Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चैत्रातच भडकला वैशाखवणवा!
पुणे, २ एप्रिल / खास प्रतिनिधी

 

जळगाव ४२ अंश, परभणी ४१.९, सांताक्रुझ ३९.२, पुणे ३९.९ आणि अकोला ४२.६ अंश.. सामान्यत: एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात अनुभवायला मिळणारा उकाडा आत्ताच सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वेळी चैत्र महिन्यातच वैशाख वणवा भडकल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांतही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वगळता उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण व कोरडय़ा वाऱ्यांचा परिणाम म्हणून ‘वैशाख वणवा’ भडकला आहे. त्याचे परिणाम राज्याच्या सर्वच भागात पाहायला मिळत असून, उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच रात्रीच्या वेळीसुद्धा गारवा नसल्याने दिवसभरात कसलाच दिलासा मिळत नाही. कोकणापासून विदर्भापर्यंत राज्याच्या सर्वच भागात आत्ताच कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढले आहे. त्यामुळे एप्रिलची महिन्याची अखेर व मे महिन्यात उकाडय़ाची काय स्थिती असणार, याबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. राज्यात नोंदवल्या गेलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात त्यांची सरासरीशी तुलना दिली आहे)- मुंबई-कुलाबा ३४.७ (३), सांताक्रुझ ३९.२, अलिबाग ३४.७ (४), डहाणू ३६.९ (६), पणजी ३४ (२), महाबळेश्वर ३१.५ (२), जळगाव ४२ (२), मालेगाव ४१.२ (३), नाशिक ३९.५ (२), पुणे ३९.९ (३), सातारा ३८.८, सोलापूर ४१.४ (३), कोल्हापूर ३६.४ (-१), औरंगाबाद ३९.८ (३), परभणी ४१.९ (३), अकोला ४२.६ (४), नागपूर ४२.२ (४).
उत्तरेकडील वारे येत असतानाच हवेतील बाष्प कमी झाले आहे. त्यामुळे तापमान वाढूनही पावसाचा पत्ता नाही. काल केवळ कोल्हापूर येथे पावसाच्या सरी पडल्या. या स्थितीत येत्या दोन दिवसांत तरी विशेष बदल होण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेमधून सांगण्यात आले.