी, कायदेविषयक सल्लागार- रमेश छोटेलालजी पशिने, भंडारा. कोषाध्यक्ष- प्रवेज खान, सदस्य- लतीफ सौदागर , शेख रहीम , सय्यद नईम हसन अली , भागवत तुळशीराम बाभरे , प्रिया सूर्यवंशी भंडारा, कलाम शेख यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

डॉ. चिन्नावार यांना समाजसेवक पुरस्कार
उमरखेड, १ एप्रिल / वार्ताहर

येथील समाजसेवी इंडियन मेडिकल असोसिएशन उमरखेड शाखेचे अध्यक्ष डॉ. एम.एम. चिन्नावार यांना ‘मौलाना अब्दुल कलाम आझाद आदर्श समाज सेवक पुरस्कार’ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे ‘नॅशनल युथ असोसिएशन’ या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. अर्शद यांच्या उपस्थितीत केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. त्यांनी जवळपास ३५ हजार पेक्षा जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

साक्षगंधासाठी जाणाऱ्या गाडीला अपघात; ११ जखमी
खामगाव, १ एप्रिल / वार्ताहर

मुलाच्या साक्षगंधासाठी जात असलेल्या वाहनाला अपघात होऊन ७ जण जखमी झाल्याची घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुक्यातील भालेगाव येथे घडली. सुबेदाबी शे. लाल (६५), रहिसाबी अनीस खां (२८), नर्गिस बी. शब्बीर खां(४०), जैबीनीसा अ. समीर (२३), अमिनाबी शे. गणी (६२), जमीलाबी शे बशीर (४०) व आसीफखां अनीस खां (१२) जखमी झाले. खेट्टी शहापूर येथे साक्षगंधाला हे सर्व जात होते. समोरून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हे वाहन उलटून ११ जण जखमी झाले. जखमींना येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी नर्गिस खां, रहिसाबी, अबिलाबी, यास्मीनबी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. तर गाडी चालकावर कार्यवाही करण्यात आली आहे.

लग्नात नाचण्यावरून दोन गटात हाणामारी
खामगाव, १ एप्रिल / वार्ताहर

लग्नात नाचण्यावरून विकोपाला जाऊन सोमवारी दाळफैल भागात हाणामारी होऊन तुरळक दगडफेक झाली. वेळीच शिवाजीनगर पोलीस ताफ्यासह दाखल झाल्याने जमाव पांगला.
रविवारी या परिसरात विवाह समारंभ होता. यात नाचण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्यावेळी समाजातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. मात्र, सोमवारी हा वाद पुन्हा उफाळून आल्याने दाळफैल भागात हाणामारी झाली. यावेळी जमावाकडून दगडफेकही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सूर्यवंशी, पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी तातडीने जमावाला पांगवले. यामुळे मोठा संघर्ष टळला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील चौघांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

लग्न न झाल्याने तरुणाची आत्महत्या
साकोली, १ एप्रिल / वार्ताहर

विहीरगाव (कन्हाळ्या) येथील एका तरुणाने लग्न न झाल्याने आत्महत्या केली. विहीरगावचा सुनील अनिरुद्ध शहारे हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता. यावर्षी लग्न करायचे म्हणून मुली बघण्यासाठी तो सुटी काढून स्वगावी आला होता. सुटय़ांचा कालावधी संपत आला तरी लग्न न जुळल्याने चिंताग्रस्त झालेल्या सुनीलने गळफास लावून आत्महत्या केली. अनिरुद्ध शहारे यांना ४ मुले आहेत. सुनील हा त्यांचा सर्वात लहान मुलगा होता. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

धाबेकर, धोत्रे कोटय़धीश; आंबेडकर लखपती!
अकोला, १ एप्रिल/प्रतिनिधी

अकोला लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांच्याकडे ३ कोटी ३२ लाख, भाजप-सेना युतीचे संजय धोत्रे यांच्याकडे १ कोटी ९२ लाख तर भारिपबमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ६१ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे निवडणूक विभागाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन उघड झाले आहे.

तेव्हा झुंजल्या पराभवासाठी; आता झुंजणार विजयासाठी
यवतमाळ, १ एप्रिल / वार्ताहर

नियतीसुद्धा राजकारणात भल्याभल्यांचा कसा सूड घेते याचा मोठा मजेदार पण, धक्कादायक अनुभव यवतमाळ-वाशीम या नव्यानेच अस्तित्वात आलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपपासून तर काँग्रेसपर्यंत आणि शिवसेनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंतचे नेते घेत आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या केवळ एक तासाच्या यवतमाळ दौऱ्यामुळे १९९९ च्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप उमेदवार हरिभाऊ राठोड यांचा काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांनी १५ हजार २६६ मतांनी पराभव केला होता.

उमेदवार रिंगणात नसल्याने तिसऱ्या आघाडीचे कार्यकर्ते सैरभर
प्रशांत देशमुख, वर्धा, १ एप्रिल

वर्धा लोकसभा मतदार संघात यावेळी प्रथमच तिसऱ्या आघाडीचा उमेदवार रिंगणात नसल्याने कार्यकर्ते सैरभर झाल्याचे चित्र आहे. तिसऱ्या आघाडीचा ‘लोचा झाला रे’ची चर्चा सर्वत्र आहे.
आजवर वर्धा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व प्रामुख्याने डावी आघाडी किंवा जनता दल करीत असे. माकप नेते रामचंद्र घंगारे यांनी काँॅग्रेस विरोधाचा बिगुल सदैव निनादत ठेवला. त्यांच्या पश्चात त्यांचे पट्टशिष्य यशवंत झाडे हा ढासळता बुरूज सांभाळतात, मात्र रिंगणात दत्ता मेघेंची उपस्थिती असल्यावर ‘विळा हातोडा तारा’ अदृश्य होतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

मामा-भाचीच्या गुगलीने काँग्रेसी ‘फलंदाज’ गोंधळले
चंद्रशेखर बोबडे, नागपूर, १ एप्रिल

बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या प्रमुख आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे आणि त्यांचे मामा व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. सुलेखा कुंभारे यांनी दोन्ही मतदारसंघातून माघार घ्यावी, असे प्रयत्न काँग्रेस उमेदवारांनी चालवले आहेत. मात्र त्यांनी अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, रामटेक मतदारसंघात जोगेंद्र कवाडे यांना पाठिंबा देऊन सुलेखा कुंभारे नागपुरातून लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

भाजप-सेना पदाधिकाऱ्यांच्या सभा
अक ोला लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी अकोला शहरात ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या. संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. खदान येथे पार पडलेल्या सभेला सुहासिनी धोत्रे, माजी महापौर सुमन गावंडे, नगरसेवक संजय बडोणे, दर्शना राजूरकर, लता गावंडे, शीला खेडकर, वर्षां धनोकार, माधुरी बडोणे, अर्चना धोत्रे, नीलिमा नाकाडे यांची उपस्थिती होती. जुने शहरातील वाशीम बायपास भागात पार पडलेल्या भाजपच्या सभेला गंगादेवी शर्मा, उषा मोळके, संगीता कांबळे, विशाखा खोत, रमा खंडारे, कल्पना डहाके, सिंधू डावरे, विमल इंगळे, लक्ष्मी राऊत, सुरतकर, चारुशीला ढगे, सुनिला मेटांगे, प्रभावती जाधव, उर्मिला ठाकूर, मालती म्हैसने, सुनंदा चांदुरकर, नीलिमा तिजारे, मीना फड, कमला सांगळुदकर, संगीता जुनगडे, सरला गवई, वनिता सोनोने या महिला उपस्थित होत्या.

जाधवांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; मुस्लिम कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश
चिखली, १ एप्रिल/ वार्ताहर

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी प्रताप जाधव व शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत तालुक्यातील शेकडो मुस्लिम युवक व महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ही बाब काँग्रेस व राकाँसाठी आत्मचिंतन करणारी ठरली आहे. या मुस्लिम कार्यकर्त्यांसोबत माजी सरपंच दिलीप चिंचोले, काँग्रेस नेते नरेंद्र खेडेकरांचे कट्टर समर्थक अ‍ॅड. अनिल कऱ्हाडे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश घेतला. मुस्लिम युवक व महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश उल्लेखनीय ठरला आहे. वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुवा जवंजाळ यांनी भाजप- सेना युतीसोबतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला.