Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

नॅनो पाहायला तुफान गर्दी!
मुंबई, २ एप्रिल/प्रतिनिधी

 

‘स्वदेस’ चित्रपटात छोटय़ाशा गावात नवीन आलेल्या कारवानभोवती लहान-मोठे सगळे गावकरी जमा होतात.. काहीतरी अद्भूत बघितल्याचे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते त्या गाडीला स्पर्श करतात, काचेतून गाडीत काय आहे ते पाहत असतात आणि दार उघडताच सगळी झुंबडच्या झुंबड त्यात शिरते.. तसेच काहीसे दृश्य आज काळाघोडा येथील टाटांच्या वेस्टसाईड या शोरुममध्ये बघायला मिळाले.. निमित्त होते, रतन टाटा यांनी आपले वचन पूर्ण करुन आणलेली एक लाखांची ‘नॅनो’ कार!
छोटय़ाशा आकाराची पण तेवढीच आरामदायक अशी ही ‘नॅनो’ बघायला दोन दिवसांत तब्बल दोन ते अडीच हजार लोकांनी शोरुमला भेट दिली. एरवी नुसतीच खरेदी करायला येणारे लोक काल खास ‘नॅनो’साठी वेस्टसाईडमध्ये येत होते. ‘नॅनो’चे कौतुक आणि रतन टाटांना लाख लाख धन्यवाद देऊन गाडी घ्यायची का हा प्रश्न स्वत:लाच विचारत बाहेर पडत होते. खरेदी करतानासुद्धा कपडे कसे आहेत, या पेक्षा नॅनो किती छान आहे याचीच चर्चा सुरु होती. मोठय़ा माणसांबरोबरच तरुणही आपल्या आवाक्यात असलेली ही कार बघायला येत होते. त्यात बसून गाडीचा ‘फील’ घेत होते. पुढच्या सीटवर बसून गाडीची सीट अ‍ॅडजेस्ट होते का, समोरचं कुठवर दिसतं याचा अंदाज घेत होते. तर काहीजणांनी मागच्या सीटवर बसून आपण किती आरामशीरपणे बसू शकतो याचाही अंदाज घेतला. खास कुटुंबाकरता ही कार असल्यामुळे ड्रायव्हरसकट चार जण व्यवस्थित बसू शकतील या दृष्टीने या गाडीची रचना करण्यात आली आहे. पण मागच्या सीटवर दोघांबरोबरच एखादा पाहूणासुध्दा बसू शकतो, एवढी जागा आहे, असे म्हणून जर अचानक एखादा पाहूणा आला तर त्याची सोय होईल, याने समाधान पावत होते.
६० ते ७० हजार रुपयांची बाईक घेण्यापेक्षा ही छोटीशी कार घेणे केव्हाही योग्य अशी प्रतिक्रिया एका तरुणाने व्यक्त केली. तरा रतन टाटा ग्रेट आहेत. त्यांनी सर्वसामान्यांचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. अशी प्रतिक्रिया काही कॉलेज विद्यार्थीनींनी व्यक्त केली. नॅनोमुळे पार्किंगची समस्या मागे पडेल, ट्रॅफिक जाम होईल या सगळ्या शंका-कुशंकांना यावेळी कुठेही जागा नव्हती!