Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

मुंबईत राजेशाही ‘कार’नामा
प्रतिनिधी

फेरारी.. रोल्स रॉइस.. पोर्श.. आदी गाडय़ांची नावेच केवळ कानावर पडलेली असतात. क्वचितप्रसंगी टीव्हीवर किंवा मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात फिरताना एखादी राजेशाही गाडी नजरेस पडते. पण ती नक्की कोणती हे समजण्याआधीच डोळ्यासमोरून झर्रकन निघून गेलेली असते. मुंबईत ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘पार्क्स सुपर कार शो’च्या निमित्ताने मात्र या राजेशाही थाट असलेल्या या गाडय़ांचे दर्शन घेता येईल.

सुनील डिंगणकर
लोकप्रिय गाण्यांच्या चाली चलनी नाण्यासारख्या वापरून त्यातून आपल्याला हवे ते साधून घेण्याच्या वृत्तीत राजकारणीही मागे नाहीत. विशेषत दक्षिणेत रूढ असलेला हा सिनेमॅटिक स्टाईलचा प्रचार आता मराठी मुलखातही अनुभवता येणार आहे. कारण येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये कोंबडी पळाली, डिपाडी डिपांग, फू बाई फू या लोकप्रिय मराठी गाण्यांच्या चालींवर बांधलेला राजकीय पक्षांचा पद्यप्रचार ऐकविला जाणार आहे.

‘आमची खोली’ने दिला नवा आशेचा किरण..
प्रतिनिधी

चौदा वर्षांपूर्वी सोलापूरहून मुंबईत आलो.. तेव्हा वेडय़ासारखा रेल्वे स्थानकात भटकत होतो.. त्यावेळी स्नेह सदनमधील ‘आमची खोली’मध्ये आसरा मिळाला.. दोन वेळच्या जेवणाची सोय झाली.. शिक्षण मिळाले.. हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला.. आज ‘एफवायबीए’मध्ये शिकत आहे.. त्याचबरोबर हॉटेल ताज लॅण्डस् इण्डमध्ये काम करतोय.. मात्र चौदा वर्षांपूर्वीचे ते दिवस आणि ‘आमची खोली’तून नव्या आयुष्याला झालेली सुरुवात कधीही विसरता येणार नाही..

‘सॅटिस’च्या ऐवजी आता स्कायवॉक!
कैलास कोरडे
रेल्वे स्थानक परिसरातील रहदारी, वाहतुकीची कोंडी, फेरीवाले, पार्किंग यांसारख्या अनेक समस्यांवर प्रभावी तोडगा ठरु शकणारी ‘स्टेशन एरिया ट्रॅफिक इम्प्रुव्हमेंट स्कीम’ अर्थात सॅटिस राबविण्यास उशीर झाल्याच्या कारणास्तव जवळपास गुंडाळण्यात आली असून त्याऐवजी सर्वत्र स्कायवॉक उभारण्याचा धडाका एमएमआरडीएने लावला आहे. मात्र हे स्कायवॉक ‘सॅटिस’ची जागा कितपत घेऊ शकतील, याबाबत मात्र संबंधित साशंकता व्यक्त करीत आहेत.जागतिक बॅंकेच्या मदतीने ‘एमयूटीपी’च्या पहिल्या टप्प्यांतर्गत शहरातील दादर, बोरिवली, चेंबूर, अंधेरी, मालाड आणि घाटकोपर या सहा रेल्वे स्थानकांसाठी सॅटिस राबविण्याची योजना २००१ मध्ये आखण्यात आली होती.

वांद्रे स्कायवॉकखालील पदपथाच्या दुरुस्तीचे काम सुरू
प्रतिनिधी
वांद्रे पूर्व येथील अनंत कणेकर मार्गाच्या पदपथाची दुरुस्ती करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे. गतवर्षी वांद्रे स्टेशन ते कलानगरदरम्यान स्कायवॉकची उभारणी झाल्यापासून दयनीय अवस्थेत असलेल्या या पदपथाच्या दुरुस्तीमुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘शिवाजीराजे भोसले..’ अमेरिका स्वारीवर
प्रतिनिधी

मराठीत निर्मिती केल्या जाणाऱ्या चित्रपटांची संख्या बरीच असली तरी वितरणाच्या बाबतीत मात्र अनेक वेळा मराठी चित्रपट मागे पडतात. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट मात्र ३ एप्रिल रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच १० एप्रिल रोजी तो अमेरिकेतील सानफ्रान्सिस्को आणि न्यू जर्सी येथे व्यावसायिकरित्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. एखादा मराठी चित्रपट एकाच दिवशी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठीतील या बिग बजेट चित्रपटाचे प्रमोशनही धडाक्यात सुरू झाले आहे.

सह्य़ाद्रीबुक्स आता ऑनलाइन
अरे, बऱ्याच दिवसांपासून ‘सह्य़ाद्री’ पुस्तक शोधतोय, कोणत्याच दुकानात मिळालं नाही रे. हे आणि असेच अन्य काही पुस्तकांबद्दलचे संवाद ट्रेकर्स मंडळींमध्ये बऱ्याचदा ऐकायला येतात. खरंतर डोंगरभटकंती, जंगलभटकंती हे तसे मुलखावेगळेच छंद. या विषयांवर आजवर डोंगराएवढे साहित्य असले तरी ते एकाच छताखाली उपलब्ध नाही. पुस्तकांच्या दुकानातही ठराविक प्रसिद्ध पुस्तकेच आढळतात. त्यामुळेच काही विशिष्ट पुस्तकांसाठी एखाद्याला चक्क बऱ्याच दुकानांचाच ट्रेक करावा लागतो.

पारंपरिक पोषाखात भेटणार ‘जोडी जमली रे’चे स्पर्धक
प्रतिनिधी
‘जोडी जमली रे’ हा रिअ‍ॅलिटी शो अधिक रंगतदार आणि उत्कंठावर्धक व्हावा यासाठी त्यातील स्पर्धक, सूत्रसंचालक सगळेजण प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन आणि धमाल गोष्टी करतात. शुक्रवारच्या भागात सागर-अर्चना, अनुप-गायत्री आणि मनीष-अनघा असे सहाही स्पर्धक पारंपरिक पोषाख परिधान करून प्रेक्षकांसमोर येतील. स्टार प्रवाह वाहिनीवरील या रिअ‍ॅलिटी शोमध्ये लग्नसंस्था, त्याच्याशी निगडित असलेल्या परंपरा, संस्कृती, प्रथा, रूढी इत्यादीचा विचारविनिमय केला जातो.

कौटुंबिक व्यवस्थेवर बेतलाय ‘तिन्हीसांजा’
प्रतिनिधी
‘धर्मा रामोशी’ या लघुपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचीही वाहवा मिळाली होती. पुंडलिक धुमाळ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. लघुपटाने सुरुवात केलेल्या या दिग्दर्शकाने आता कुटुंबव्यवस्था या विषयाला हात घातला आहे. जीवनातील धावपळ वाढल्यामुळे कौटुंबिक नात्यांवर झालेल्या परिणामांचा परामर्श ‘तिन्हीसांजा’ या चित्रपटात घेण्यात आला आहे. वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे की, नव्या पिढीची हा प्रश्न या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. संदीप कुलकर्णी, रमेश देव, आशालता वाबगावकर, अरूण नलावडे, विठ्ठल उमप, आत्माराम भेंडे, यतीन कार्येकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुधाकर डाळींबकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची पटकथा-संवाद पुंडलिक धुमाळ व शंतनू गणेश रोडे यांचे असून दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांचे आहे.

पुस्तक विक्रीच्या ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणाला बसलेली खीळ दुर्लक्षित करण्यासारखी नाही; पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांची अपेक्षा
प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग मराठीतील पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना फारसा रुचलेला नाही. या छोटय़ा गावातील साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी संमेलनाच्या निमित्ताने इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच एका ठिकाणी विविध विषयांवरील हजारो पुस्तके हाताळायला व पाहायला मिळाली, ही बाब वाचक म्हणून स्वागतार्ह असल्याचे मत प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक खरेदीची जी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली होती, त्याला महाबळेश्वर साहित्य संमेलनात खीळ बसली या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मतही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

एम. डी. शाह महिला महाविद्यालयाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा
प्रतिनिधी
जनसेवा समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या माटुंगा येथील एम. डी. शाह महिला महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन संस्थेकडून (नॅक) ‘अ’ दर्जा देण्यात आला आहे. ‘नॅक’ ही विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त संस्था आहे. देशातील शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी ही संस्था विविध महाविद्यालये आणि विद्यापीठे यांचे मूल्यांकन करते.

‘मराठी बोलता येणाऱ्या उमेदवारालाच निवडणुकीत मतदान करा’
‘आम्ही मराठी’ संस्थेचे मराठी नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराला मत देताना राजकीय बांधिलकी न बघता, आपल्या मातीशी बांधिलकी हा निकष ठरवावा, आणि त्यातही त्या उमेदवाराला मराठी बोलता येणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन ‘अवघा मराठी तितुका मेळवावा’ असे घोषवाक्य असणाऱ्या ‘आम्ही मराठी’ या संघटनेने समस्त मराठी नागरिक आणि मराठी बोलता येणाऱ्या जनतेला केले आहे. ‘अवघा मराठी तितुका मेळवावा’ असे घोषवाक्य असले तरी ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ ही आपली कृती असल्याचा इशाराही संघटनेचे कार्याध्यक्ष एकनाथ ताबवेकर व प्रवर्तक संजय भिडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

राज्यसेवा स्पर्धा पूर्व परीक्षा
प्रतिनिधी
दादर येथील संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रबोधिनीच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व स्पर्धा परीक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. त्यात आठवडय़ातून प्रत्येक घटकावर मोफत टेस्ट सिरीजही घेण्यात येणार आहे. सोशल सव्‍‌र्हिस लीग हायस्कुल, कक्ष क्र. २५, दामोदर हॉलजवळ, परळ येथे हे वर्ग घेतले जाणार आहेत.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवार ६ ते रविवार २६ एप्रिल दरम्यान एमपीएससी आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षेबाबत मोफत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवार ४ एप्रिलपर्यंत आपली नावे मंडळाच्या कार्यालयात नोंदवावीत असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे. संपर्क-श्री गणेशनगर, डॉ. आंबेडकर मार्ग, लालबाग.

गजानन कीर्तिकरांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन
प्रतिनिधी

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाचे सेना-भाजप युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर व विद्यमान आमदार गजानन कीर्तिकर यांनी हायटेक प्रचारासाठी इंटरनेटचा वापर करण्याचे ठरविले असून त्यांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन अलिकडेच करण्यात आले. विशेषत मतदार संघातील युवापिढीशी संवाद साधता यावा यासाठी www.gajanankirtikar.com या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन शिवसेना नेते आ. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमास आमदार अनिल परब, शिवसेना विभागप्रमुख विनोद घोसाळकर, महापालिका सभागृहनेते सुनील प्रभू आणि उपविभागप्रमुख विलास पोतनीस उपस्थित होते.