Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गजानन वाटवे यांचे निधन
पुणे, २ एप्रिल/ प्रतिनिधी

 

दर्जेदार संगीत अन् भावपूर्ण आवाजातून मराठी सुगम संगीताच्या प्रांतात सहाहून अधिक दशके रसिकांना मोहिनी घालीत ‘वाटवेयुग’ निर्माण करणारे भावगीत- काव्य गायनातील पितामह व ज्येष्ठ संगीतकार गजानन वाटवे यांचे आज येथे दुपारी बाराच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन कन्या, सून व नातवंडे असा परिवार आहे. संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत वाटवे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चांगल्या कविता उत्तम चाली लावून ऐकण्याची सवय मराठी रसिकांना लावणारे वाटवे यांचे हे कार्य एखाद्या व्रतस्थाप्रमाणे सुरू होते. वयाच्या नव्वदीतही वेगवेगळ्या चाली शोधण्याची आवड ते मनापासून जोपासत होते. मात्र, मागील दीड वर्षांपासून ते आजारी होते. त्यातच आज दुपारी कर्वेनगर भागातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ८ जुलै १९१७ मध्ये बेळगावात जन्मलेल्या वाटवे यांनी संगीतसाधना करण्यासाठी वयाच्या पंधराव्या वर्षीच आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन घर सोडले व पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात ते दाखल झाले. ‘गोपाळ गायन समाज’चे गोविंदराव देसाई यांनी त्यांच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था केली. स्वतंत्रपणे स्वररचना करण्याची संधी त्यांना याच ठिकाणी मिळाली. फग्र्युसन महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या वेळी त्यांचा काव्यगायनाचा पहिला कार्यक्रम झाला. त्या वेळी केवळ सात रुपये बिदागी मिळालेले वाटवे मात्र पुण्यात सर्वपरिचित झाले. १९४० मध्ये ग्रामोफोन कंपनीने त्यांची ‘वारा फोफावला’ ही पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्यानंतर मात्र गायक व संगीतकार म्हणून वाटवे यांचे नाव प्रसिद्ध झाले.
मराठी भावगीताचे जनक ठरलेल्या वाटवे यांनी नंतरच्या काळामध्ये भावसंगीतातील एक स्वतचे वेगळे विश्व निर्माण केले. ‘मोहुनिया तुजसंगे’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘दुभंगुनी जाता जाता मी अभंग झालो’, ‘फांद्यावरी बांधिले गं’, ‘मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला’, ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चल चल चंद्रा पसर चांदणे’, ‘घर दिव्यात तरी’, ‘यमुनाकाठी ताजमहाल’, ‘मी निरंजनातील वात’ आदी अनेक लोकप्रिय गितांचा खजिना त्यांनी रसिकांसमोर रिता केला. मालती पांडे, मोहनतारा अिजक्य, माणिक वर्मा, बबनराव नावडीकर अशा ज्येष्ठांप्रमाणेच अलीकडच्या काळातील अनुराधा मराठे, रंजना जोगळेकर, रवींद्र साठे यांनीही त्यांची गाणी गायली आहेत. १९४२ ते १९५८ या काळात त्यांनी सात मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायनही केले. संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना ‘लता मंगेशकर’, ‘सुशीलस्नेह’, ‘युग प्रवर्तक’ आदींसह गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘गगनी उगवला सायंतारा’ हे आत्मचरित्र व ‘निरंजनातील वात’ हे त्यांच्या गीतांचा समावेश असलेले पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे, अरुण दाते, दत्ता वाळवेकर, वाटवे यांच्या कन्या मंजिरी चुनेकर, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक अरिवद व्यं. गोखले, निवासी संपादक मुकुंद संगोराम, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ तसेच डॉ. सतीश देसाई, सुनील महाजन, मनोहर कुलकर्णी, श्रीपाद उंबरेकर, संजय पंडित, अजय दोंगडे, प्रा. प्रकाश भोंडे, शैला मुकुंद, संगीता बरवे, प्राजक्ता जोशी- रानडे, अश्विनी टिळक, शोभा अभ्यंकर आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.