Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

बहुरंगी लढती
नांदेडमध्ये २२, परभणीत १९ आणि हिंगोलीत ११ उमेदवार

लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात, दि. १६ एप्रिलला मतदान होणाऱ्या नांदेड, परभणी व हिंगोली या मराठवाडय़ातील तीन मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. नांदेडमध्ये २२, परभणीत १९ आणि हिंगोलीमध्ये ११ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारांची संख्या सोळापेक्षा अधिक झाल्याने नांदेडमध्ये दोन मतदानयंत्रे लागतील.

काँग्रेसजनांना कानमंत्र!
परभणी, २ एप्रिल/वार्ताहर

‘काँग्रेसची नेतेमंडळी प्रामाणिकपणे प्रचारात उतरली तर विजय हमखास,’ असे सोपे सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्यासाठी आहे. काँग्रेसवाल्यांना सातत्याने सहभागी करून घेत आपली प्रचारयंत्रणा आखणाऱ्या वरपूडकर यांनी आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यात काँग्रेसजनांकडून अशी हमी घेतली आहे. त्यांनीही काँग्रेसच्या नेतेमंडळींशी चर्चा करून वरपूडकर यांना निवडून देण्याचा कानमंत्र दिला.

मुंडे आणि कुटुंबीय पाच कोटींचे धनी
बीड, २ एप्रिल/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांकडे चालू बाजारमूल्यानुसार सुमारे ५ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांची संपत्ती आहे. विविध बँका व अन्य संस्थांचे सुमारे चार कोटी ५० लाख ९० हजार रुपयांची कर्जे आहेत. लोकसभेच्या बीड मतदारसंघातून श्री. मुंडे यांनी ३१ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याबरोबर जोडलेल्या शपथपत्रात त्यांची व कुटुंबीयांच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

शांतिगिरीमहाराजांचा अर्ज दाखल
औरंगाबाद, २ एप्रिल/प्रतिनिधी

हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या भक्तांनी केलेल्या जल्लोषात वेरुळ मठाचे शांतिगिरीमहाराज मौनगिरी यांनी आज लोकसभेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज सादर केला. ‘जनार्दन स्वामी यांच्या आदेशावरून सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहोत. केवळ कोणाला विरोध म्हणून आपण निवडणूक लढवीत नसून पाप विरुद्ध पुण्य अशी ही लढाई आहे,’ असे ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणआले.शांतिगिरीमहाराज आज क्रांती चौकातून मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे काल सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या या मिरवणुकीकडे शहरातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. सकाळी ११ वाजता ही मिरवणूक निघणार होती.

कोलांटउडी
*नेते बदलतात. पलटी मारतात. आपल्याच मतावरून कोलांटउडी खातात. मागच्या दोन दिवसांत काँग्रेसच्या नेत्यांनी मारलेल्या उडय़ा गंमतीच्या होत्या. राष्ट्रीय पक्षाचा ‘हात’ कसा महत्त्वाचा, हे सांगत ‘चला बंडखोरी करू’चा नारा क्षीण होत गेला. रात्रीतून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी ‘तळ्यात-मळ्यात’चा खेळ मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेलाही जाऊ नका असे कार्यकर्त्यांना बजावणाऱ्यांनी, ते छापून लिहिल्यावर जाहीर सभेत सांगितले, ‘चुकीचे लिहितात.’ पण ते हे विसरले की, त्याचं ते भाषण कॅमेऱ्यात कैद झालं आहे. असो, रात्रीतून त्यांनी बदल केलेल्या भूमिकेवरून चपळाईने कोलांटउडी मारणारा व्यक्ती अशी त्यांची नवी ओळख. ते घडय़ाळाला किती चावी देऊ शकतील, हे लवकरच समजेल.

दुख की लंबी रात
‘भार दु:खाचा सोसता, गेली थकूनिया गात्रं। जखमा जुन्या पुन्हा त्या उसवून गेली रात्र’ असे हे दु:खभोग. माणसाचं अटळ प्राक्तन. दु:खावेग सोसणं, जखमांचं उसवून येणं आणि त्यात डोळ्याला टकळी पडून रात्रीचं लांब होणं हे कु णाला चुकलंय?`Perfect happiness is not man’s destiny’ असं केवळ कवी शेलेलाच जाणवलं असं नाही. समर्थ रामदासांनीही ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे!’ हा प्रश्न विचारलेलाच आहे.

निवडणूक खर्चात भाजपच्या संभाजी पवार यांची आघाडी
‘सिर्फ बीजेपीवाला सही खर्चा बता रहा है क्या?’

नांदेड, २ एप्रिल/वार्ताहर

नांदेड मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी आपला प्रचार सुरू केला असला तरी खर्चाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या संभाजी पवार यांनी आघाडी घेतली आहे.
मतदारसंघात २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भा. ज. प., काँग्रेस, बहुजन समाज पक्ष या तीन राष्ट्रीय पक्षांसह जनसुराज्य पक्षाने निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

तालुक्याचा उमेदवार म्हणून सर्वानी पाठीशी राहावे - दानवे
भोकरदन, २ एप्रिल/वार्ताहर

मी तालुक्याचा उमेदवार असल्याने माझ्या पाठीशी सर्वानी खंबीरपणे उभे राहून मला तालुक्यातून नेहमीप्रमाणे भरघोस मताधिक्य द्यावे, असे आवाहन लोकसभेच्या जालना मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांनी येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालय उद्घाटनप्रसंगी केले.

‘समाजातल्या सर्व घटकांसाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात’
काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी नांदेडमधील सर्वच जाती-धर्माच्या मतदारांचा केवळ मतदानासाठीच वापर केला; त्यामुळे राज्यात ‘जनसुराज्य’ हा पक्ष समर्थ पर्याय म्हणून पुढे आला आहे. आमच्या पक्षाचा नांदेडमध्ये निश्चित विजय होईल. पक्षाचे प्रमुख विनय कोरे यशस्वी उद्योजक आहे. समाजातल्या उपेक्षित, आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी ते आग्रही असतात. राजकारण एका घराण्याभोवती किंवा प्रस्थापितांच्या हाती असू नये या भूमिकेतून समाजातल्या गुणवंतांना, तज्ज्ञांना राजकारणात ‘प्लॅटफॉर्म’ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

‘नांदेडमध्ये चमत्कार घडेल आणि आमचा पक्ष विजयी होईल’
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले बहुजनांचे सरकार केंद्रात आणण्यासाठी या निवडणुकीत मतदार बहुजन समाज पक्षाकडे मोठय़ा अपेक्षेने पाहत आहेत. नांदेडमध्ये चमत्कार घडेल आणि आमचा पक्ष विजयी होईल. केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्व जाती-धर्माच्या लोकांना सत्तेत सहभागी करून घेणारा आमचा एकमेव पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात उमेदवारी देताना ब्राह्मण, मराठा, लिंगायत, बंजारा, आदिवासी या समाजांना संधी देण्यात आली. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळातही समाजातल्या सर्वच घटकांना सामावून घेण्यात आले होते.

आमचा जाहीरनामा
लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाचे जतन महत्त्वाचे

देशातील शेती व्यवसाय संकटात आहे आणि शेताशी संबंधित समाजही. ग्रामीण अर्थव्यवस्थेची दुरावस्था आणि शेती, पाणी, वीज, गरिबी, उपासमार, दुष्काळ इत्यादी प्रश्न ऐरणीवर आहेत. पिण्याचे पाणी आणि शेतीचे सिंचन हे ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत पाणी आणि पाण्याच्या वापरासंबंधी नव्याने राष्ट्रीय धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. आर्थिक धोरण ठरविताना ग्रामीण आणि शहरी भागात दरी वाढणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

हा तुमचा खास लोकाधिकार. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना हवे ते प्रश्न विचारा. फक्त प्रश्न व्यक्तिगत, आरोप करणारे नसावेत, एवढे नक्की. प्रश्न कोणाला विचारायचा आहे, याचा उल्लेख करून नेमक्या शब्दांत प्रश्न विचारा. आपले प्रश्न ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात पाठवा. प्रश्नकर्त्यांचे संपूर्ण नाव व पत्ता अवश्य द्यावा. आपल्याला lokmtv@gmail.com या पत्त्यावरही प्रश्नांचे ‘इ-मेल’ पाठवता येईल. तर करा सुरू..

सोनखेडमध्ये भा.ज.प.ची सभा रद्द
लोहा, २ एप्रिल/वार्ताहर

नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ सोनखेड येथे आज (बुधवारी) सायंकाळी होणाऱ्या जाहीर सभेचा फज्जा उडाला. सभा रद्द करण्याची नामुष्की भा.ज.प. कार्यकर्त्यांवर आली. भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांतील ‘सख्य’ सर्वश्रुत आहे. सोनखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा सायंकाळी चार वाजता होती. सभेला डॉ. धनाजीराव देशमुख, प्रकाश कौडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील, रोहिदास चव्हाण येणार होते. या सभेसाठी माजी कृषी सभापती श्रीनिवास बंडेवार यांना डावलले. शिवाय सभेची जबाबदारी भा.ज.प.चे सदाशिव अंबुरे यांच्यावर होती. सभा सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्याची नामुष्की भाजपा नेत्यावर आली. सभा रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. तत्पूर्वी भा.ज.प उमेदवारांच्या उमेदवारी दाखल करतानाही सोनखेड व परिसरातील शिवसेना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नव्हते. सोनखेड हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

लातूर शहर बससेवा सुरू
लातूर, २ एप्रिल/वार्ताहर
लातूर शहर वाहतूक ‘एलएमटी ’बससेवेस काल सद्गुरू गुरुबाबा महाराज यांच्या हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली. पुष्कराज ट्रॅव्हल्स व लातूर नगरपालिका यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार ही एलएमटी शहर बससेवा सुरू झाली. एलएमटीच्या ११ बसेस शहरातून धावणार आहेत. अत्यंत आरामदायी बसची सेवा अत्यल्प दरात शहरवासियांना उपलब्ध होणार आहे. ३१ प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या या बसमध्ये २६ प्रवासी उभे राहू शकतात. महिला व अपंगांसाठी सीट आरक्षित करण्यात आलेले आहेत. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या शहर बससेवेचे मुख्य नियंत्रण केंद्र गंजगोलाई हे राहणार आहे. येथून मांजरा साखर कारखाना, एमआयटी, राजीव गांधी चौक, कृषी महाविद्यालय, एकमत चौक या मार्गावर बसेस धावतील. राजीव गांधी चौक ते गांधी चौकापर्यंत ४ रुपये, गंजगोलाईपर्यंत ५ रुपये असे भाडे आकारले जाणार आहे. सकाळी आणि सायंकाळी सर्व ठिकाणांहून रेल्वेस्थानकासाठी शहर बसवाहतूक होणार आहे. यासाठी ८ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या बससेवेचे ४० थांबे राहणार आहेत. या उद्घाटनप्रसंगी पुष्पराज ट्रॅव्हल्सचे संचालक व्यंकट पनाळे, युवराज पनाळे उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या परवानगीने पोलिसांच्या बदल्या
उस्मानाबाद, २ एप्रिल/वार्ताहर
दीर्घकाळ एकाच ठिकाणी असणाऱ्या आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज निवडणूक आयोगाच्या परवानगीने करण्यात आल्या आहेत. पाच पोलीस निरीक्षक व तीन सहायक पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे. राज्याचे पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम शेख यांना राज्य गुन्हा अन्वेषण पुणे, भूम पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. कुताटे यांची लातूर येथे बदली झाली. जिल्हा विशेष शाखेचे रशीद शेख यांना परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात आले आहे. लोहारा पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण वडजे यांना लातूर येथील प्रशिक्षण विद्यालय, तर भूम येथील पोलीस निरीक्षक भोसले यांना पुणे शहर येथे हलविण्यात आले आहे. एकाच वेळी आठ पोलीस निरीक्षकांची बदली झाली असून जिल्ह्य़ात तीन नवीन पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत.

देगलूर येथे रविवारी अडवाणी यांची सभा
नांदेड, २ एप्रिल/वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या देगलूरमधील सभेकडे जनतेचे लक्ष लागून आहे. देगलूर येथे रविवारी (दि. ५) सकाळी १० वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे नांदेड मतदारसंघातील उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी उपस्थित असतील. देगलूरची ही सभा यशस्वी करण्यासाठी भाजप कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर श्री. अडवाणी यांची जिल्ह्य़ात सभा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

आडसकर शनिवारी अर्ज भरणार
बीड, २ एप्रिल/वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश आडसकर शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यानंतर पारसनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या वेळी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक डक यांनी दिली. लोकसभेच्या बीड मतदारसंघातून आडसकर हे शनिवार, ४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. होणाऱ्या सभेला अजित पवार यांच्यासह सरचिटणीस गोविंदराव आदिक, संपर्कमंत्री बबनराव पाचपुते, मंत्री विमलताई मुंदडा, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह काँग्रेस, रिपाइंचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

वैद्यकीय व्यावसायिकास पत्नीच्या खुनाबद्दल अटक
धारूर, २ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील धूनकवाड येथे एका परप्रांतीय आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकास पत्नीचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आज अटक केली. समीर मनमथ बिसबास (वय २६, मूळ राहणार कानखुला, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. तो वैद्यकीय व्यवसाय करतो. पत्नी जया (वय १९) हिने ३१ मार्चला विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार त्याने धारूर पोलीस ठाण्यात दिली. उत्तरीय तपासणीनंतर डॉ. अरुण घुगे व डॉ. कल्पना इटगर यांनी दिलेल्या अहवालावरून जयाचा गळा व तोंड दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी काल खुनाचा गुन्हा दाखल करून समीरला अटक केली. त्याला दि. ६पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

गेवराई तहसील कार्यालयात पिण्यासाठी पाणी नाही
गेवराई, २ एप्रिल/वार्ताहर
तालुक्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या तहसील कार्यालयातच पिण्याचे पाणी नाही. प्रशासनाने येथे कोटय़वधी रुपयांची इमारत बांधली. मात्र, तहानलेल्यांसाठी पाण्याची व्यवस्था करता आली नाही. इमारतीच्या तिन्ही मजल्यांवर पाणी नाही. कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी शंभर मीटर बाहेर जावे लागत आहे. तालुक्यातील कोणत्या गावात पाणीटंचाई आहे याचा वेध घेणारे तहसीलदार स्वत:च्या कार्यालयातील पाणीटंचाईबाबत मात्र अनभिज्ञ आहेत. निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागातील कर्मचारी सध्या तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर घेतले आहेत. निवडणूक तसेच नियमित कामासाठी रोज हजारो नागरिक तहसील कार्यालयात येतात. तीव्र उन्हाळ्याचे चटके बसू लागल्याने येथे येणाऱ्या प्रत्येकाला तहान लागते. पाण्याच्या शोधात नागरिक नूतन इमारतीचे तीनही मजले फिरतात, तरीही पाणी कोठेच आढळत नाही. नाइलाजाने बाहेरील हॉटेलवर जावे लागते. तेथेही तीन रुपयांचा अर्धा चहा घेतल्यावरच पाणी मिळते.

कायद्याचे राज्य निर्माण होणे आवश्यक - न्या. क्षीरसागर
निलंगा, २ एप्रिल/वार्ताहर

समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याचे राज्य निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एम. एस. क्षीरसागर यांनी केले. तालुक्यातील काटेजवळगा येथे विधिसेवा समिती व ग्रामपंचायत यांनी ‘मायक्रोलीगल लिटरसी कॅम्प’ आयोजित केला होता. त्याच्या अध्यक्षस्थानावरून श्री. क्षीरसागर बोलत होते. शिबिराचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश ए. डी. गोंडाणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे, एल. डी. हुल्ली, न्या. कु. रजिता पाटील, एस. के. सरदेशमुख, जी. बी. पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. क्षीरसागर म्हणाले, लोकांना कायद्याचे ज्ञान व्हावे व समाज कायदाविषयक साक्षर व्हावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तंटामुक्त गावमोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी रजिता पाटील, एन. एन. मरे, एस. व्ही. पिंपळे, पी. बी. एखंडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नारायण सोमवंशी यांनी व सूत्रसंचालन जी. टी. देशमुख यांनी केले.

नांदेड मतदारसंघातील सहा हजार नावे वगळली
नांदेड, २ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी सहा हजार ४०७ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.नांदेड मतदारसंघातील वेगवेगळ्या सहा मतदारसंघांतील मतदारांची संख्या १४ लाख ४४ हजार ९२५ एवढी होती. अनेक मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी होती तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्यांची नावे मतदारयादीत होती. शिवाय काही मृत मतदारांची नावे यादीत कायम होती. अशा मतदारांची नावे शोधण्याचे काम गेल्या १५ दिवसांपासून सुरू होते. नुकतेच हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आज सहा हजार ४०७ मतदारांची नावे वगळण्यात आली. नांदेड लोकसभा मतदारसंघात आता सात लाख ३८ हजार ५८० पुरुष व सहा लाख ९९ हजार ९३८ स्त्री मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाने काल अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केल्यामुळे नव्या मतदारयादीनुसार मतदान होईल, असे स्पष्ट करण्यात आले. ज्या मतदारांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी नावे होती अशांची त्यांच्या इच्छेनुसार एका ठिकाणी नावे ठेवण्यात आली आहेत.

रिक्षा उलटून १ ठार, १ जखमी
निलंगा, २ एप्रिल/वार्ताहर
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपे रिक्षा शहरातील पेठमधील सिरसी रस्त्यावर उलटल्याने १ ठार व १ गंभीर जखमी झाला. निलंगा-कासार सिरसी रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा (क्रमांक एमएच-२४-ए-२६७०) आज सकाळी ७.३० वाजता उलटली. त्यामुळे महादेव अप्पाराव बिराजदार (वय ५५, पालापूर) व मियाँसाब उस्मानसाब बागवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार चालू असताना महादेव बिराजदार यांचे निधन झाले. उजानंद महादेव बिराजदार यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अपघातात व्यावसायिक ठार
अंबाजोगाई, २ एप्रिल/वार्ताहर

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची धडक बसून धर्मापुरी (परळी) येथील उपाहारगृहचालक ईश्वर योगीराज फड (वय ४९) ठार झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून धर्मापुरीची बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली होती. फड काल सकाळी मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच ४४ ए १७५३) शेतातून परतत होते. किनगावकडे जाणाऱ्या जीपची खापरटोन पाटीवर त्यांना धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या फड यांना औरंगाबादच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. रात्री त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर धर्मापुरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी सरपंच परमेश्वर फड त्यांचे बंधू होत.

‘वीज कंपनीच्या सेवांमध्ये तत्परता
औरंगाबाद, २ एप्रिल/प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये मागील दोन वर्षांत बरीच सुधारणा झाली असून सेवांमध्ये तत्परता आली असल्याचे मत महाराष्ट्राचे विद्युत लोकपाल वासुदेव गोरडे यांनी व्यक्त केले. भारतीय विद्युत कायदा २००३ व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग अधिनियम २००५ मधील तरतुदी तसेच वीज ग्राहकांना प्रदान करावयाच्या सेवेबाबत महावितरणच्या वतीने औरंगाबाद परिमंडलाच्या सभागृहात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात श्री. गोरडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता किशोर शिर्सीकर, मुंबई ग्राहक मंचाचे अध्यक्ष डॉ. अशोक पेंडसे, औरंगाबाद ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एच. ए. हंबीरे यावेळी उपस्थित होते. वीज गळती कमी करणे तसेच सेवेत तत्परता दाखविणे यामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी भारतीय विद्युत कायद्याच्या कलमांचा उपयोग समस्या सोडविण्यासाठी करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले
औरंगाबाद, २ एप्रिल/खास प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील सुमारे साडेतीन हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. दिवाळीच्या वेळी द्यावयाची भाऊबीज आता देणे सुरू झाले आहे. आचारसंहितेच्या नावाखाली चार महिन्यांचे मानधन रखडले आहे. हे मानधन लवकर दिले नाही तर आचारसंहिता झुगारून आंदोलन केले जाईल, असा इशारा आयटकप्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेने दिला आहे. नियमीत मानधनाचा आणि आचारसंहितेचा काहीही संबंध नाही. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यासही पोलीस यंत्रणेकडून अडथळे निर्माण होत आहेत. आंदोलन करण्याचा आणि आचारसंहितेचा संबंध नाही, असे मत संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राम बाहेती यांनी व्यक्त केले.

सुभाष पाटील यांना ‘मनसे’ची उमेदवारी
औरंगाबाद, २ एप्रिल/खास प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मराठवाडा संघटक सुभाष पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची घोषणा मुंबईत करण्यात आली. औरंगाबाद विमानतळावर सुभाष पाटील यांचे आगमन झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. त्यांचे स्वागत करण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. औरंगाबादेत शिवसेना स्थापन करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. राज ठाकरे यांनी शिवसेनेचा त्याग केल्यानंतर मनसे स्थापन केली. श्री. पाटील यांनी राज गटात प्रवेश केला. शिवसेनेचे ते माजी जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेने त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यांची कामगार संघटना व्हिडिओकॉनसारख्या मोठय़ा कंपन्यांमध्ये आहे. मनसेने त्यांच्यावर मराठवाडा संघटक म्हणून जबाबदारी सोपविलेली आहे.

खेळाने मन, मेंदू, मनगट सशक्त होते - डॉ. पवार
लातूर, २ एप्रिल/वार्ताहर

दैनंदिन जीवन जगत असताना कोणताही एक मैदानी खेळ प्रत्येकाने खेळला पाहिजे. खेळाने मनगटासोबतच मन व मेंदू सशक्त होत असते, असे प्रतिपादन जयक्रांती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुसुम पवार यांनी केले. मातोश्री रुक्मिणीदेवी शिंदे विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सॉफ्टबॉल व बेसबॉल प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोज शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जी. एन. शिंदे उपस्थित होते. या वेळी प्रशिक्षण प्रा. राजेश कारंजकर, नितीन खानापूरकर, विशाल बेलुरे, श्रद्धा हंचाटे उपस्थित होते.या वेळी शिबिरार्थीना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्राचार्य जी. एन. शिंदे, प्राचार्य मनोज शिंदे यांचीही भाषणे झाली. या शिबिरात पाचवी ते दहावी वर्गातील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. प्रास्ताविक प्रशिक्षक प्रा. राजेश कारंजकर यांनी केले. सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले तर आभार सूरज येलगुडे यांनी मानले.

तापाची साथ तीन गावांत पसरली
सोयगाव, २ एप्रिल/वार्ताहर
वेताळवाडी पाठोपाठ तालुक्यातील सावरखेडा, दत्तवाडी, पांढरवाडी या गावात ताप व मलेरियाची साथ पसरली असून या गावात १४ रुग्ण आढळले आहे. वेताळवाडी येथे व्हायरल फिव्हरची साथ सुरू असून अन्य तीन गावांतील १४ रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत व त्यांना औषधे देण्यात आली आहेत. जरंडी आरोग्य केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक हिवरी येथे गेल्याने या रुग्णांवर उपचार होऊ शकले नाही.

रीव्हरडेल हायस्कूलचा वार्षिक महोत्सव
औरंगाबाद, २ एप्रिल/प्रतिनिधी

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानाच्या मागे न लागता आपल्याला आवड असलेल्या खेळ आणि कलेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सेवानिवृत्त सनदी अधिकारी जयंतराव देशपांडे यांनी केले. रीव्हरडेल हायस्कूलचा वार्षिक वितरण समारंभ नुकताच झाला. त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी हे होते.

लाच घेताना हवालदारास अटक
औरंगाबाद, २ एप्रिल/प्रतिनिधी

अटकेऐवजी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी विहामांडवा येथील एकाकडून दोन हजार रुपये लाच घेताना पाचोड पोलीस ठाण्याचे हवालदार सहकारी वाल्मीक भोपळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. विहामांडवा येथील पोलीस चौकीतच या विभागाचे पोलीस निरीक्षक रामनाथ चोपडे यांनी ही कारवाई केली.

किसनराव सुरडकर यांचे निधन
औरंगाबाद, २ एप्रिल/प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त तलाठी किसनराव काशीनाथ सुरडकर यांचे नुकतेच निधन झाले.ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन भाऊ, भावजया, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.