Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘रहिवाशांच्या विरोधाला महापालिका जुमानत नाही’
रिलायन्सच्या टॉवरकरिता महापालिका अधिकाऱ्यांच्या पायघडय़ा
मुंबई, २ एप्रिल/प्रतिनिधी

 

दहिसर (प.) नवागांव येथील एल. एम. मार्गावरील सुयोग अपार्टमेंटच्या ‘ए’ व ‘बी’ विंगच्या गच्चीवर रिलायन्स मोबाईल कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या टॉवरला सुयोग सोसायटी व आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांचा तीव्र विरोध असतानाही महापालिका अधिकारी कंपनीचे चाकर असल्याप्रमाणे या टॉवरकरिता पायघडय़ा घालत आहेत, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सुयोग अपार्टमेंटचे अध्यक्ष बी. डी. तोंडवळकर यांनी मुंबईच्या महापौर शुभा राऊळ व सहाय्यक महापालिका आयुक्त पराग मसुरकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमच्या सोसायटीवर रिलायन्सचा टॉवर उभारण्यासंबंधी कोणताही अर्ज महापालिकेकडे दाखल केलेला नाही. त्यामुळे टॉवरची उभारणी बेकायदा आहे. हा टॉवर त्वरित पाडून टाकण्याची मागणी त्यांनी केली. तोंडवळकर यांच्या पत्राप्रमाणेच आजूबाजूच्या सोनारग्राम व अन्य सोसायटय़ांनी टॉवरच्या उभारणीला विरोध केला आहे. महापालिकेच्या इमारत प्रस्ताव कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या रहिवाशांना तेथील अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सांगितले की, जेव्हा आमच्यासमोर मोबाईल टॉवरचा प्रस्ताव येतो तेव्हा ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ व स्थापत्य अभियंत्याचे इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र पाहतो. या टॉवरला कुणाचा विरोध आहे किंवा संबंधित सोसायटीचे पदाधिकारी अधिकृत आहेत वा अनधिकृत आहेत याची खातरजमा आम्ही करीत नाही. जेथे टॉवर उभा केला जात आहे तेथील साईटला आम्ही भेटही देत नाही. मोबाईल टॉवरची उभारणी करणारी कंपनी अगोदर इमारतीवर टॉवरची उभारणी करते. मग दोन-तीन महिन्यांनंतर मोबाईल कंपनी टॉवरच्या उभारणीसाठी महापालिकेकडे अर्ज करते. रहिवाशांच्या विरोधाला महापालिका जुमानत नाही. महापालिका अधिकारी उघडउघड मोबाईल कंपन्यांचे चाकर असल्यापणे वागत असल्याचे रहिवाशांनी तक्रारीत म्हटले आहे.