Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
कालिंदी : माधुरी, कालिंदी बोलतेय.
माधुरी : हं, बोल गं कालिंदी. कशी आहेस? आणि कसं झालं मितालीचं लग्न?
कालिंदी : लग्न अगदी छान झालं गं. खोट काढायला म्हणशील तर अजिबात जागा नाही..पण..
माधुरी : बाई, बाई, या देवकी पंडितच्या ‘पण’ची लागण हल्ली सगळ्यांना झालीये. आता तू का एवढा लांब ‘पण’ लावला आहेस ते तरी सांग.
कालिंदी : अगं, ‘लग्ना’ला जाऊन आले, पण ‘लग्ना’ला गेल्यासारखं वाटलंच नाही बघ!
माधुरी : हे काय भलतचं! नक्की काय म्हणायचंय तुला?
 
कालिंदी : कसं सांगू तुला? मला स्वत:लाच नीटसं कळत नाहीये, काय नेमकं कमी होतं!
माधुरी : म्हणजे काय? विधिपूर्वक झालं नाही का?
कालिंदी : छे गं! अगं, सगळं अगदी साग्रसंगीत - मी मगाशी म्हटलं तसं खोट काढायला जागा नाही,की बोट ठेवायला जागा नाही. सगळे विधी रीतसर, जेवणाखाण्याची चंगळ ..सगळं कसं अगदी आखीव, रेखीव, सुबक..
माधुरी : मग तरी तुझा आवाज का असा अलिप्त?
कालिंदी : अलिप्त? एक्झ्ॉक्टली. हीच भावना मनात होती, पण शब्दात पकडता येत नव्हती. आता सापडला परफेक्ट शब्द मनातल्या अस्वस्थतेसाठी.
माधुरी : अलिप्त, अस्वस्थ.. काय चाललंय काय तुझं कालिंदी?
कालिंदी : मितालीचं लग्न म्हणजे ना, एखादी फिल्म बघून आल्यासारखं वाटतंय. अगदी ‘हम आपके है कौन..’ किंवा तत्सम चित्रपट किंवा मालिका. ते मेहेंदी - संगीत - जुते पळवणं - डिझायनर कपडे - व्हिडिओ शूटिंग..
माधुरी : अगं, पण हल्ली सगळ्याच मुला-मुलींना अशीच लगं्न हवी असतात.
कालिंदी : आपली मुलं ना, परधार्जिणी झाली आहेत. त्यांना सगळ्या दुसऱ्यांच्या परंपरा आवडतात.
माधुरी : तर काय! आपल्या भोंडल्याला नाकं मुरडतात, पण गरब्याला मात्र डोक्यावर घेतात.
कालिंदी : तीच गोष्ट मेंदीची. मेहेंदी आणि संगीत ही पण उत्तरेकडची पद्धत.
माधुरी : नाही गं. मेंदी तर आपल्याकडेही काढतात की!
कालिंदी : हो, पण ती ‘मेंदी’. मेंदीची नुसती ‘मेहेंदी’ झाली की, सगळे संदर्भ बदलतात. मेंदीचा आपल्याकडे एवढा मोठा सोहळा किंवा सोपस्कार थोडाच असतो? आता बघ, मेहेंदीसाठी खास मेंदी काढणारी मुलगी येते. मग जोडीला ‘संगीत’ असतं, नाच-गाणी असतात. एवढा सगळ्यांना खाणं-पिणं ‘मस्ट’च. तेही पोहे- उपमा - शिरा नाही बरं का! त्यासाठी ‘चाट’च पाहिजे. आता मितालीच्या लग्नात नुसत्या मेंदी.. सॉरी त्याला ‘मेंदी’ म्हणायचं पण नाही, तर ‘मेहेंदी’ चा खर्च किती आला असेल?
माधुरी : किती?
कालिंदी : ७० हजार.
माधुरी : ७० हजार? अगं आपलं लग्न ७० हजारात झालंय!
कालिंदी : तो तर आता भूतकाळ झालाय. आपल्यावेळची लगं्न आणि आताची लगं्न यात जमीन-अस्मानाचा फरक पडलाय. लग्नासाठी कोरिओग्राफर अपॉईंट केल्याचं कधी ऐकलं आहेस?
माधुरी : कोरिओग्राफर आणि लग्नासाठी? तो कशाला?
कालिंदी : कशाला म्हणजे काय? नाच शिकवायला. कोरिओग्राफर काय स्वयंपाक शिकवणार आहे का?
माधुरी : तसं नाही गं. पण ती मंडळी नॉर्थकडची असतील. त्यांच्याकडची लगं्न म्हणजे नाचगाण्याशिवाय होतच नाहीत.
कालिंदी : लग्नच कशाला? कुठलाच सण त्यांच्याकडे नाच-गाण्याशिवाय होत नाही. नाच-गाणी हा त्यांच्या कार्यक्रमांचा अपरिहार्य भाग असतो. पण त्यामुळे नाचणं अगदी त्यांच्या रक्तातच भिनलेलं इसतं. लहानपणा-पासूनच त्यांच्या अंगात लय असते. त्यांना नाही नाचायला शिकवावं लागत. याउलट आपलं तसं नसतं.
माधुरी : चारचौघात नाचायची आपल्याला लाजही वाटते नाही..
कालिंदी : ती आपल्या पिढीला गं. नवीन पिढीला नाही. बिनधास्त नाचतात.
माधुरी : याचा अर्थ आपल्या पिढीला नाचायला आवडत नाही, अशातला भाग नाही हं!
कालिंदी : म्हणूनच तर मितालीच्या मैत्रिणीच्या लग्नात चक्क कोरिओग्राफरच नेमला होता. कोंबडी पळाली, कजरारे, ढिपाडी ढिपांग अशा टिपिकल गाण्यांवर त्यानं छान स्टेप्स बसवल्या होत्या. मिताली, मेघा सगळ्याजणी जात होत्या शिकायला.
माधुरी : बाई, बाई, ऐकावं ते नवलच. म्हणजे आता हळूहळू ब्यूटिशियन, मेहेंदीवाली, संगीतवाले, बँड यांच्या जोडीला कोरिओग्राफर्सही बोलवण्याची फॅशन रूढ होईल.
कालिंदी : होईल; सांगता येत नाही. हल्ली कोणीतरी काही तरी टूम काढतं आणि सगळे त्याच्या मागं धावायला लागतात. बघता बघता ती गोष्ट, ती पद्धत, केव्हा फॅशन होऊन जाते कळतही नाही.
माधुरी : त्यासाठी चित्रपट आणि मालिका मसाला पुरवतच असतात.
कालिंदी : हो नं! हल्लीच्या पिढीच्या मनावर चित्रपट - मालिकांमधील लग्नांचा इतका प्रभाव असतो ना,की विचारूच नकोस. आता मितालीचंच बघ ना! तिनं सांगूनच टाकलं होतं की, मला अगदी साग्रसंगीत लग्न हवं.
माधुरी : पण रश्मी मात्र याच काळातली असूनही तिचे विचार अगदी वेगळे आहेत.
कालिंदी : हो गं. रश्मी आणि मितालीचं लग्न म्हणजे दोन टोकं होती. वास्तविक रेखालाही पैशाला काही कमी नाही. पण तिनं नाही असं श्रीमंतीचं प्रदर्शन मांडलं.
माधुरी : रेखानं आधीच ठरवून टाकलं होतं; मुलीच्या आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात आनंदात व्हावी, या कल्पनेतून जेवढं करायला पाहिजे तेवढच करणार. उगीच वायफळ खर्च नाही करणार. आणि तुला म्हणून सांगते, रश्मीच्या लग्नाच्या निमित्तानं तिनं एक लाख रुपयांची देणगी आसरा अनाथाश्रमाला दिली आहे.
कालिंदी : हो. त्यासाठीच तिनं तो कलश ठेवला होता ना लग्नात.
माधुरी : अग, तो वेगळा. ते केवळ लोकांना अगदीच रिकाम्या हाती लग्नाला जायला आवडत नाही ना, म्हणून तिनं ती कलशाची कल्पना काढली होती. त्या कलशात जमा झालेले पैसे तर तिनं अनाथाश्रमाला दिलेच; पण स्वत:च्या खिशातून लाख रुपयांची देणगी दिली.
कालिंदी : काय सांगतेस? हे नव्हतं आम्हाला माहीत..
माधुरी : कसं माहिती असेल? या गोष्टी स्वत:च्या तोंडानं बोलून प्रसिद्धी मिळवणारी रेखा आहे का? मलाही बोलली नव्हती. परवा जुने कपडे द्यायला अनाथाश्रमात गेले होते, तेव्हा वझेबाई म्हणाल्या; तेव्हा मला कळलं.
कालिंदी : घ्या. आजच्या काळात कणभर दान देऊन मणभर प्रसिद्धी मिळवणाऱ्यांचा जमाना असताना रेखासारखी बाई विरळाच म्हणायची नाही का?
माधुरी : खरं तर सगळ्यांनीच असा विचार करायला हवा. म्हणजेच गरीब- श्रीमंतांमधील दरी कमी व्हायला मदत होईल. नाही का?
कालिंदी : तू म्हणतेस ते खरंय गं, पण..
माधुरी : आता तुझा ‘पण’ नको परत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे।। आपणही रेखाच्या पावलावर पाऊल टाकूयात. बाईसाहेब, आपलीही मुलं लग्नाला आलीच आहेत की!
shubhadey@gmail.com