Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

सामान्यांचा उमेदवार म्हणून रिंगणात- मंडलिक
कोल्हापूर, २ एप्रिल / विशेष प्रतिनिधी

स्वाभिमानाची बूज राखण्यासाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या िरगणात उतरलो आहे. विचारांवरील निष्ठा आणि मतदारांवरील श्रध्दा हे सूत्र मी माझ्या साठ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात कटाक्षाने पाळले आहे. या कर्तव्याची पोहोचपावती कोल्हापूरची जनता दिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

बंडखोरीसाठी कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह- विश्वजित कदम
चर्चेअंती उद्या निर्णय घेणार
(गणेश जोशी) सांगली, २ एप्रिल
सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करावा म्हणून कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. जिल्हा काँग्रेस समितीने आपल्या नावाची शिफारस केली असताना आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. वैयक्तिक विरोधासाठी नव्हे, तर केवळ सांगली जिल्ह्य़ाच्या विकासासाठी निवडणूक लढवावी, असा आग्रह होत असल्याचे प्रतिपादन विश्वजित कदम यांनी दैनिक ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

अखेर काँग्रेस निष्ठावंत आवळे यांच्या तपश्चर्येला फळ
इचलकरंजी, २ एप्रिल / दयानंद लिपारे

लढ म्हंटल की अंगावर घ्यायच अन् थांब म्हंटल की गतिहीन व्हायचं ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची कार्यशैली. या हुकूमनाम्याची प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जयवंतराव आवळे ज्या जाणीवेतून अंमलबजावणी करताना दिसतात त्यावरून या कार्यशैलीची ओळख पटावी. मार्चच्या प्रारंभी आणखी एकदाच विधानसभा लढवायचीय असे कळकळीने समजावून सांगणारे आवळे पक्षादेश मिळता लातूरच्या मैदानात तिरंगा घेवून उतरले आहेत.

अजितदादांना धास्ती!
अजित पवार यांनी आतापर्यंतच्या अनेक भाषणात विलासरावांवर (लांडे)वेगवेगळी शेरेबाजी केली आहे. नुकत्याच झालेल्या थेरगावच्या मेळाव्यात अजितदादांनी पुन्हा एकदा विलास लांडे यांच्यावर कोटी केली . रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्य़ांत पसरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे घाटाखालचा आणि घाटावरचा असे सरळसरळ दोन भाग आहेत. मतदारसंघात सुरु असलेल्या वेगवेगळ्या आडाख्यांचा अजित पवार यांनी थेरगावच्या मेळाव्यात गमतीदार आढावा घेतला. हा कोण? तर, घाटाखालचा इच्छुक, तो कोण? तर, घाटावरचा इच्छुक, असे आपण सतत ऐकतो आहोत.

साताऱ्यातील अकरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
सातारा, २ एप्रिल/प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलीस दलातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्यांमध्ये तीन पोलीस निरीक्षक व सात सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. कंसात सध्याचे ठिकाण व त्यानंतर बदलीचे नवीन ठिकाण पुढीलप्रमाणे- पोलीस निरीक्षक- अनिल निवृत्ती कदम (फलटण) पुणे शहर, नंदकिशोर सदाशिव भोसले पाटील (वाई) पुणे शहर, दिलीप दौलतराव जगदाळे (स्थानिक गुन्हे शाखा) गुन्हे अन्वेषण पुणे. सहायक पोलीस निरीक्षक- दत्तात्रय सुदाम घोगरे (कराड तालुका) सोलापूर, संभाजी हरगुडे (मेढा) कोकण विभाग, बन्सी शिवाजी निंबाळकर (ढेबेवाडी) ठाणे, जयराम दशरथ पायगुडे (पाचगणी) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शिवाजी मारुती आवटे (भुईंज) गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, कल्लाप्पा पुजारी (सातारा शहर) ठाणे, हरिष दत्तात्रय खेडकर (उंब्रज) कोल्हापूर. डी. बी. पवार (कराड) ठाणे.

सोलापूर श्रमिक पत्रकारांतर्फे पोलीस प्रशासनाचा निषेध
सोलापूर, २ एप्रिल/प्रतिनिधी

गेल्या ३१ मार्च रोजी माढा व सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे उमेदवारी दाखल करण्यासाठी आले असताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांनी दंडुकेशाहीचे दर्शन घडवित पत्रकारांना दिलेल्या हीन वागणुकीचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. यासंदर्भात पत्रकार संघात गुरुवारी सकाळी बैठक झाल्यानंतर सुमारे ४० पत्रकारांच्या शिष्टमंडळाने प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व नंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संघाचे अध्यक्ष दशरथ वडतीले व सरचिटणीस श्रीकांत कांबळे यांच्यासह विविध पत्रकारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तत्पूवी, पत्रकार संघाच्या बैठकीत स्टार माझाचे पुणे ब्युरो चीफ व्यंकटेश चपळगावकर यांचे सोलापूरजवळ अपघाती निधन झाल्याबद्दल दुखवटा व्यक्त करण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेचा मुक्तकंठाने गौरव करुन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

चहाची तल्लफ २२ हजाराला
कोल्हापूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

इब्राहीम दादासाहेब इनामदार या गृहस्थांना आज दुपारी आलेली चहाची तल्लफ चांगलीच महागात पडली. चहा पिण्याच्या नादात त्यांच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीत त्यांनी ठेवलेले २२ हजार रूपये अज्ञात गुन्हेगाराने हातोहात लंपास केले. हा प्रकार आज दुपारी विद्यापीठ रोडवरील पंतमंदिरासमोर घडला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कागल तालुक्यातील सावर्डे गावचे रहिवाशी असलेले इब्राहीम इनामदार (वय ५६) हे आज कोल्हापुरात आले होते. त्यांनी बँकेतून २२ हजार रूपयांची रक्कम काढली. त्यांनी ही रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली होती. दुपारी गावाकडे जात असताना विद्यापीठ रोडवर त्यांना चहाची तल्लफ आली. म्हणून त्यांनी गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभा करून ते चहाच्या टपरीकडे चहा पिण्यासाठी गेले. चहा पिऊन झाल्यानंतर ते आपल्या दुचाकीकडे वळले तेव्हा डिक्की उघडी दिसली. डिक्कीत पाहिले असता त्यांना २२ हजारांची रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले.

पी.डी. पाटील स्मारकास कालिकादेवी पतसंस्थेची
एक लाखाची देणगी
कराड, २ एप्रिल/वार्ताहर

दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या स्मारकासाठी येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नगरसेवक अरुण जाधव यांनी पी.डी. पाटील स्मारक समितीचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी कालिकादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहिरे, मुनीर बागवान, प्रा. अशोक चव्हाण, श्याम वेळापुरे, विवेक वेळापुरे, पी. डी. पाटील स्मारक समितीचे पदाधिकारी, नगरसेवक अॅड. मानसिंगराव पाटील, मुकुंदराव कुलकर्णी, शंकराप्पा संसुही, आनंदराव साळुंखे, ए. एन. मुल्ला, शेखर देशपांडे आदींची उपस्थिती होती.

‘उन्हे परतून गेल्यावर..’ काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन
सोलापूर, २ एप्रिल/प्रतिनिधी

कवी मारुती कटकधोंड यांनी लिहिलेल्या ‘उन्हे परतून गेल्यावर..’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये होत असल्याची माहिती सनराईज प्रकाशन संस्थेचे प्रमुख चित्रकार नागेश सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व कवी दत्ता हलसगीकर, प्रा. राजेंद्र दास आणि डॉ. दिलीप माने यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कवी कटकधोंड यांच्या या काव्यसंग्रहाचा केंद्रबिंदू उपेक्षित माणूस असून त्याला बळ देणारे कवीचे धीराचे शब्द आहेत. परिस्थितीच्या निखाऱ्यातही कवी कटकधोंड भावनांची फुले अंतकरणात ठेवतात. यापूर्वी त्यांच्या ‘कुंपण वेदनांचे’ या काव्यसंग्रहाला गदिमा साहित्य पुरस्कार, कवी शाहीर अनंत फंदी काव्य पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार,मेघदूत साहित्य पुरस्कार मिळाले आहेत

स्वाभिमान संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील पट्टणशेट्टी
सांगली, २ एप्रिल / प्रतिनिधी

स्वाभिमान संघटनेच्या सांगली शहर अध्यक्षपदी येथील सुनील पट्टणशेट्टी यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच स्वाभिमानचे संस्थापक नितेश राणे यांच्या हस्ते पट्टणशेट्टी यांना नुकतेच देण्यात आले. सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ातील स्वाभिमान संघटनेच्या युवक कार्यकर्त्यांचा मेळावा येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात झाला. त्यावेळी ही निवड करण्यात आली. सांगली शहर व परिसरात राबविलेले विविध समाजोपयोगी कार्यक्रम तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याच्या हेतूने राबविलेल्या उपक्रमांची दखल घेऊन स्वाभिमान संघटनेच्या सांगली शहर अध्यक्षपदी सुनील पट्टणशेट्टी यांची निवड केल्याचे राणे यांनी सांगितले. वाढती बेरोजगारी व महाविद्यालयीन जीवनात येणाऱ्या अनंत अडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संघटनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुनील पट्टणशेट्टी यांनी दिली. यावेळी राज्याचे प्रमुख संघटक सम्राट महाडिक, आमदार हाफिज धत्तुरे, प्रथमेश कोळंबकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, अभिजित पाटील व नजीर वलांडकर आदी उपस्थित होते.

हिंदू धर्म प्रसाराचे कार्य मोठय़ा प्रमाणात व्हावे - आसारामबापू
कराड, २ एप्रिल/वार्ताहर

हिंदू धर्म संस्कृती मोडीत काढण्यासाठी काही शक्ती प्रयत्नशील आहे. तरी हिंदू धर्म प्रसाराचे कार्य मोठय़ा प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे मत संत आसारामबापू यांनी व्यक्त केले.
कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर पार पडलेल्या आशीर्वचन सोहळ्यात ते बोलत होते. हिंदू धर्म व संस्कृतीचा इतिहास व परंपरा खूप मोठी आहे. तिचे कौतुक करायला माझ्यासारखे असंख्य आसाराम जन्माला आले तरी अपुरे पडतील. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्णांनी हिंदू धर्माचाच प्रसार केला. आज मात्र हिंदू धर्म संस्कृतीच मोडीत काढण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी आपण सर्वानी धर्मप्रसाराचे काम केले पाहिजे. परमेश्वराला प्राप्त करणे अवघड नाही, पण ते तितके सोपेही नाही. त्यासाठी जगाला ओळखले पाहिजे. मनुष्याच्या जन्माला येऊन परमेश्वर समजावून घेतल्याखेरीज काही एक अर्थ नाही, असे सांगताना, मिशनरी शाळा व व्हॅलेंटाईन डे संस्कृतीवर आसारामबापू यांनी जोरदार टीका केली. आसारामबापूंच्या प्रवचनस्थळाचा मंडप वाऱ्याने उडून गेला होता. मात्र १५० बाय २०० फूट आकाराचा हा मंडप काही वेळात ‘जैसे थे’ करून हा सत्संग सोहळा दिमाखात पार पडला. सुमारे दहा हजार भक्तगणांची त्यात उपस्थिती होती.

मिळकत ब सत्ताप्रकार नियमित कण्याचा निर्णय
इचलकरंजी, २ एप्रिल / वार्ताहर

शहरातील सुमारे १५ हजार मिळकतधारकांना अनेक वर्षे त्रस्त करणारा ब सत्ताप्रकार नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता सुमारे ८ हजार मिळकतधारकांना सतावणाऱ्या क सत्ताप्रकाराबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी मंगळवारी प्रांतकार्यालयात करण्यात आली. प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख यांना महादेव माने, संजय कुलकर्णी, नारायण जाधव, शिवानी ढोले, हेमंत शहा, दिलीप माणगावकर यांचे शिष्टमंडळ भेटले. ब सत्ताप्रकाराबाबत २० जानेवारी रोजी निर्णय घेतल्याने या सत्ताप्रकारातील जमिनींचे नियमितीकरण होणार असल्याचा खुलासा प्रांताधिकाऱ्यांनी केला. या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तथापि शेतजमिनीच्या वापराबाबतच्या क या सत्ताप्रकाराचे प्रकरण प्रलंबित असल्याने ते मार्गी लावावे, यासाठी प्रांताधिकारी, नगर भूमापन, मंडल कार्यालय यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली.

‘शेती सोडण्याची भूमिका मांडणे वैचारिक दिवाळखोरी’
कोल्हापूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी शेती सोडण्याची भूमिका खुद्द कृषिमंत्री शरद पवार हेच मांडत आहेत. त्यांनी व त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाने या भूमिकेद्वारा एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरीच जाहीर केली असल्याची टीका लाल निशाण लेनिनवादी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली. कार्यकारिणीने हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आमदार राजू शेट्टी यांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. सुशीला कुलकर्णी, अतुल दिघे, रमेश खोडे, सर्जेराव खुपिरे, सुवर्णा तळेकर, यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस तसेच शिवसेना-भाजप या राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. दोन्ही काँग्रेसनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारून कंत्राटीकरण, खासगीकरण याद्वारे सामान्य जनतेवर बेकारी लादली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी भांडवलदारांचे धंदे वाढावेत या हेतूने केली असून शेतकऱ्याला कर्जबाजारी ठेवण्याची रचना कायम ठेवली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रघुनाथदादा पाटील हे शेतकऱ्यांचे पुढारी नसून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या ग्रामीण सावकारांचे हस्तक आहेत. ते जातीयवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत अशी टीका या बैठकीत करण्यात आली.