Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

पवार तिसऱ्या आघाडीचे घटक नाहीत, मात्र मित्र नक्कीच - वृंदा करात
समर खडस
मुंबई, २ एप्रिल

शरद पवार हे तिसऱ्या आघाडीचे घटक नाहीत. तिसऱ्या आघाडीमध्ये डाव्या आघाडीतील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी हे चार पक्ष, तसेच तेलुगू देसम पार्टी, टीआरएस, जनता दल (से), बिजू जनता दल आणि बसपा असे नऊ पक्ष आहेत. मात्र शरद पवार हे या आघाडीचे मित्र नक्कीच आहेत, असे आज मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य व राज्यसभेच्या खासदार वृंदा करात यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले. तसेच आता युपीएला शेवटची घरघर लागली आहे, असे सूचक उद्गारही त्यांनी काढले.


वाघोबा आणि कोल्होबा

वाघोबा- लोकशाही स्थापन झाली, आता पुढची स्टेप काय?
कोल्होबा- आता खाते वाटप!
वाघोबा- छे छे! खाण्यात मला भागीदार नकोत, माझीच भूक खूप आहे.
कोल्होबा- अहो, खाणे वाटप नव्हे, खाते वाटप! म्हणजे कामाची विभागणी!
वाघोबा- अच्छा अच्छा, म्हणजे ते मंत्रिमंडळ वगैरे काय असतं ते!
कोल्होबा- हो. संरक्षण व्यवस्था, जंगलातल्या रस्त्यांचं बांधकाम, नवीन झाडांची लागवड, आदिवासींचा आणि शहरी माणसांचा बंदोबस्त कितीतरी कामं आहेत!
वाघोबा- ही सगळी कामं वाटून द्यायची, मग मी काय करायचं?
कोल्होबा- या सगळ्यांवर लक्ष ठेवायचं!

गोव्यात देशप्रभूंच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता
पणजी, २ एप्रिल/वृत्तसंस्था

गोव्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असलेले जितेंद्र देशप्रभू यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ असून दक्षिण गोवा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे फ्रान्सिस्को सारदिन्ह लढणार असून दक्षिण गोव्यातून देशप्रभू उभे राहाणार आहेत. विशेष म्हणजे देशप्रभू काँग्रेसमध्येच असून ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी उंबरठा ओलांडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरात प्रवेश करणार आहेत.

इतिहास बदलू पाहणारा कवी!
‘सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेलं गढुळलेपण दूर करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि हा निर्णय जाहीर केल्यावर मिळालेल्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे’, असे नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असलेले डॉ. यशवंत मनोहर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. मराठी साहित्याच्या क्षेत्रात यशवंत मनोहर यांनी एक कवी आणि समीक्षक म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

सोनिया गांधी बारामतीतून लढणार!
धनंजय जाधव
पुणे, २ एप्रिल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदार संघातून दस्तूरखुद्द सोनिया राजीव गांधी निवडणूक लढविणार आहेत. इतकेच नव्हे, तर उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांनी तीन अर्जही निवडणूक कार्यालयातून मागविले आहेत! बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवार यांच्यामुळे देशस्तरावर चर्चेत राहिला आहे.

शर्मिला, रश्मी ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत !
संदीप आचार्य
मुंबई,२ एप्रिल

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक निवडणुकीत झंझावाती दौरे केले. या काळात त्यांच्या पत्नी मीनाताई या सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी राहिल्या. प्रचारात प्रत्यक्षात न उतरता त्यांनी शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन मायेचा हात पाठीवर ठेवला. आता बदललेल्या स्थितीत शिवसेनाप्रमुखांच्या दोन्ही सुना म्हणजे रश्मी उद्धव ठाकरे आणि शर्मिला राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या असून त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असल्याचा दावा मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

पप्पू ‘फेल’ हो गया!
निवडणूक लढविण्यास परवानगी मागणारी याचिका फेटाळली
पाटणा, २ एप्रिल/पीटीआय

सीपीआय (एमएल) या पक्षाचे नेते अजित सरकार यांच्या खून प्रकरणी आपल्याला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी तसेच आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास परवानगी द्यावी, अशी राष्ट्रीय जनता दलाचा खासदार पप्पू यादव याने केलेली याचिका पाटणा उच्च न्यायालयाने आज फेटाळली. उच्च न्यायालयाचे न्या. शिवकिर्तीसिंग व न्या. धरणीधर झा यांनी पप्पू यादव याने केलेल्या याचिकेवरील निकाल गेल्या २६ मार्च रोजी राखून ठेवला होता. अजित सरकार खून प्रकरणामध्ये दोषी ठरवून शिक्षा सुनाविण्यात आलेल्या पप्पू यादव याला आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास पाटणा उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. पप्पू यादव याच्यावतीने वरिष्ठ वकील अ‍ॅड. आर. के. आनंद व अ‍ॅड. माजिद मेनन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अजित सरकार खून प्रकरणातील सहआरोपी राजन तिवारी याने दिलेला कबुलीजबाब नंतर फिरविला होता. याच कबुलीजबाबाला मुख्य पुरावा मानून पप्पू यादव याला दोषी ठरविण्यात आले होते. मात्र असा पुरावा कायदा ग्राह्य मानत नाही असा युक्तिवाद पप्पू यादव याच्या वकीलांनी केला.

‘पत्रकार परिषद घेणे, पत्रके वाटणे मंत्र्यांनी टाळावे’
निवडणूक आयोगाची सूचना
नवी दिल्ली, २ एप्रिल/ पीटीआय

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेतांना केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेणे, पत्रके वाटणे शक्यतो टाळण्याचा सल्ला निवडणूक आयोगाने दिला असून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनीसुद्धा अशी काळजी घेणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा एखादा निर्णय झाल्यानंतर किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची सर्वसामान्यपणे प्रथा आहे. परंतु त्याऐवजी पत्रक वाटूनही हे साध्य करता येत असल्याने ही पद्धत अवलंबावी असे निवडणूक आयोगाला वाटते. लोकसभेच्या निवडणुका आणि आंध्र प्रदेश, ओरिसा आणि सिक्कीम या राज्यांच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मंत्रिमंडळ सचिवाला पत्र पाठवून ही सूचना केली आहे. मात्र जनहिताच्या दृष्टीने अशा पत्रकार परिषदा घेणे अपरिहार्यच असेल तर योग्य अधिकाऱ्याने ती घ्यावी असेही पत्रात सुचवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी अलिकडेच पत्रकार परिषद घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या शेरेबाजीविरुद्ध भारतीय जनता पक्षाने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने उपरोक्त सूचना केली आहे.

शिर्डीचा तिढा सुटला, विखे पाटील यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद
नवी दिल्ली, २ एप्रिल/खास प्रतिनिधी

काँग्रेसशी निवडणूक युती करणारे रिपाइं नेते रामदास आठवले यांना शिर्डीतून लोकसभेची निवडणूक लढणे शक्य व्हावे म्हणून आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब विखे पाटील यांची ‘समजूत’ काढली आणि त्यांना प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद सोपविले. पूर्वाश्रमीच्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले विखे पाटील यांचा मतदारसंघ पुनर्रचनेत राखीव झाल्यामुळे त्यांना यंदा नगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढायची होती. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ात असल्यामुळे काँग्रेसला मिळू शकला नाही. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात त्यांनी रामदास आठवले यांच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याचे म्हटले जाते. काँग्रेसने आपल्या कोटय़ातील सर्व २५ जागांवर उमेदवारांची घोषणा केल्यानंतरही आठवले यांच्यासाठी शिर्डी मतदारसंघ सोडल्याचे काँग्रेसने जाहीर केले नव्हते. त्यावर आज तोडगा काढताना सोनिया गांधींनी विखे पाटील यांच्याकडे राज्याच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली. विखे पाटील यांना ही जबाबदारी देऊन त्यांची नाराजी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. विखे पाटील आता आठवले यांच्या मार्गात अडथळे आणणार नाहीत आणि त्यांचा विजय सुकर करतील, अशी काँग्रेसश्रेष्ठींना अपेक्षा आहे.

संजय दत्तला धमकावले नाही- कायदामंत्री एच. आर. भारद्वाज
नवी दिल्ली, २ एप्रिल/ पीटीआय

अभिनेता संजय दत्त काही दिवसांपूर्वीच आपल्याला भेटला होता. त्याला आपण आशीर्वादही दिले होते. संजय आमच्या कौटुंबिक सदस्यांप्रमाणेच एक आहे. आपण त्याला कोणत्याही पद्धतीने धमकावले नव्हते , असा खुलासा कायदा मंत्री एच.आर.भारद्वाज यांनी केल्याने यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी संजय दत्तने मात्र याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून, चर्चेपासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. समाजवादी पक्षात प्रवेश केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने आपल्याला दिली होती, असा आरोप संजय दत्तने काल, केला होता. यासंदर्भात भारद्वाज यांचे नाव चर्चेत आले होते. भारद्वाज पुढे म्हणाले की, संजय दत्त आणि आपल्यात कोणतेच वैमनस्य नाही. धमकी काय किंवा स्टिंग ऑपरेशन काय याची आपल्याला काही माहितीही नाही. ते काय आहे हे तुम्ही त्यालाच विचारा.

तावडे यांची शासनाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
मुंबई, २ एप्रिल/प्रतिनिधी

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाणारा ‘दिलखुलास’ हा महाराष्ट्र शासनाच्या प्रचार व प्रसिद्धीचा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर १८ मार्चपासून सुरू केल्याने आचारसंहितेचा भंग झाला असल्याची तक्रार भाजपचे प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे. तावडे यांनी म्हटले आहे की, आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ हा कार्यक्रम आचारसंहिता लागू झाल्यावर ४ ते १४ मार्च या कालावधीत बंद करण्यात आला होता. परंतु १८ मार्चपासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू केला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘जय महाराष्ट्र’ व ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ हे कार्यक्रम सुरू आहेत. राज्य शासन सत्तेचा गैरवापर करीत असल्याने मुख्यमंत्री, माहिती व जनसंपर्क खात्याचे मंत्री व संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तावडे यांनी केली.

गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या वाटय़ाला सुरत मतदारसंघ
वडोदरा, २ एप्रिल / पी.टी.आय.

गुजरातमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या जागावाटपाच्या समझोत्यानुसार सुरत लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला येण्याची शक्यता आहे. सुरतची जागा मिळाल्यास राष्ट्रवादीचा पहिल्यांदाच गुजरातच्या राजकारणात खऱ्या अर्थाने प्रवेश होईल. जागावाटपाची बोलणी सुरू असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकोट लोकसभा मतदारसंघाची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसने खंबीर भूमिका घेतल्याने सुरतच्या जागेवर लढण्यास राष्ट्रवादीचे नेते तयार झाले.