Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भारत जागतिक शक्ती असल्याचे अमेरिकेला मान्य
मनमोहनसिंग-ओबामा भेट
लंडन, २ एप्रिल/पीटीआय

 

जी-२० देशांच्या लंडन येथे आयोजिलेल्या बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व पंतप्रधान मनमोहनसिंग यांची आज प्रथमच भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांतील स्थितीबरोबरच अन्य महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर ओबामा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत ही जागतिक शक्ती असून, तो अमेरिकेचा प्रमुख सहकारी देश आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पत्रकारांशी स्वतंत्रपणे बोलताना सांगितले की, दहशतवादापासून आपल्याला मोठा धोका आहे यावर अमेरिका व भारत या देशांचे एकमत झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी दहशतवादाचा एकजूटीने मुकाबला करण्याची गरज आहे.
मनमोहनसिंग म्हणाले की, मुंबईवर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधार कोण आहेत याचे सबळ पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहेत. या पुराव्यांची छाननी करून मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर पाकिस्तानने कठोर कारवाई करायला हवी. या आमच्या किमान अटीची पाकिस्तानने पूर्तता झाल्यानंतरच त्या देशाशी भारतपुन्हा चर्चेस प्रारंभ करील. काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी पुन्हा कधी चर्चा सुरू करणार या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मनमोहनसिंग म्हणाले की, सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवाया जोवर थांबविल्या जात नाहीत व जोपर्यंत शेकडो लोक मारले जात आहेत तोपर्यंत पाकिस्तानशी भारत पुन्हा चर्चा सुरू करणे शक्य नाही असेही ते पुढे म्हणाले.
सध्या जागतिक स्तरावर निर्माण झालेली मंदी हे आजवरचे सर्वात मोठे आर्थिक संकट आहे असे सांगून मनमोहनसिंग पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे स्रोत वाढविण्याची आवश्यकता आहे. जागतिक मंदीप्रकरणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीही काही अंशी दोषी आहे.