Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला!
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी

 

गजाननराव वाटवे यांच्या निधनाने मराठी भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला असल्याची भावना संगीतप्रेमी आणि भावसंगीत विश्वात व्यक्त करण्यात येत आहे. वाटवे यांनी मराठी भावगीतांचा पाया घातला आणि ठिकठिकाणी भावगीत गायनाचे कार्यक्रम करून ती रसिकांपर्यंत पोहोचवली. मराठी भावसंगीत लोकप्रिय करण्यात वाटवे यांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रियाही या मान्यवरांनी व्यक्त केली.
यशवंत देव - गजाननराव वाटवे यांच्या निधनाने भावगीतांमधील युगपुरुष हरपला आहे. वाटवे हे कवितेतील, गीतातील भावाला शरण जाऊन गात असत. त्यामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या केवळ ओठावर न राहता थेट हृदयापर्यंत पोहोचत असे. भावगीतांमध्येही त्यांनी अनेक प्रयोग केले. अनेक कवितासंग्रह वाचून ते स्वत: गाण्यांची निवड करत आणि चाल लावून ती गात असत. मी लहान असल्यापासून त्यांचे गाणे ऐकत आलो आहे.
अरुण दाते - भावगीत हा गाण्याचा प्रकार म्हणून ज्यांनी लोकप्रिय केला व त्याला प्रसिद्धी मिळवून दिली, असे गजाननराव वाटवे भावगीतांचे जनक होते. वाटवे यांची अनेक भावगीते त्याकाळी लोकप्रिय झाली आणि आजही आहेत. वाटवे हे पुण्यात कार्यक्रम करायचे तेव्हा पुण्यातील रस्ते रसिकांच्या गर्दीने फुलून जायचे.
मंगेश पाडगावकर - भावगीत गायनाच्या क्षेत्रातील ऋषितुल्य कलावंत, असेच वाटवे यांचे वर्णन करावे लागेल. माझ्या वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी वाटवे यांनी आपल्या गायनाने आम्हाला वेडे केले होते. त्यांच्या ‘वारा फोफावला, दर्या उफाळला’ या गाण्याने आमच्या पिढीला भारून टाकले होते. त्या वयात गणेशोत्सवात खच्चून गर्दीत दोन-दोन तास उभे राहून त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आम्ही ऐकले आहेत. वाटवे यांनी भावगीत गायनाची एक परंपरा निर्माण केली. कवितांची उत्तम जाण, शब्दांचे स्पष्ट व भावपूर्ण उच्चार, गोड व सुरेल आवाज, नाटकीपणा न करता कवितेतील नाटय़ व्यक्त करण्याची सहजता हे वाटवे यांच्या गायनाचे वैशिष्टय़ होते. त्यांनी निर्माण केलेल्या परंपरेत अनेक गायक वाढले. त्यांचे सूर व त्यांच्या स्वररचना मनात घोळवत त्यांचे स्मरण करणे हेच आता शक्य आहे.
गोविंद पोवळे - वाटवे हे सुगमसंगीत आणि भावगीतामधील अढळ ध्रुवतारा होते. जोपर्यंत मराठी संगीत कायम आहे तोपर्यंत वाटवे यांचे नाव आणि त्यांची गाणी रसिकांच्या मनात कायम घर करून राहतील.
विनायक जोशी - मराठी भावगीतांचा ‘सायंतारा’ आता कायमचा लोपला. भावगीत हाच त्यांचा श्वासोच्छवास होता. वाटवे हे भावगीतामधील ‘ताजमहाल’ होते.