Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
प्रादेशिक

नॅनो पाहायला तुफान गर्दी!
मुंबई, २ एप्रिल/प्रतिनिधी

‘स्वदेस’ चित्रपटात छोटय़ाशा गावात नवीन आलेल्या कारवानभोवती लहान-मोठे सगळे गावकरी जमा होतात.. काहीतरी अद्भूत बघितल्याचे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते त्या गाडीला स्पर्श करतात, काचेतून गाडीत काय आहे ते पाहत असतात आणि दार उघडताच सगळी झुंबडच्या झुंबड त्यात शिरते.. तसेच काहीसे दृश्य आज काळाघोडा येथील टाटांच्या वेस्टसाईड या शोरुममध्ये बघायला मिळाले.. निमित्त होते, रतन टाटा यांनी आपले वचन पूर्ण करुन आणलेली एक लाखांची ‘नॅनो’ कार!

‘रहिवाशांच्या विरोधाला महापालिका जुमानत नाही’
रिलायन्सच्या टॉवरकरिता महापालिका अधिकाऱ्यांच्या पायघडय़ा
मुंबई, २ एप्रिल/प्रतिनिधी
दहिसर (प.) नवागांव येथील एल. एम. मार्गावरील सुयोग अपार्टमेंटच्या ‘ए’ व ‘बी’ विंगच्या गच्चीवर रिलायन्स मोबाईल कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या टॉवरला सुयोग सोसायटी व आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाशांचा तीव्र विरोध असतानाही महापालिका अधिकारी कंपनीचे चाकर असल्याप्रमाणे या टॉवरकरिता पायघडय़ा घालत आहेत, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तांना हायकोर्टाचा चाप!
मुंबई, २ एप्रिल/ प्रतिनिधी

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त रामराव वाघ यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून ‘एमपीडीए’ कायद्यान्वये काढलेल्या एका स्थानबद्धता आदेशामुळे वाशी येथील एका व्यापाऱ्यास नऊ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहावे लागल्याचे एक प्रकरण समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आयुक्त वाघ यांनी कोणत्याही कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश काढण्यास मनाई केली आहे.

भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला!
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी

गजाननराव वाटवे यांच्या निधनाने मराठी भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला असल्याची भावना संगीतप्रेमी आणि भावसंगीत विश्वात व्यक्त करण्यात येत आहे. वाटवे यांनी मराठी भावगीतांचा पाया घातला आणि ठिकठिकाणी भावगीत गायनाचे कार्यक्रम करून ती रसिकांपर्यंत पोहोचवली. मराठी भावसंगीत लोकप्रिय करण्यात वाटवे यांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रियाही या मान्यवरांनी व्यक्त केली.

पालिका शाळेतील विद्यार्थी खिचडीविना
पालिकेचे शिक्षणाधिकारी निलिंबत होणार
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आपल्याच संस्थांना खिचडी वाटपाचे काम मिळावे असा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा दबाव आणि त्याला पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मिळालेले समर्थन यामुळे गेले तीन महिने पालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना खिचडी मिळालेली नाही. मात्र आता याचे सर्व खापर पालिकेचे शिक्षण अधिकारी आबासाहेब जाधव यांच्यावर फोडण्यात आले आहे. आता त्यांना १० एप्रिलपर्यंत निलंबित करणार असल्याचे आज पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी पालिका सभागृहात घोषित केले. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.

सेन्सेक्सची पुन्हा भरारी!
मुंबई, २ एप्रिल/ व्यापार प्रतिनिधी

शेअर बाजारावर तेजीवाले पुन्हा नियंत्रण मिळवीत असल्याची चुणूक दाखविणारी ४४७ अंशांची मोठी भरारी आज ‘सेन्सेक्स’ने घेतली आणि अलीकडेच हिरावली गेलेली १० हजार अंशांची पातळी पुन्हा दमदारपणे गाठली. जगभरातील सर्व शेअर बाजारात तेजीचा उत्साह असून, जपानच्या हँगसेंगनंतर, दुसरी सर्वाधिक वाढ भारतात ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या निर्देशांकांनी आज नोंदविली आहे. बाजार बंद झाला तेव्हा ‘सेन्सेक्स’ १०,३४८.८३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ कालच्या तुलनेत १५० अंशांची (४.९२ टक्क्यांची) कमाई करून ३,२११.०५ या पातळीवर स्थिरावला होता. बाजाराने आज मारलेल्या मुसंडीत तांत्रिक विश्लेषकांनी बाऊ केलेले प्रमुख अडथळे हे झटक्यासरशी पार केले असून, येत्या काही दिवसांत बाजार २००९ सालातील नवनव्या उच्चांकांपर्यंत मजल मारेल असे कयास व्यक्त केले जाऊ लागले आहेत.

प. रे. विस्कळीत
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी

बोरिवली स्थानकाजवळ एका लोकलचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरला अडकल्याने आज दुपारी बराच काळ पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी लोकलमधील गर्दी आणि उकाडय़ामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. डाऊन फास्ट मार्गावरील भाईंदर लोकलचा पेंटोग्राफ दुपारी सव्वाएकच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. त्यामुळे सदर लोकल जागीच अडकून पडली. अडकलेला पेंटोग्राफ दुरुस्त करून वाहतूक दुपारी दोन वाजता पूर्ववत झाली. तोपर्यंत पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झाले होते. बोरिवली-विरारदरम्यानच्या लोकल वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. सर्व लोकल सुमारे २०-२५ मिनिटे उशिराने धावत होत्या. गाडीतील गर्दी आणि उकाडय़ामुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले होते. मात्र गर्दीची वेळ सुरू होईपर्यंत ल्वेळापत्रक पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

‘सिएट’ कंपनी मुंबईबाहेर जाऊ देणार नाही’
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी

भांडुप येथील ‘सिएट’ ही कंपनी गुजराथमध्ये नेण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा डाव असला तरी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ही कंपनी आम्ही मुंबईबाहेर जाऊ देणार नाही तसेच ती बंदही होऊ दिली जाणार नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाचे अध्यक्ष अर्जून यादव यांनी नुकतेच भांडुप येथे केले. कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न आणि कामगारांना विश्वासात न घेता कंपनीची सात एकर जमीन विकण्याच्या प्रकरणी कंपनीतील कामगारांनी महासंघाचे नेतृत्व स्वीकारले आहे. कामगारांची सभा नुकतीच झाली. त्यावेळी यादव बोलत होते. अनेक वर्षे काम करूनही कामगारांना पगारवाढ नाही, कामगारांना ले ऑफ देणे असे प्रकार कंपनीत सुरू असून कामगारांच्या अनेक सोयी-सुविधांमध्येही कपात करण्यात आली आहे. आता कंपनी गुजराथमध्ये हलविण्यात येत आहे. त्यामुळे याला कायदेशीरमार्गाने विरोध करून कामगारांना त्याचे हक्क मिळवून दिले जातील, असेही यादव यांनी सांगितले.

केळकर, कुवळेकर ‘सह्याद्री’च्या वृत्तविभागात
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज केलेल्या बदल्यांनुसार मुंबई दूरदर्शन ‘सह्याद्री’च्या वृत्तविभागात आता नितीन केळकर आणि सरस्वती कुवळेकर काम पाहणार आहेत. वृत्तविभागात संपादक असलेल्या ज्योती आंबेकर यांची बदली ‘योजना’ मासिकाच्या संपादिका म्हणून करण्यात आली असून त्यांच्या जागी केळकर काम पाहणार आहेत. तर वृत्तविभागातील नितीन सप्रे यांची बदली फिल्म्स डिव्हीजनमध्ये करण्यात आली असून त्यांच्या जागी फिल्म्स डिव्हीजनमधील सरस्वती कुवळेकर या काम पाहणार आहेत.

ठाण्यात कचऱ्याने घेतला मायलेकाचा बळी
ठाणे, २ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील कचऱ्याच्या दरुगधीने ठाणेकर हैराण झाले असताना घोडबंदर रोडवर सांडलेल्या कचऱ्यामुळे मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात आई व मुलगा डंपरखाली चिरडून ठार झाले. ही घटना दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी नाक्याजवळ घडली. मीरा रोडमधील विजय विठ्ठल सुर्वे (२५), त्याची आई विजयश्री (४५) हे अपघातात ठार झाले. मलेरियाने आजारी असलेल्या ठाण्यातील नातीची चौकशी करून मुलाच्या मोटारसायकलवरून मीरा रोडला घरी परतताना ही दुर्घटना घडली. ठाण्यातील साठलेला कचरा हा भाईंदर पाडय़ातील तात्पुरत्या डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यासाठी डंपरने नेतअसताना काही कचरा कापूरबावडीनजीक पडला होता. मोटारसायकलवरून विजय या नाक्याजवळून जात असताना त्याच्या गाडीला डंपरचा धक्का लागला आणि तोल गेलेली गाडी कचऱ्यावरून घसरून त्याच डंपरच्या चाकाखाली चिरडली गेली. अपघात इतका भयावह होता की विजयश्री या जागीच तर मुलगा उपचार करताना रुग्णालयात मरण पावला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठाण्यात कचऱ्याने घेतला मायलेकाचा बळी
ठाणे, २ एप्रिल/प्रतिनिधी

शहरातील कचऱ्याच्या दरुगधीने ठाणेकर हैराण झाले असताना घोडबंदर रोडवर सांडलेल्या कचऱ्यामुळे मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात आई व मुलगा डंपरखाली चिरडून ठार झाले. ही घटना दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी नाक्याजवळ घडली. मीरा रोडमधील विजय विठ्ठल सुर्वे (२५), त्याची आई विजयश्री (४५) हे अपघातात ठार झाले. मलेरियाने आजारी असलेल्या ठाण्यातील नातीची चौकशी करून मुलाच्या मोटारसायकलवरून मीरा रोडला घरी परतताना ही दुर्घटना घडली. ठाण्यातील साठलेला कचरा हा भाईंदर पाडय़ातील तात्पुरत्या डंपिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यासाठी डंपरने नेतअसताना काही कचरा कापूरबावडीनजीक पडला होता. मोटारसायकलवरून विजय या नाक्याजवळून जात असताना त्याच्या गाडीला डंपरचा धक्का लागला आणि तोल गेलेली गाडी कचऱ्यावरून घसरून त्याच डंपरच्या चाकाखाली चिरडली गेली. अपघात इतका भयावह होता की विजयश्री या जागीच तर मुलगा उपचार करताना रुग्णालयात मरण पावला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आक्षेपार्ह वर्तनाबद्दल अक्षयकुमारविरुद्ध तक्रार
मुंबई, २ एप्रिल / पी.टी.आय.

‘लॅक्मे फॅशन शो’दरम्यान रॅम्पवर चालताना आक्षेपार्ह वर्तन केल्याबद्दल अक्षयकुमारविरुद्ध अनिल नायर नावाच्या इसमाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीमध्ये अक्षयकुमार दोषी आढळला तर आयोजक आणि अक्षयकुमार या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.