Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
व्यापार-उद्योग

‘क्रायो-सेव्ह’तर्फे वाढीव गुंतवणूक; नवीन व्यवसाय धोरणांची योजना
व्यापार प्रतिनिधी: युरोपची सर्वात मोठी स्टेम सेल कंपनी क्रायो-सेव्ह समूहाने क्रायो सेव्ह इंडिया या आपल्या १००टक्के सहाय्यक कंपनीमधील आणि एकूणच आशिया पॅसिफिक क्षेत्रामधील गुंतवणूक वाढविण्याची आपली योजना असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्हीही उच्च विकासक्षमता असलेल्या बाजारपेठांमधील वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी दोन दशलक्ष युरो तर भारतातील कामकाजासाठी ३६ महिन्यांमध्ये दोन दशलक्ष युरो इतकी गुंतवणूक क्रायो-सेव्ह समूहातर्फे करण्यात येईल. जन्माच्या वेळेस बाळाच्या नाळेमध्ये उपस्थित असलेल्या स्टेम सेल्समध्ये जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या आजार, जखमा आणि अपंगत्व यांच्यावर वेगाने मात करण्याची क्षमता असते. अनेक विकसनशील देशांमध्ये हे सत्य आता स्वीकारले जाऊ लागले आहे. त्यामुळे क्रायो-सेव्ह समूहासाठी व्यवसाय संधींचे नवे दालन खुले होत आहे. विक्री आणि विपणन कामकाजामध्ये सुधारणा आणण्यासाठी आणि आशिया पॅसिफिक ग्राहकांसाठी अभिनव उत्पादने आणि सेवा यांचे निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुंतवणुकीमध्ये वाढ करणे हा क्रायो-सेव्हच्या नवीन व्यवसाय योजनेचा एक भाग आहे.

एनसीडीईएक्स स्पॉटचा रिद्धी सिद्धी बुलियनशी करार
व्यापार प्रतिनिधी: एनसीडीईएक्स स्पॉट एक्सचेंज लिमिटेडने भारतीय बाजारपेठेमधील आघाडीची बुलियन कंपनी ‘रिद्धी सिद्धी बुलियन’सोबत देशभरात बुलियन स्पॉट एक्सचेंज प्रस्थापित करण्यासाठी करार केलेला आहे. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंसाठी पारदर्शक ऑनलाईन स्पॉट ट्रेडिंग व्यासपीठ प्रस्थापित करणे हे या संयुक्त उद्यमाचे ध्येय आहे. एनसीडीईएक्स स्पॉट बुलियन लिमिटेड (एनबीएल) या कंपनीच्या निर्मितीसाठी हा करार करण्यात आलेला असून, यामुळे बुलियन विभागामध्ये पारदर्शक ऑनलाईन रिअल - टाईम स्पॉट एक्सचेंज विकसित करण्यास मदत होईल.

‘विविध उद्योगांतील आद्र्रता मापन’ विषयावर आज दिवसभराचे चर्चासत्र
प्रतिनिधी: औषध निर्मिती, वस्त्रोद्योग, रसायने, विमान निर्मिती, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी अनेक उद्योगांमध्ये आद्र्रता संवेदक असलेली मापन उपकरणे वापरली जातात. म्हणूनच याविषयी अधिक माहिती व्हावी विविध उद्योगांतील लोकांना मिळावी या उद्देशाने ‘विविध उद्योगांतील आद्र्रता मापन’ या विषयावर आज, शुक्रवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ज्युपीटर इलेक्ट्रॉनिक्स आणि आद्र्रता मापनातील कंपनी रोट्रॉनिक एजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र साकीनाका, अंधेरी येथील हॉटेल पेनिन्सुलामध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० असे दिवसभराचे चर्चासत्र होणार आहे. यात ज्युपीटर इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन घेलानी, रोट्रॉनिक एजी कंपनीचे विक्री व्यवस्थापक रिटलर विक्री अभियंते प्रशांत जाधव व अतीश म्हात्रे आदी मार्गदर्शन करणार आहेत. दिवसभराच्या चर्चासत्रादरम्यान आद्र्रता संवेदकांची माहिती, एअरोचिप या नव्या तंत्रज्ञानाची माहिती, आद्र्रता मापन क्षेत्रातील नवे प्रवाह, आद्र्रता मापन संवेदकांचे विविध उद्योगांतील उपयोजन या विषयक सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच या वेळी नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी आद्र्रता मापन उपकरणेही दाखविण्यात येणार आहेत. या चर्चासत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना बिपीन घेलानी यांच्याशी ९८२०१९०३५७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

राज्यातील पहिला स्वयंचलित साबुदाणा प्रकल्प लवकरच
व्यापार प्रतिनिधी: बांधकाम व्यावसायिक रामदास भोसले यांनी राज्यातील पहिल्या स्वयंचलित ‘त्रिमूर्ती अ‍ॅग्रो प्रोसेसिंग प्रा. लि.’ या साबुदाणा उत्पादन प्रकल्पाची उभारणी कोरेगाव भीमा येथे केली आहे. कोरेगावचे सरपंच बाळासाहेब फडतरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक विठ्ठलाप्पा ढेरंगे, ‘त्रिमूर्ती’चे संचालक बाळासाहेब शिणगारे, बाळासाहेब शिंदे, प्रकल्प संचालक राजेश असूदकर, संगीता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. हा प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित असून त्यातील कोणतीही प्रक्रिया हातांनी करावी लागणार नाही. ‘टॅपिओका’ या रताळेसदृश कच्च्या मालावर प्रक्रिया करून साबूदाणा उत्पादन केले जाते. या प्रकल्पाची आठ तास ७० टन कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून तो दिवसात तीन पाळ्यांमध्ये कार्यान्वित राहू शकतो, असे भोसले यांनी सांगितले. यामध्ये प्रतिदिन १०५ टन साबूदाण्याचे उत्पादन होणार असून उरलेल्या टाकाऊ पदार्थाचा उपयोग पशुखाद्यासाठी होणार आहे. तसेच त्यापासून बायोगॅस निर्मिती करून वीज निर्मितीही केली जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विजेबाबत स्वंयपूर्ण असेल, असा दावाही भोसले यांनी केला. कोरेगाव भीमा, शिरूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी ‘टॅपिओका’ या पिकाच्या उत्पादनाचे संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रकल्पातून कच्च्या मालाला उसापेक्षाही अधिक दर देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना प्रकल्पामध्ये संचालक म्हणून सामावून घेतले जाईल, असेही भोसले म्हणाले. या प्रकल्पाचे उत्पादन होणारा साबूदाणा ‘त्रिमूर्ती’ या ‘ब्रँडनेम’खाली विक्री करण्यात येणार असून पुण्याजवळच प्रकल्प असल्याने ग्राहकांना केरळ, तामिळनाडूहून येणाऱ्या साबूदाण्यापेक्षा किफायतशीर दरात तो उपलब्ध होईल, अशी ग्वाही भोसले यांनी दिली.