Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

महाराष्ट्रात भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांना ‘जिल्हाबंदी’
संदीप प्रधान
मुंबई, २ एप्रिल

 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारधुमाळीत महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच सभा होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी सभा होतील, असा अजब निर्णय पक्षाच्या प्रदेश शाखेने घेतल्याने काही उमेदवार व पदाधिकारी हबकले आहेत. भाजपचे हिंदुह्रदयसम्राट मोदी हे केवळ शहरी व काही विशिष्ट भागात प्रभावी ठरू शकतील हे वास्तव नजरेआड करून हा निर्णय घेतल्याचे काही उमेदवारांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील भाजपमध्ये सामुहिक नेतृत्व ठसविण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी व सरचिटणीस विनोद तावडे करीत आहेत. निवडणुका जाहीर होताच दिल्लीतून नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रातील निवडणुकीची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेऊन गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या सभा होतील, असे भाजपने ठरवले आहे. याखेरीज नितीन गडकरी हे विदर्भात, गोपीनाथ मुंडे मराठवाडय़ात, विनोद तावडे कोकण व ठाण्यात तर एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी प्रचार करतील, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. प्रमोद महाजन हयात असताना ते व गोपीनाथ मुंडे दोघे महाराष्ट्रात प्रचार करीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे हे सर्वाधिक जाहीर सभा घेत होते. युतीच्या प्रचाराचा झंझावात या सभांमधून दिसून येत असे. आता केवळ एकटे मुंडे हे राज्यभरात शेकडो सभा घेऊन प्रचारात झंझावात उभा करीत असल्याचे चित्र दिसू नये याकरिता भाजपच्या चार नेत्यांना सहा विभाग वाटून दिले आहेत. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाच्या २२ उमेदवारांच्या मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे २२ सभा घेणार आहेत. यापूर्वी भाजप नेते शिवसेना उमेदवारांच्या मतदारसंघात सभा घेत तर भाजपचे उमेदवार शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला विजयी करण्याकरिता आशीर्वाद देण्याकरिता मतदारसंघात सभा घ्यावी, असा आग्रह धरीत होते. यावेळी युतीमधील दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगण्यात आले.