Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

अत्यंत उत्तम आणि गुणी अभिनेता.. लवचिक अभिनय, कसलेला अ‍ॅक्टर, कसाही ‘मोल्ड’ होऊ शकणाऱ्या या अभिनेत्याने ‘झुलवा’त ते सिद्ध करून दाखवलयं. मोठी आव्हाने पेलण्याचे सामथ्र्य आणि हे सामथ्र्य तो स्वीकारत चालला आहे. नगरहून मी त्याला शोधून आणला. ‘ती फुलराणी’ आणि ‘झुलवा’ या दोन नाटकात त्याने काम केलयं. दगडोबा आणि परशा या दोन्ही भूमिकेत तो अगदी ‘परफेक्ट’ बसला. त्याने सिनेमे करावेत, मालिका कराव्यात. पण मला असं वाटतं की त्याने नाटक सोडू नये. त्याने नाटकात अधिक रमावे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचा विकास होईल, तो अधिक प्रयोगशील बनू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो उत्तम दर्जाचा ‘नटसम्राट’ होऊ शकेल..
वामन केंद्रे

प्रचंड एनर्जी असलेला बुद्धिमान नट. दिग्दर्शकाला काय म्हणयाचयं याचा अचूक अंदाज त्याल असतो. स्क्रीप्टच्या पलिकडे जाऊन तो विचार करत असतो. जी भूमिका करतो त्या भूमिकेत शिरतो. कमालीचा शिस्तबद्ध आणि सिन्सियर. अभिनेता म्हणून असलेले सर्व गुण त्याच्याकडे आहेत आणि म्हणूनच त्याच्याशिवाय माझे चित्रपट पूर्ण होत नाहीत. सतत चांगली भूमिका करता यावी यासाठी तो धडपडत असतो. त्याची अतिशय ‘ऑड पर्सनॅलिटी’ आहे. एका क्लोजअपमध्ये तो संपूर्ण पडदा व्यापून टाकतो. भविष्यात तो फार मोठा नट होणार यात शंकाच नाही..
गजेंद्र अहिरे

विजय तेंडुलकर एकदा मला म्हणाले होते की, हा कोण नट आहे जो सिनेमाची चौकट फोडून बाहेर येतो. तेंडुलकरांसारख्या व्यक्तींकडून जेव्हा इतकी मोठी पावती मिळते तेव्हा त्यापेक्षा अधिक काही चांगले असूच शकत नाही. तो माझा अतिशय आवडता नट आणि तितकाच चांगला मित्र आहे. तो अतिशय ओरिजनल आहे आणि म्हणूनच तो मोठा आहे. आपल्या अभिनयाने त्याने इथे साम्राज्य प्रस्थापित केले आहे. दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना प्रत्येक रोलसाठी डबल कास्टिंग केले जायचे. मात्र तो जो रोल करायचा तो रोल करण्याची इतरांची कधीच हिंमत झाली नाही. ‘वो छा जाता था, उससे टक्कर लेने की किसी की शामत नही थी’.. ‘ती फुलराणी’मध्ये त्याच्यासोबत काम करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजते.. त्याला माझा सलाम!
अमृता सुभाष

या प्रतिक्रिया आहेत मराठी रंगमंचाला, सिनेसृष्टीला आणि छोटय़ा पडद्याला मिळालेल्या एका कसदार अभिनेता मिलिंद शिंदे याच्याबद्दल. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’च्या एस. एम. गरुड पासून ‘झुलवा’च्या परशापर्यंत अभिनयाचे विविध पैलू दाखवत मिलिंद शिंदेने तमाम मराठी रसिकांना आपली दखल घ्यायला लावली आहे. ‘बयो’, ‘कथा नाम्या जोग्याची’. ‘सैल’, ‘खंडोबाच्या नावान’ं, ‘सरीवर सरी’, ‘शेवरी’, ‘कळत-नकळत’, ‘वादळवाट’, ‘अग्निहोत्र’ अशा निवडक परंतु चोखंदळ भूमिका करणाऱ्या मिलिंदला नुकताच ‘कथा नाम्या जोग्याची’साठी झीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लेखाच्या सुरुवातीला मुद्दाम या मातब्बर लोकांच्या प्रतिक्रियांचा उल्लेख केला आहे. कारण या तिघांशिवाय मिलिंदचा प्रवास सुरू होत नाही. अमृता सुभाषने मला मुंबई दाखवली, वामन केंद्रेंनी मला रस्ता दाखविला आणि गजेंद्र अहिरेने मला सिनेमा शिकवला.. या तिघांचे माझ्या आयुष्यात खुप मोठे स्थान आहे, असे मिलिंद वारंवार बोलून दाखवत असतो. नगरमधल्या माझ्यासारख्या एका नवोदित अभिनेत्यासाठी वामनसर ‘परशा’ची भूमिका देतात, गजेंद्र अहिरेसारखा दिग्दर्शक खास माझ्यासाठी भू्िमका लिहितो ही माझ्यासाठी खरोखरच मोठी बाब आहे, असे मिलिंद म्हणतो.
मूळचा बीडमधला परंतू नंतर नगरमध्ये स्थायिक झालेला मिलिंद नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर, ओम पुरी, पंकज कपूर, सुप्रिया पाठक यांच्या भट्टीत तयार झाला आहे. नगरहून थेट दिल्लीचे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा गाठण्याचा मिलिंदचा निर्णय किती अचूक होता हे त्याने आतापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांमधून स्पष्ट होते. मिलिंदचे वडील प्रशासकीय अधिकारी. बदली झाल्यामुळे ते बीडहून नगरला स्थायिक झाले आणि तिथेच मिलिंदचे शिक्षण सुरू झाले. मिलिंदचे आजोबा तमासगीर. तबला, ढोलकी, होर्मोनियम यात मिलिंद एकदम पक्का. कॉलेजमध्ये असतानाच मिलिंदला अभिनयाचे भूत लागले. त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर, नगरच्या सारडा महाविद्यालयात शिकत असतानाच नाटक अंगाला लागलं. राज्य नाटय़ स्पर्धा, पुरषोत्तम करंडक आदी नाटय़ स्पर्धामध्ये मिलिंदने आपली छाप पाडायला सुरूवात केली. पुण्यातल्या पुरषोत्तम करंडकमध्ये त्याने सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिकदेखील मिळवले आणि त्याने थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला. मिलिंदच्या वडिलांमध्ये आणि त्याच्यामध्ये मग द्वंद सुरू झाले. हे काय नाटक-बिटक करतो. एमपीएससी, युपीएससी करून सरकारी अधिकारी बनावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र मिलिंद आपल्या निर्णयावर ठाम होता. नगरमधल्या एका ग्रामीण कलाकाराला दिल्लीत काय शिकू आणि काय नको असे मिलिंदचे झाले. त्याची भूक वाढत गेली. त्याची कक्षा वाढली.
दिल्लीला मिलिंदने त्याच्या एका बंगलोरच्या मैत्रीणीसोबत फोटोसेशन केले होते. एनएसडी संपल्यानंतर कामाच्या शोधात असताना अचानक एकेदिवशी मिलिंदला फोन आला.. मी गिरिश कर्नाड बोलतोय. मिलिंद ताडकन उडाला. गिरिश कर्नाडांनी ते फोटो पाहिले होते आणि त्यांच्या एका कन्नड चित्रपटासाठी त्यांना मिलिंद हवा होता. ‘कानरू हंगडली’ हे त्या चित्रपटाचे नाव. या चित्रपटानंतर पुन्हा मिलिंद रिकामाच होता. त्याच दरम्यान मिलिंदने दिग्दर्शनासाठी मग पुण्याच्या एफटीआयमध्ये प्रवेश घेतला. अमृता सुभाष ही मिलिंदची एनएसडीमधली सहकारी. अमृताने त्याला मुंबईत बोलाविले. मुंबईत वामन केंद्रेंनी मिलिंदला बोलवून घेतले. मिलिंद म्हणतो, सरांनी मला पाहिले आणि गाणं म्हणायला सांगितले. ‘नका पाहू बाई मागे वळून’ ही गौळण मी त्यांना गाऊन दाखवली आणि दुसऱ्या दिवसापासून भुपेश गुप्ता भवनमध्ये ‘झुलवा’च्या तालमीला येण्यास सांगितले. त्यापूर्वी सरांनी माझे काम कुठेतरी पाहिले होते आणि हाच आहे माझा ‘परशा’, असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले होते, असे मला मागाहून कळले. सयाजी शिंदेचा झुलवा मी पाहिला नव्हता आणि एकाअर्थी ते बरेच झाले. भूमिकेत नक्कल झाली नाही. हा ‘परशा’ सर्वस्वी माझा होता. मराठवाडय़ा भाषेचा ठसका मला या भूमिकेसाठी उपयोगी पडला. मानखुर्दला जोगत्यांची (तृतियपंथींच्या गुरुंची) मोठी वस्ती आहे. मी दोन दिवस तिथे जाऊन राहिलो. त्यांचा वागणे, बोलणे, त्यांच्या शिव्या, त्यांची साडी नेसण्याची पद्धत, बोलण्यातला हेल याचा मी अभ्यास केला. वामनसरांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली आणि ‘झुलवा’ माझ्यासाठी माईलस्टोन ठरले. वामनसरांकडे अभिनयाची मोठी पोतडी आहे. त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले.
अशाच एका स्पर्धेदरम्यान माझी आणि गजेंद्र अहिरेची ओळख झाली. मी जेव्हा चित्रपट बनवेन तेव्हा तुला नक्की काम देईन, असे त्यावेळी गजाने मला सांगितले होते आणि गजा आपल्या शब्दाला जागला. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’च्या एम. व्ही. गरुड या वकिलाची भूमिका त्याने मला दिली. ‘भारी काम झालं यार’ असे गजा त्यावेळी मला बोलला होता. त्यानंतर गजाने मला घेऊन सलग आठ चित्रपट केले. अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित करण्यात आले. गजाचे हे ऋुण मी कधीही विसरणार नाही. गजाला कमर्शियल चित्रपटात रस नाही. तो एक विचार घेऊन जगतो आणि त्याच्या चित्रपटांमधून तो नेहमी ते मांडत असतो. त्याला एक सामाजिक बाजू आहे. तो माझा आवडता दिग्दर्शक आहे.
मिलिंद अतिशय चोखंदळ आहे. अतिशय निवडक भूमिका तो करतो. घरी बसावे लागले तरी चालेल परंतु मी फालतू भूमिका करणार नाही. घरी बसेन, टीव्ही बघेन, अफाट वाचन करीन. परंतु भूमिका मात्र चांगल्याच करीन, असे मिलिंद ठामपणे म्हणतो. ‘किचन चालविण्या’साठी मध्यंतरी मी काही कमर्शियल चित्रपट केले खरे पण मजा नाही आली. मी देखील रोज बिझी होऊ शकतो. पण सेटवर खुप छान काम झालय, असे इतरांनी बोलण्यापेक्षा ‘मिलिंद हे जरा खटकतय, हे अधिक चांगल्याप्रकारे झाल असतं, अशी बोलणारी मंडळी मला आवडतात. वामन केंद्रे आणि गजेंद्र अहिरेकडे जे समाधान मिळत ते मला इतरांकडे म्हणजे कमर्शियलवाल्यांकडे मिळत नाही. मी आजपर्यंत फोटो घेऊन कोणाकडे गेलो नाही. फोटोमधून तुमचा फक्त चेहरा दिसतो. आवाज आणि अभिनय दिसत नाही. सुदैवाने चांगल्या भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या. आज अशोक राणे, अरुण नलावडेसारखी मंडळी मराठी चित्रपटात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मिलिंद म्हणतो.
ज्या दिवशी समोर मोठा नट उभा राहिल तेव्हाच जिंकायचं असतं. नाहीतर कधीच यश येणार नाही ही मिलिंदची थिअरी आहे. मोठय़ा माशाने छोटय़ा माशाला गिळण्याच्याअगोदरच मोठय़ा माशावर हुकुमत गाजवायला शिका, यश नक्कीच पदरात पडेल, असे जेव्हा मिलिंद म्हणतो तेव्हा त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिका पाहिल्यास मिलिंद शिंदे ‘छा गया यार’ असेच म्हणावे लागते. shivaprash@gmail.com

‘रॅगे’ संगीत जाणून घेण्यासाठी
तीन एक वर्षांपूर्वी आपल्याकडल्या हॉलीवूड चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी ‘ड्रीमगर्ल्स’ नावाचा ऑस्कर विजेता चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. संपूर्णपणे जॅझ संगीताचं वातावरण असलेला हा चित्रपट जगभरातल्या महोत्सवात पुरस्कारांमागून पुरस्कार पटकावत असल्यामुळे येथे दाखविण्यात आला होता. पहिल्याच आठवडय़ात या सिनेमाला चित्रपटगृहातून बाहेर पडावे लागेल इतका थंड प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांनी दिला होता. ‘ड्रीमगर्ल्स’ येण्यामागचे कारण तरी पक्के होते. पण आपल्याकडे आज प्रदर्शित होणाऱ्या ‘फील द नॉईझ्’ या २००७ च्या चित्रपटाचे आत्ताचे प्रदर्शन काहीसे बुचकळ्यात टाकणारे आहे. गायिका आणि नायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या दक्षिण अमेरिकी जेनिफर लोपेझची निर्मिती येवढेसे कारण या चित्रपटाला येथे प्रदर्शित होण्यासाठी पुरेसे वाटत नाही. ‘रॅगे’ या संगीताचं जन्मस्थान असलेल्या पोटरे रिकोमधील एका तरुणाचे सुपरस्टार होण्याचे स्वप्न आणि त्यासाठीचा संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. अर्थात ‘रॅगे’ संगीत, पोटरे रिकन संस्कृती यांचा परिचय करून घ्यायचा असेल तर हा सिनेमा पाहणीय असा आहे. पोस्टरवर जेनिफर लोपेझचं नाव केवळ चकवा आहे. तीही यात आहे. पण पाहुण्या कलाकाराच्या छोटय़ाशा भूमिकेत.

नवे ‘कार’नामे
अमेरिकेत आणि भारतात एकाचवेळी प्रदर्शित होणाऱ्या मोजक्या चित्रपटांच्या पंक्तीत आज प्रदर्शित होणारा ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस-४’ही जाऊन बसला आहे. २००१ च्या ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’चा पहिला भाग ज्यांना आवडला असेल, त्यांना संजय गढवीने त्यातून मारलेल्या ‘धूम’चा भाग लक्षात यायला वेळ लागला नसेल. ‘टू फास्ट टू फ्यूरिअस’(२००३), टोकियो ड्रिफ्ट (२००६), आणि आता या मालिकेतलं पहिलंच नाव घेऊन प्रदर्शित होणारा दिग्दर्शक जस्टिन लीन यांचा चित्रपट म्हणजे आधीच्या सर्व चित्रपटांमधील ‘कार’नाम्यांचं एक्स्टेंशन असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन स्टंट आणि नावाला जागणारा वेग अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. अ‍ॅक्शनपटांमुळे लोकप्रिय झालेला विन डिझेल,‘फास्ट.’च्या प्रत्येक भागात असणारा पॉल वॉकर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहेत.