Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
अग्रलेख

निरांजनातील वात

 

कविता आणि संगीत याचे वेड ही मऱ्हाटी संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे म्हटली पाहिजेत. बालगंधर्व, मा. दीनानाथ, केशवराव भोसले यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन लोकप्रियतेची उबदार शाल पांघरायला मिळण्याचे भाग्य जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजाननराव वाटवे, सुधीर फडके यांच्यासारख्या मागच्या शतकातील भावगीत गायकांना मिळाले, याचेही मूळ या मातीतच वास करीत असलेल्या साहित्य संगीताच्या प्रेमात होते. गजाननराव वाटवे यांचे निधन ही त्यामुळे मराठी संगीतप्रेमी मनाला होणारी एक अतिशय संवेदनशील अशी वेदना आहे. ब्याण्णव्या वर्षी संगीताबद्दलची ओढ तेवढीच ताजीतवानी ठेवणारे वाटवे हे मराठी भावगीताच्या प्रांतातले एक दीपस्तंभ होते. जुने ते सोने अशा प्रवृत्तीत न रमता संगीतात होणाऱ्या सगळ्या नव्या प्रयोगांना तेवढय़ाच अतिथ्यशीलतेने सामोरे जाणारे वाटवे हे एक वेगळेच रसायन होते. अनपेक्षितपणे संगीतात आलेल्या गजाननरावांना तेथे एवढी अमाप लोकप्रियता मिळेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. संगीताची आवड आणि साहित्याचे वाचन या शिदोरीवर त्यांनी त्या काळात नव्याने लोकप्रिय होत असलेल्या भावगीताच्या प्रांतात ऐन तरूण वयात प्रवेश केला आणि पहिल्याच सलामीत ते शतकवीर ठरले. ‘वारा फोफावला’ ही त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी, म्हणजे १९३७ साली दिलेली ध्वनिमुद्रिका एवढी गाजली की त्यानंतर त्यांना परत मागे वळून पाहायची गरज वाटली नाही. भारतीय संगीतात महाराष्ट्राने दिलेले योगदान म्हणजे नाटय़ संगीत आणि भावगीते. नाटय़ संगीताचा जमाना सरत असतानाच भावगीतांच्या नव्या युगाची नांदी होत होती आणि त्यामध्ये त्यावेळच्या एचएमव्ही या ध्वनिमुद्रिकांची निर्मिती करणाऱ्या संस्थेतील अधिकारी जी. एन. जोशी हे अग्रेसर होते. ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान भारतात येऊन स्थिरावत असतानाच चित्रपटही बोलू लागला होता. चित्रपटांचा बोलपट झाल्यामुळे संगीत नाटकांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागायला सुरुवात झाली होती आणि संगीत नाटकांचे सम्राट बालगंधर्व यांनाही संत एकनाथ या चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटकांमध्येही साहित्यमूल्य असलेल्या काव्याला संगीताचा साज चढवण्याचे काम अण्णासाहेब किलरेस्कर यांच्यासारख्या सर्जनशील कलावंताने केले होते. त्यामध्ये राम गणेश गडकऱ्यांसारखा एक हिराही सामावाला गेला. उत्तम साहित्याची आणि संगीताची जोडी जमली ती आजपर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावरच राहिली. नाटय़संगीताच्या पाठोपाठ काव्यगायन या प्रकाराला मराठी मनात स्थान मिळाले. ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय केले, ते गजाननराव वाटवे यांनी. नाटकासाठी उपयोगात येणाऱ्या देखण्या नेपथ्याशिवाय केवळ आपल्या आवाजावर आणि कवितेच्या काव्यगुणांवर हजारो रसिकांना तीनतीन तास खिळवून ठेवणे हे तसे मोठे अवघड काम होते. वाटव्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. गणेशोत्सवातील दहाही दिवस हमखास बुकिंग असणारे वाटवे हे त्या काळातील एक अत्यंत मोठे सेलिब्रिटी आर्टिस्ट होते. प्रत्येक कवितेला असणारे संगीताचे अस्तर वाटव्यांना सापडत असे. त्यामुळे शब्द आणि संगीत यांचा समसमा संयोग होण्यासाठी त्यांना फार कष्ट पडत नसत. कवितेची उत्तम जाण असल्यामुळे आणि संगीतातून शब्द पोहोचविण्यासाठी आवश्यक असणारे भावदर्शन करण्याची कलात्मक जाणीव असल्यामुळे वाटवे हे रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. ‘फांद्यावर बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले’ या त्यांच्या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘यमुना काठी ताजमहाल’, ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळलो जुगार’, ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ यासारखी संयत प्रेम व्यक्त करणारी आणि करूणेची झालर असलेली त्यांची गीते रसिकांच्या कानामनात रुंजी घालत होती. बालगंधर्वासारख्या त्या काळच्या सेलिब्रिटी कलावंताचा गायनातील आदर्श वाटव्यांनी सहजपणे उचलला. पण आपण कुणी सेलिब्रिटी आहोत, या कल्पनेचा स्पर्श त्यांनी शेवटपर्यंत आपल्या मनाला कधीही स्पर्शू दिला नाही. पुण्यात ते ज्या नवी पेठेत राहत असत, त्या ठिकाणी त्यांच्या घराच्या दरवाजावर असलेली पाटी ‘गजानन वाटवे, काव्यगायक’ अशी होती. ते घर भाडय़ाचे होते आणि त्या घराच्या मालकांनाही आपली ओळख वाटव्यांच्या इमारतीत आपण राहतो, अशीच द्यावी लागत असे. गजाननराव वाटव्यांच्या कार्यक्रमांना त्या काळात होणारी गर्दी इतकी अफाट असे, की त्यांच्या या लोकप्रियतेचा भल्याभल्या दिग्गजांनाही हेवा वाटावा. फार ताना नाहीत की गळय़ातल्या हरकती-मुरकती दाखवण्याची हौस नाही. शब्दांना धरून चालणारी स्वररचना आणि प्रवाही आवाज यामुळे वाटवे यांची भावगीते खूपच भावली. त्यांच्या गाण्यात स्वरांचा जो ओलावा होता, तो रसिकांना अधिक भिडत होता. गाण्याचे जाहीर कार्यक्रम करून वाटवे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले, पण त्याकाळात नव्याने येत असलेल्या अन्य माध्यमांमध्ये न शिरण्याचा त्यांचा निग्रह कमालीचा होता. चित्रपट क्षेत्र त्या काळात वाटवेंसारख्या अनेकांना खुणावत होते आणि तिथे पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी पायाशी उभ्या होत्या. वाटव्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. वाटव्यांच्या ध्वनिमुद्रिकांची संख्या तशी मोजकीच. आपल्या गाण्याच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता, गाणी रेकॉर्ड करून ही गर्दी कमी होण्याची एक भीती माझ्या मनात सतत असे, असं मिश्किलपणे वाटवे स्वत:च सांगायचे. सतत नव्या गाण्यांच्या शोधात राहिलेल्या वाटव्यांना प्रत्येक कार्यक्रमात एक तरी नवे गाणे गाण्याचा ध्यास असे. स्वररचनांमधले वैविध्य जपत; पण त्यात फार मोठा बदल न करता आपले वेगळेपण जपणाऱ्या वाटव्यांनी आपलं निरांजनातल्या वातीसारखं सौजन्य आणि सौहाद्र्रता आपल्या गाण्यातही सतत जपली. ‘प्रेमस्वरूप आई’ सारखं गाणे ऐकवण्याचा रसिकांचा हट्ट त्यांनी सतत पुरवला आणि डोळय़ाचा रुमाल ओला होईपर्यंत सगळय़ा रसिकांनीही तो पुरवून घेतला. शब्द आणि स्वर यांचे जे दुरावलेपण शास्त्रीय संगीतात होते, त्यातून बाहेर पडून भावगीतात या दोन्हींचे एक सुरेख मिश्रण अधिक उठावदारपणे व्यक्त करण्याची किमया वाटव्यांना साधली होती. वाटव्यांच्या पिढीने असे प्रतिभावान कलावंत दिले म्हणून मराठी मनात भावगीताचे एक नवे दालन समृद्ध झाले. संगीताबद्दलची प्रीती आणि आसक्ती वाढली आणि जगण्याला अशा निरामय आनंदाची झालर लाभली. कुमार गंधर्वासारख्या प्रतिभावंतानेही त्यांच्या देवासमधल्या घरी गजाननरावांना खास बोलावून त्यांची मैफल जमविली होती, याचे कारणच वाटवे भावसंगीतातील एका घराण्याचे संस्थापक होते, हे आहे. सरत्या वयातही संगीताने वाटव्यांना कायम ताजेतवाने ठेवले. त्यामुळेच रमण रणदिवे, संगीता बर्वे यांच्यासारख्या नव्या पिढीतल्या कवींच्या कवितांना ते सहजपणे सामोरे गेले. मेलडी आणि हार्मनी या वादात न पडता वाटव्यांनी आपली मेलडीची वाट चोखाळली आणि ती आजही तेवढीच ताजीतवानी आहे, हे त्यांचे भावगीतातले वंशज पटवून देत आहेत. भावगीताचा काळ संपला, अशी ओरड सध्या सुरू आहे. पण चांगली कविता आणि त्याला अर्थप्रवाही चाल हे मिश्रण आजही लोकप्रिय ठरणार यात शंका नाही. अवघ्या मराठी मनाला पकडून ठेवतील, अशी भावगीते काही वर्षांंत झाली नाहीत, ही खंत आता बदलते आहे. नव्याने कवितांना स्वरांच्या माध्यमातून सामोरे जाणारे अनेक संगीतकार आज वाटव्यांची परंपरा पुढे नेत आहेत. मराठी भावगीतांना पुन्हा एकदा दिमाखात फिरताना पाहून वाटवेही मनोमन सुखावलेलेच असतील. गजाननराव वाटवे यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत असतानाच भविष्याबद्दलचा त्यांचा विश्वास आपल्याला पुन्हा नवी उमेद देईल, हे नक्की!