Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
विविध

जी-२० जाहीरनाम्याबाबत फ्रान्स, जर्मनीचा विरोधी सूर
लंडन, १ एप्रिल/पी.टी.आय.

जी-२० परिषदेच्या मसुदा जाहीरनाम्याबाबत फ्रान्स आणि जर्मनीने विरोधाचा सूर लावला आहे. वित्तीय क्षेत्रात कठोर र्निबध लागू करण्याबाबत काही देशांनी सुचविलेल्या प्रस्तावांना या देशांचा विरोध आहे. या र्निबधांमध्ये सुसूत्रता आणि समानता नाही, असे या देशांचे मत आहे. जागतिक पतपुरवठय़ासंबंधात कठोर र्निबध लागू न केल्यास या परिषदेतून अंग काढून घेण्याचा इशारा फ्रान्सचे अध्यक्ष सार्कोझी यांनी दिला आहे.

हत्याकटाची माहिती मिळाल्याने वरुण गांधी यांना इटाहला हलविले
पिलिभीत, १ एप्रिल/पी.टी.आय.

निवडणूक प्रचारसभेतील चिथावणीखोर भाषणाबद्दल ‘रासुका’खाली अटकेत असलेले भाजप उमेदवार वरुण गांधी यांच्या हत्येचा कट ‘अंडरवर्ल्ड डॉन’ छोटा शकीलने आखल्याची खबर मिळाल्याने वरुण यांना कडेकोट सुरक्षा असलेल्या इटाह येथील तुरुंगात हलविण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने मात्र वरुण यांना अंडरवर्ल्डचा धोका असल्याच्या वृत्ताचा इन्कार करीत केवळ निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी हे पाऊल उचलल्याचा खुलासा केला आहे.

सोनिया गांधी यांचे दडपण वा हस्तक्षेप नाही -मनमोहन सिंग
पंतप्रधान म्हणून मला पूर्ण निर्णयस्वातंत्र्य असून काँग्रेस अध्यक्षा व संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे माझ्यावर कोणतेही दडपण नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे. जागतिक मंदीवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पुढाकाराने आखलेल्या वित्तीय उपाययोजना २०१० पर्यंत अमलात राहिल्या पाहिजेत, असेही त्यांनी ‘जी-२०’ परिषदेच्या पाश्र्वभूमीवर ‘फायनान्शियल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.

पाकिस्तानला २.८ अब्ज डॉलरची लष्करी मदत देण्याचा अमेरिकेचा विचार
वॉशिंग्टन, १ एप्रिल/पी.टी.आय.

अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी २.८ अब्ज डॉलरची लष्करी मदत देण्याचा विचार करीत आहे. मात्र या लष्करी मदतीच्या सहाय्याने आपले सामथ्र्य वाढवून पाकिस्तानने अन्य देशांवर विशेषत: भारतावर आक्रमण करू नये याकडेही अमेरिका विशेष लक्ष पुरविणार आहे.

दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलण्यास शर्मिला टागोर उत्सुक
नवी दिल्ली, १ एप्रिल/पी.टी.आय.

चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा माझ्या मनात असली तरी दिग्दर्शनाबाबत या घडीला मी ठाम होकार वा नकार देऊ शकत नाही. दिग्दर्शन म्हणजे मोठी बांधिलकी आहे आणि आज अशी बांधिलकी जपणारे इतके धडाडीचे तरुण दिग्दर्शक तळपत आहेत की दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलावे की नाही, हा माझ्यासाठी लाखमोलाचा प्रश्न ठरला आहे, असे उद्गार प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी आज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काढले.

पाकिस्तानात ‘ड्रोन’ हल्ल्यात १२ ठार, १५ जखमी
इस्लामाबाद, १ एप्रिल/पी.टी.आय.

पाकिस्तानच्या वायव्येकडील आदिवासी भागात अमेरिकेच्या ‘ड्रोन’ विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात बाराजण ठार तर पंधरा जण जखमी झाले. तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या भागात हा हल्ला करण्यात आला असून हे ठिकाण अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे. औरकजाई आदिवासी भागातील खाडेझाई खेडय़ात असलेल्या तेहरीक ए तालिबानच्या या मुख्य तळावर हा हल्ला करण्यात आला.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची पूर्ण भरपाई
नवी दिल्ली, १ एप्रिल/पी.टी.आय.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून तसेच आरोग्य विमा कंपन्यांकडूनही वैद्यकीय खर्चाची भरपाई घेताना घातलेली आर्थिक मर्यादा उठवण्यात आली आहे. सीजीएचएस सुविधांचा लाभ घेत असलेले कर्मचारी आता वैद्यकीय विमा योजनांतूनही ही भरपाई घेऊ शकतील. फक्त होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त भरपाई घेता येणार नाही, अशी अट सरकारने घातली आहे. याआधी कर्मचाऱ्यांनी विमा कंपनीकडून मेडिक्लेम घेतली असेल व ते सीजीएचएस अंतर्गत असतील त्यांना सीजीएचएसच्या दरानेच भरपाई घेण्याची मुभा होती त्यापेक्षा जास्त दराने पैसे घेता येत नव्हते.

फिलिपाइन्समध्ये चकमकीत १२ अतिरेकी ठार
कोटाबाटो, १ एप्रिल/पी.टी.आय.

दक्षिण फिलिपाइन्समध्ये इस्लामी राष्ट्र स्थापण्यासाठी अतिरेकी कारवाया करीत असलेल्या ‘मोरो इस्लामिक लिबरेशन फ्रंट’च्या अतिरेक्यांनी एका गावावर चढविलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत १२ अतिरेकी ठार झाले तर एक सैनिक मृत्युमुखी पडला. अल्माडा गावावर अतिरेक्यांनी हल्ला चढविला होता. अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी लष्कराने हवाई हल्लेही चढविले आणि अतिरेक्यांवर मारा केला. दोन तासांच्या या चकमकीत तीन सैनिक जखमीही झाले.या संघटनेचे सुमारे १२ हजार बंडखोर दशकभरापासून स्वतंत्र इस्लामी देशासाठी घातपात करीत आहेत. त्यात आतापर्यंत सहा लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. या भागातील मुस्लिमांना राजकीय व आर्थिक सूत्रे सुपूर्द करण्याची तयारी दाखविणारा शांतता करार देशाच्या न्यायालयाने गेल्या वर्षी फेटाळल्यानंतर हिंसाचार पुन्हा सुरू आहे.

अफगाणिस्तानात ३१ तालिबानी ठार
काबूल, १ एप्रिल / पी. टी. आय.

अफगाणिस्तानातील अफू रुजविणाऱ्या हेलमंड प्रांतात काल पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत ३१ तालिबानी दहशतवादी ठार झाले, तर २० दहशतवादी जखमी झाले.
गृहखात्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार हेलमंड प्रांतातील कजाळी धरणाजवळ तालिबानी दहशतवाद्यांनी धरणाच्या सुरक्षेसाठी असलेल्या ब्रिटिश फौजा व पोलिसांना आव्हान दिले त्यामुळे चकमक सुरू झाली. अफू पिकविणाऱ्या आणि अफुचा व्यापार करणाऱ्या अफगाणी पट्टय़ात अफगाण सरकारचे नियंत्रण नसल्याचे मंत्र्यांनी या वेळी मान्य केले. या भागात अमेरिका-ब्रिटनच्या फौजांचे नियंत्रण असून, अमेरिकेचे आणखी २१ हजार सैनिक लवकरच या परिसरात यंदा येणार आहेत.