Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

गजानन वाटवे यांचे निधन
पुणे, २ एप्रिल/ प्रतिनिधी
दर्जेदार संगीत अन् भावपूर्ण आवाजातून मराठी सुगम संगीताच्या प्रांतात सहाहून अधिक दशके रसिकांना मोहिनी घालीत ‘वाटवेयुग’ निर्माण करणारे भावगीत- काव्य गायनातील पितामह व ज्येष्ठ संगीतकार गजानन वाटवे यांचे आज येथे दुपारी बाराच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत वाटवे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अग्रलेख : निरांजनातील वात ’
विशेष लेख : अनभिषिक्त सम्राट

भारत जागतिक शक्ती असल्याचे अमेरिकेला मान्य
मनमोहनसिंग-ओबामा भेट
लंडन, २ एप्रिल/पीटीआय
जी-२० देशांच्या लंडन येथे आयोजिलेल्या बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मनमोहनसिंग यांची आज प्रथमच भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांतील स्थितीबरोबरच अन्य महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर ओबामा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत ही जागतिक शक्ती असून, तो अमेरिकेचा प्रमुख सहकारी देश आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पत्रकारांशी स्वतंत्रपणे बोलताना सांगितले की, दहशतवादापासून आपल्याला मोठा धोका आहे यावर अमेरिका व भारत या देशांचे एकमत झाले आहे.

चैत्रातच भडकला वैशाखवणवा!
पुणे, २ एप्रिल / खास प्रतिनिधी
जळगाव ४२ अंश, परभणी ४१.९, सांताक्रुझ ३९.२, पुणे ३९.९ आणि अकोला ४२.६ अंश.. सामान्यत: एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात अनुभवायला मिळणारा उकाडा आत्ताच सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वेळी चैत्र महिन्यातच वैशाख वणवा भडकल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांतही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वगळता उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण व कोरडय़ा वाऱ्यांचा परिणाम म्हणून ‘वैशाख वणवा’ भडकला आहे. त्याचे परिणाम राज्याच्या सर्वच भागात पाहायला मिळत असून, उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

महाराष्ट्रात भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांना ‘जिल्हाबंदी’
संदीप प्रधान
मुंबई, २ एप्रिल
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच सभा होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी सभा होतील, असा अजब निर्णय पक्षाच्या प्रदेश शाखेने घेतल्याने काही उमेदवार व पदाधिकारी हबकले आहेत. भाजपचे हिंदुह्रदयसम्राट मोदी हे केवळ शहरी व काही विशिष्ट भागात प्रभावी ठरू शकतील हे वास्तव नजरेआड करून हा निर्णय घेतल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे.

मंदीतही पायाभूत विकास क्षेत्रात ‘प्लेसमेंट’ची संधी!
२३ लाखांच्या ‘पॅकेज’चा उच्चांक
पुणे, २ एप्रिल/खास प्रतिनिधी
संगणक, माहिती-तंत्रज्ञानासह संपूर्ण अभियांत्रिकी उद्योगाला मंदीचा विळखा पडला असताना पायाभूत विकास क्षेत्रातील ‘प्लेसमेंट’च्या संधी मात्र टिकून आहेत. वर्षांकाठी सरासरी चार ते नऊ लाखाचे वेतन देतानाच तब्बल २३ लाख रुपयांच्या ‘पॅकेज’चा उच्चांक यंदा गाठला गेला आहे!
पुण्याजवळील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कन्स्ट्रकशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रीसर्च’ या संस्थेतील यंदाच्या ‘प्लेसमेंट’च्या आकडेवारीवरून ही आशादायक स्थिती उजेडात आली आहे. संस्थेचे महासंचालक डॉ. मंगेश बोरगावकर, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अधिष्ठाते अजित पटवर्धन आदींनी ‘प्लेसमेंट’बाबत माहिती दिली.

नाशिक पालिका स्थायी समितीस आर्थिक निर्णय घेण्यास मनाई
मुंबई, २ एप्रिल/प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी दोन वर्षांची मुदत संपल्याने निवृत्त होणाऱ्या निम्म्या म्हणजे आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नेमणूक येत्या ७ एप्रिलपासून करायची की १२ जूनपासून करायची असा वाद एका रिट याचिकेच्या रुपाने उपस्थित केला गेल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नाशिकच्या स्थायी समितीस कोणताही आर्थिक निर्णय घेण्यास मनाई करणारा हंगामी आदेश आज काढला. महात्मानगर भागातील एक नगरसेवक शिवाजी त्र्यंबक गांगुर्डे यांनी केलेल्या याचिकेच्या रुपाने हा वाद न्यायालयापुडे आला आहे.

पवारांनी काँग्रेसविरोधात प्रचार न केलेला बरा - चिदंबरम
नवी दिल्ली, २ एप्रिल/खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओरिसामध्ये काँग्रेसविरोधी पक्षांच्या व्यासपीठावर पोहोचले नाही तर बरे होईल, अशी ‘संयमी’ प्रतिक्रिया आज केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली. ओरिसामध्ये बिजू जनता दलाशी जागावाटपात लोकसभेची एक जागा पदरी पाडून घेतल्यानंतर भुवनेश्वरमध्ये काँग्रेसच्या विरोधात बिजदचा प्रचार करण्यासाठी पवार उद्या, शुक्रवारी तिसऱ्या आघाडीच्या जाहीर सभेत भाग घेणार आहेत. पवारांच्या पक्षाची महाराष्ट्रात काँग्रेसशी युती आहे आणि ओरिसात काँग्रेसशी युती नाही, असा उपरोधिक टोला लगावत पवार यांच्या या अजब पवित्र्यावर काँग्रेसला अजिबात आश्चर्य वाटत नसल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. मात्र, ओरिसातील काँग्रेसविरोधी पक्षांच्या व्यासपीठावर पवारांनी न गेलेले बरे, असा सल्लाही चिदंबरम यांनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना दिला. पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करताना युपीएला सोडून शरद पवार तिसऱ्या आघाडीत सामील होत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर यांनी स्पष्ट केले. तिसऱ्या आघाडीच्या व्यासपीठावर प्रचारासाठी जाण्याचा अर्थ तिसऱ्या आघाडीत सामील झालो, असा होत नाही, असाही तर्क त्यांनी दिला.

पोलिटिकल पर्यटन
मुंबई, २ एप्रिल / खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तिसऱ्या आघाडीच्या भुवनेश्वर येथे होणाऱ्या जाहीर सभेला उपस्थित राहणार असल्याने काँग्रेसमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पवारांचा भुवनेश्वर दौरा म्हणजे राजकीय पर्यटन असल्याची खिल्ली काँग्रेसचे सचिव व प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी उडविली आहे.

पाण्यासाठी नगरसेवकांनी टाहो फोडला : पालिका श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या अनेक विभागांत तीव्र पाणीटंचाई भेडसावत असल्याची तक्रार आज सर्व पक्षीय नगरसेवकांनी पालिका सभागृहात केली. पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नगरसेवकांना ऐन निवडणुकीच्या काळात पाणीटंचाई जाणवत असल्याने आयुक्तांनी पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, असे आदेश महापौर शुभा राऊळ यांनी दिले. दरम्यान, पालिकेने वर्षभरात पाणी चोरी प्रकरणी फक्त ५२ लोकांवरच गुन्हे नोंदविले आहेत.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक योगेश सागर यांनी पाणी प्रश्नावर चर्चा उपस्थित केली. अनेक नगरसेवकांनी आपापल्या विभागात कशी पाणी समस्या आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. दिवसभर याच प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू होती. ऐन निवडणुकीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्याने नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मतदारांना काय उत्तर देणार, असा सवाल ते पालिका आयुक्तांना करीत आहेत. काही विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहेत तर काही विभागांत गढूळ पाणी मिळत आहे तर काही विभागांत पाणीच मिळत नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. पालिका प्रशासन मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक योजना आखत आहे, मात्र तरीही पाणी कमी मिळत आहे, हे आयुक्तांनी मान्य केले. पालिकेने वर्षभरात पाणी चोरी प्रकरणी ५२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत आणि तेही फक्त गोवंडी, शिवाजीनगर या विभागातील रहिवाशी आहेत, अशीही माहिती आयुक्तांनी दिली. वर्षभरात पाण्याचे ४६६८ अनाधिकृत नळजोडणी तोडण्याची कारवाई केली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. फक्त ५२ जणांवर गुन्हे आणि तेही फक्त शिवाजीनगर परिसरातीलच का, या प्रश्नाचे उत्तर मात्र आयुक्तांनी दिले नाही.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.


प्रत्येक शुक्रवारी