Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

‘पक्षाने लादलेल्या उमेदवारांकडून प्रश्नांकडे दुर्लक्ष’
मोठे शक्तिप्रदर्शन करीत राजळेंची बंडखोरी
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी
पक्षाने लादलेले उमेदवार मतदारसंघाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. राजळे जिल्ह्य़ास बाधक म्हणणाऱ्यांना ‘विष’ चालते, परंतु जिल्हा चालवणाऱ्यांचे रक्त आणि वारसा चालत नाही. त्यामुळे मुंबईत बसून इशारे करणाऱ्यांविरुद्ध आता बंड करायचेच, असे सांगत काँग्रेसचे पाथर्डीतील आमदार राजीव राजळे यांनी नगर मतदारसंघात बंडखोरीचे निशाण फडकावत आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘महावितरण’च्या अधीक्षक अभियंत्यांना शाई फासली
शिवसेनेचा राडा
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी
वसुली चांगली झाली असताना शहरात अतिरिक्त कपात करून विस्कळीत वीजपुरवठा केला जात असल्याचा आरोप करीत ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता दिलीप पडळकर यांना शिवसेनेचे आमदार अनिल राठोड व कार्यकर्त्यांनी आज धक्काबुक्की व शिवीगाळ केली. पडळकर यांना शाई फासण्यात आली. या आंदोलनामुळे वीज कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विभागात उद्दिष्टापेक्षा ११६ टक्के वसुली झाल्यामुळे पडळकर यांनी आज सर्व वीज अधिकारी, अभियंत्यांची बैठक बोलविली होती.

रामगिरीमहाराज उत्तराधिकारी
माळवाडगाव, २ एप्रिल/वार्ताहर

श्रीक्षेत्र सराला बेटचे महंत नारायणगिरीमहाराज यांचे उत्तराधिकारी म्हणून रामगिरीमहाराजांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. तेरा आखाडय़ांचे महामंत्री हरीगिरीमहाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रमुख साधूंच्या व विश्वस्तांच्या उपस्थितीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. नारायणगिरीमहाराज यांचा उद्या (शुक्रवार) षोडशी भंडारा कार्यक्रम असून, उद्याची पूजा उत्तराधिकारी रामगिरीमहाराजांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आज आखाडय़ामधील साधूंच्या उपस्थितीत उत्तराधिकाऱ्याची निवड निश्चित करण्यात आली.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकावली
शाळादुरुस्तीची माहिती न मिळाल्याने अंबाडे संतापल्या
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळादुरुस्तीचा विषय शिक्षण समितीत अद्यापि धुमसत आहे. सेस व सादिल निधीतून घेतलेल्या शाळादुरुस्तीच्या कामाची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आक्षेप घेत संतप्त झालेल्या ज्येष्ठ सदस्य विजया अंबाडे यांनी भर सभेत शिक्षणाधिकारी खांदवे यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकावली. यापूर्वी समाजकल्याण समितीच्या सभेत अधिकाऱ्यांच्या अंगावर सदस्यांनी फाईल फेकण्याचा प्रकार झाला होता. आज शिक्षण समितीच्या सभेत त्याची पुनरावृत्ती झाली.

वकिलाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक
पुतण्याने ५ लाखाची सुपारी दिल्याचे निष्पन्न
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी
तारकपूरमधील प्रकाशपूर सोसायटीत राहणारे वृद्ध वकील पीटर साळवे यांच्या खूनप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. साळवी यांचा पुतण्या व त्याच्या पत्नीने सुपारी देऊन हा खून करविला. खुनासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरोपींना दि. ८पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज दिला.

लोकशाही
२६ नोव्हेंबर २००८. ‘राष्ट्रीय अशुभदिन’ म्हटल्यास गैर ठरणार नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार जागतिक पातळीवर असताना एका धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या लोकांवर आक्रमण करून संपूर्ण देश हादरवून टाकला. कित्येक निष्पाप जीवांचा बळी गेला. संपूर्ण देशभर प्रचंड दहशत निर्माण झाली. या घटनेनंतर या घटनेचा सर्वधर्मसमभाव, बंधुता, समता, मानवता या दृष्टिकोनातून लोकशाही मार्गाने देशाचा कारभार चालविण्यासाठी निवडणुकीत उतरलेल्या राजकीय पक्षांनी, नेत्यांनी, राजकारण्यांनी याचा विचार केलेला दिसून येत नाही.

उमेदवारी जाहीर होताच आठवले मंत्री विखेंना भेटले
उद्या अर्ज दाखल करणार
राहाता, २ एप्रिल/वार्ताहर
शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस आघाडीची उमेदवारी जाहीर होताच आज दुपारी खासदार रामदास आठवले यांनी लोणी येथे जाऊन शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या शनिवारी (दि. ४) दुपारी १ वाजता आठवले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राजळे यांच्याकडे ६७ लाखांची मालमत्ता
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

पाथर्डीचे आमदार राजीव राजळे यांनी अखेर आज अपक्ष म्हणून नगर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. पत्नी व मुलांसह त्यांच्याकडे एकूण ६७ लाख ५६ हजार २१७ रुपयांची मालमत्ता आहे. एप्रिल १९९३मध्ये पुण्यातून वास्तूविशारद पदवी घेतलेल्या राजळे यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. सन २००१मध्ये बेकायदा जमाव जमवून विनापरवानगी प्रचारसभा घेणे, दगडफेक करणे याबाबतचा एकच गुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल आहे.

नेत्यांची पसंती कर्डिलेंना, कार्यकर्त्यांची राजळेंना
श्रीगोंदे, २ एप्रिल/वार्ताहर

काँग्रेसचे माजी आमदार शिवाजीराव नागवडे व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी नगर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांना मानणाऱ्या सुमारे एक हजार प्रमुख कार्यकर्त्यांनी पाथर्डीचे आमदार राजीव राजळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरला हजेरी लावली. त्यामुळे हे नेते चांगलेच हबकले आहेत.

जागतिक महासत्तेचा ध्यास
‘व्हीजन - २०२०’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी देशवासीयांना दाखविलेले भारत जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी यंदाच्या लोकसभेत निवडून जाणारे खासदार अत्यंत महत्त्वपूर्ण घटक ठरणार आहेत. देशापुढे आज रोजगार, आरोग्य, पाणी, पर्यावरण, जातीयवाद, प्रांतवाद, दहशतवाद, शिक्षण, संरक्षण आदी अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय समस्यांचा अभ्यास करून धोरणात्मक काम करणारी व्यक्ती खासदार व्हावी, असे मला वाटते.

कार्यकर्त्यांनीच निवडणूक हाती घ्यावी - गांधी
शेवगाव, २ एप्रिल/वार्ताहर

उमेदवारी जाहीर होताच सर्वत्र जल्लोष झाला. यातच माझा मोठेपणा आहे. आता प्रचाराला अवधी कमी असल्याने कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घ्यावी, असे आवाहन भाजपचे उमेदवार दिलीप गांधी यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची शनिवारी (दि. ४) जाहीर सभा होत आहे. सभेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत गांधी बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव शर्मा होते. सर्वश्री. श्रीकांत साठे, सुनील रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, भय्या गंधे उपस्थित होते.

अण्णांचा आशीर्वाद
विजयी भव! युद्धाची धुमश्चक्री सुरू व्हायच्या अगोदर ऐन रणांगणात भीष्म, द्रोण यांच्याकडून असा आशीर्वाद मिळाल्यावर धर्मराज आनंदून गेला. निवडणुकीच्या रणधुमाळीत अण्णा हजारेंकडून असाच आशीर्वाद मिळवलेल्या शिवाजी कर्डिले यांचा आनंद धर्मराजापेक्षा कमी नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप गांधी यांनी त्यांच्या अगोदर अण्णांचे पाय पकडून अडचण निर्माण केली.खासदार बाळासाहेब विखे यांनी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात अण्णांचे अभिनंदन करून त्यावर कळस चढवला. शिवाय आम्ही सुपाऱ्या घेत नाही, देत नाही, जमिनी बळकावत नाहीत, म्हणून चार ‘शब्द फुले’ही उधळली! शिवाजीराव त्यामुळे बेचैन झाले होते.

विखेसमर्थक लवांडे, राजळेंच्या पाठिशी!
पाथर्डी, २ एप्रिल/वार्ताहर

खासदार बाळासाहेब विखे यांचे कट्टर समर्थक व माजी सभापती काशिनाथ लवांडे यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार आमदार राजीव राजळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्य़ात थोरात-विखे संघर्षांत थोरातांचे भाचे असलेल्या राजळेंनी विखेंना आतापर्यंत कायम विरोधच केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तर राजळेंनी विखेंविरोधात टोकाची भूमिका घेतली होती. गेल्या विधानसभेला राजळेंच्या विरोधात लवांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवून विरोध केला होता. याशिवाय जि. प. व पं. स. निवडणुकांमध्येही विखेंनी तालुक्यात प्रवरेची फौज पाठवून राजळेंना विरोध केला होता. लवांडे यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले असले, तरीही कट्टर विखेसमर्थक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. कालपर्यंत लवांडे यांनी राजळेंच्या विरोधातच भूमिका घेतली होती. मात्र, आज नगर येथे राजळेंच्या सभेला लवांडे उपस्थित राहिले. त्यांनी भाषणही ठोकले. लवांडे भाषणास उभा राहताच अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. त्यांनी राजळे हे अभ्यासू आमदार असून, सभागृहात अर्थसंकल्पावर त्यांनी केलेल्या भाषणाचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले होते, याची आठवण करून देत लोकसभेत दूधवाला नव्हे, तर राजळेंसारखा शिक्षित उमेदवार पाठवा, असे आवाहनही केले.

आर. आर. पाटील यांची आज राहुरीला सभा
राहुरी, २ एप्रिल/वार्ताहर
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी उद्या (शुक्रवारी) माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची सभा आयोजित केल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी दिली. सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ही सभा होणार आहे. या सभेत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली असून, सभेच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष के. एम. पानसरे, अशोक तनपुरे, शब्बीर देशमुख, विनायक कचरे, सभापती अरुण तनपुरे यांच्यासह जनसेवा मंडळाने तयारी केली आहे.दरम्यान, श्री. कर्डिले यांच्यासाठी राहुरीत नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांचा प्रचार अजूनही सुनासुनाच आहे. कार्यालय स्थापन झाले. परंतु मेळावे, सभा, भेटीगाठी अद्याप झालेल्या नाहीत. माजी आमदार प्रसाद तनपुरे व डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ वेगवेगळे मेळावे घेऊन कर्डिले यांचा प्रचार करीत आहेत. या दोन्हीही मेळाव्यांस कर्डिले उपस्थित होते.

नगर, शिर्डीत निवडणूक न लढवण्याचा मनसेचा निर्णय
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

नगर जिल्ह्य़ातील लोकसभेच्या दोन्ही जागा न लढविण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हा संघटक (दक्षिण) सचिन डफळ, अरुण पाटील (उत्तर) यांनी दिली. राज्यात कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अधिक वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष आनंदा शेळके, सचिव पोटरे, देवीदास खेडकर, पत्रकार रामदास ढमाले, नगरसेवक गणेश भोसले, किशोर डागवाले, सतीश मैड, कैलास गिरवले, वकील अनिता दिघे, शिवाजी बडे आदी उपस्थित होते. दरम्यान, निवडणुकीबाबत कुठल्या उमेदवारास पाठिंबा द्यायचा किंवा तटस्थ राहायचे का याबाबत भूमिका ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा १५ एप्रिलला नगर येथे आयोजित करण्यात आल्याचे डफळ यांनी सांगितले.

शरद पवारांची उद्या अकोल्यात सभा
राजूर, २ एप्रिल/वार्ताहर

शिर्डी मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. ४) सकाळी ९.३० वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सभा होत आहे. आमदार मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली अकोले येथील बाजारतळावर ही सभा होईल. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी आज राजूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. पिचड यांच्यापासून दुरावलेले रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय वाकचौरे व तालुकाध्यक्ष चंद्रकांत सरोदे यांनी दिलगिरी व्यक्त करून आता लोकसभाच नव्हे, तर विधानसभेतही पिचड व राष्ट्रवादीला साथ देण्याचे मान्य केले. त्यांच्या भूमिकेचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

अडवाणींची उद्या शेवगावात सभा
नियोजनासाठी तावडे, कुलकर्णी आज नगरमध्ये
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या शनिवारी (दि. ४) शेवगाव येथे होणाऱ्या प्रचारसभेच्या नियोजनासाठी प्रदेश चिटणीस विनोद तावडे व रघुनाथ कुलकर्णी उद्या (शुक्रवारी) नगरला येत आहेत.पक्षाचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचारार्थ अडवाणी यांची ही सभा होत आहे. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल सबलोक यांनी ही माहिती दिली. मतदारसंघातील प्रचार नियोजनासाठी म्हणून पक्षाच्या वतीने विधानसभा मतदारसंघनिहाय व त्यावर पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी १ अशा समित्या स्थापन केल्या असून, त्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.तावडे व कुलकर्णी या समित्यांची बैठक घेणार असून, त्यात अडवाणी यांच्या प्रचारसभेचे नियोजन करण्यात येईल. शेवगाव येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. या मतदारसंघातील प्रचारासाठी पक्षाने जिल्ह्य़ाबाहेरील काही पदाधिकारीही नगरमध्ये आणले असून, त्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. त्यांचीही बैठक तावडे व कुलकर्णी घेणार आहेत.दरम्यान, गांधी शनिवारीच (दि. ४) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यासाठी बसस्थानकाजवळील शिवपुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

‘करिअर इन इन्फॉरमेशन’तर्फे संगणक जागृती अभियान
कर्जत, २ एप्रिल/वार्ताहर
उन्हाळ्याच्या सुट्टीत संगणकाचे विविध अभ्यासक्रम सुरू होतात. परंतु त्याबद्दलची संपूर्ण माहिती व सरकारची मान्यता असलेल्या अभ्यासक्रमाचीही विद्यार्थ्यांना माहिती दिली जात नाही, असे प्रतिपादन करिअर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव समशेर शेख यांनी केले.पुणे येथील करिअर इन इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संगणक अभ्यासक्रम जागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी शेख बोलत होते.ज्या पदवीधारकांना संगणकाची माहिती नाही. त्यांनाही आज अशिक्षित समजले जाते, असे सांगून शेख म्हणाले की, डीओईएसीसी, सीसीसी, तसेच राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी एमएस-सीआयटी या अभ्यासक्रमांना सरकारने मान्यता दिली असून, सरकारी नोकरीसाठी यापैकी एक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इंटरनेट, मराठी व इंग्रजी टायपिंग, प्रिंटर याची माहिती दिली जाते का, हे पाहूनच संगणकाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घ्या, असे शेख यांनी सांगितले.

तात्यासाहेब दिंडोरे यांचे निधन
खर्डा, २ एप्रिल/वार्ताहर
येथील सराफ तात्यासाहेब ऊर्फ लक्ष्मण दिंडोरे यांचे काल (बुधवार) सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे २ मुले, १ मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश दिंडोरे यांचे ते वडील होत.आज सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. अंत्यसंस्कारास माजी सभापती सय्यद मन्सूर उस्मान, माजी जि. प. सदस्य कैलास शेवाळे, जि. प. सदस्य दत्ता वारे, भाजप तालुकाध्यक्ष राम शिंदे, विजयसिंह गोलेकर आदी उपस्थित होते.

कोपरगावला हेल्पलाईन सुरू
कोपरगाव, २ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील मतदारांसाठी तहसील कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मतदारांनी २२३९०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एन. बी. वाकचौरे यांनी केले आहे. आचारसंहिता कक्षही तहसील कार्यालयात सुरू केला आहे. यासाठी तहसीलदार एस. एस. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एस. बी. पाटोळे, अनिल मोझड, श्रीमती ए. व्ही. काथेपुरे यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हेल्पलाईन सुविधा दि. २० ते २३ एप्रिलदरम्यान चोवीस तास खुली राहील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १००० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना आवश्यक माहिती मिळेल.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
श्रीगोंदे, २ एप्रिल/वार्ताहर

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून बलात्कार केल्याप्रकरणी तालुक्यातील शेंडेवाडी येथील संदीप बाळासाहेब कुरूमकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिकत असलेली ही फिर्यादी मुलगी २८ मार्च रोजी इंग्रजी विषयाची तोंडी परीक्षा देण्यासाठी आली असता आरोपी संदीप याने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून जबरदस्तीने उचलून नेले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवित कोरेगाव, नाशिक या ठिकाणी अत्याचार केले, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी तिला व संदीपला लग्न लावतो म्हणून बोलावून घेतले. आज हे दोघे लग्नाच्या तयारीत आले असताना त्या मुलीने पोलिसांत फिर्याद दिली.

‘सुदेश’मुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची तक्रार
कोपरगाव, २ एप्रिल/वार्ताहर

सुदेश टॉकीजच्या जनरेटरमुळे ध्वनी व वायूचे प्रदूषण होत असल्याची तक्रार परिसरातील रहिवासी जयंत गुजराथी यांनी प्रदूषणविरोधी कृती समितीकडे केली आहे. तसेच पतितपावन संघटनेने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. टॉकीजमागच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी या संदर्भात यापूर्वीही तक्रारी दिलेल्या आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुख्याधिकारी गुजर यांना चौकशीचे आदेश दिले होते. पालिकेने टॉकीजच्या व्यवस्थापनाला ध्वनिप्रदूषण होत असल्याचे कळविले. तशी नोटीसही नंतर बजाविण्यात आली. मात्र, टॉकीजच्या व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही.

‘नॅनो’ नगरमध्ये!
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

जगभरात कौतुकाचा विषय ठरलेली टाटाची ‘नॅनो’ आता नगरमध्येही उपलब्ध झाली आहे. हुंडेकरी मोटर्समध्ये आज करीमभाई हुंडेकरी यांच्या हस्ते फीत कापून नॅनो प्रदर्शित करण्यात आली. पहिल्या तासाभरातच शंभरजणांनी बुकिंगचे अर्ज नेले. मध्यमवर्गीयांच्या चारचाकी गाडीचे स्वप्न साकार करू शकणारी नॅनो नगरमध्ये केव्हा पाहायला मिळणार याबद्दल नागरिकांत उत्कंठा होती. आज अनेकांनी नॅनो बघायला गर्दी केली होती. डिझेल व पेट्रोल दोन्हीत नॅनो उपलब्ध आहे. १८० मिमीचा उच्च ग्राऊंड क्लिअरन्स, पॉवर विंडोज, सेंट्रल लॉकिंग, फॉग लॅम्पस, ४ स्पीड गिअर बॉक्स आदी सुविधांयुक्त असलेली नॅनोची नोंदणी करताना ३०० रुपयांचा अर्ज घेऊन ९५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. जुलै महिन्यात ग्राहकांना नॅनो मिळणार आहे, अशी माहिती वसीम हुंडेकरी यांनी दिली.

कर्डिलेंच्या प्रचारासाठी माळीवाडय़ात फेरी
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

महापौर संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ माळीवाडा परिसरात फेरी काढण्यात आली.माजी नगरसेवक अविनाश घुले, तसेच अजय चितळे, शहराध्यक्ष संजय झिंजे, ज्ञानेश्वर रासकर यांच्या उपस्थितीत विशाल गणपतीची पूजा करून प्रचारफेरीस सुरुवात झाली. कर्डिले यांना मतदान करण्याचे आवाहन करून घडय़ाळाच्या चिन्हासमोर बटण दाबण्याच्या घोषणा देण्यात येत होत्या.

गांधी यांच्या प्रचारासाठी शिवसेनेची आज बैठक
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युतीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिलीप गांधी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी शिवसेनेची बैठक उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी ७ वाजता केशर गुलाब मंगल कार्यालयात होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिवसेनेने बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत गांधी यांच्या प्रचाराचे नियोजन, तालुकानिहाय आढावा यावर चर्चा होईल. बैठकीत शिवसेनेचे आमदार अनिल राठोड, उमेदवार दिलीप गांधी, जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, माजी महापौर भगवान फुलसौंदर मार्गदर्शन करणार आहेत.या बैठकीस शिवसेनेचे पदाधिकारी, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, छावणी परिषद सदस्य, भिंगार शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले आहे.

१६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी ११, १२ला निवड चाचणी
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेसाठी निवड चाचणी ११ एप्रिलला दुपारी ३ वाजता व १२ एप्रिलला सकाळी ७ वाजता संत निरंकारी भवनसमोरील मैदानावर (प्रोफेसर कॉलनी, सावेडी) होणार असल्याची माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरुण जगताप यांनी दिली.जिल्हा संघ निवडीसाठी खेळाडूंनी जन्म दाखला व दोन छायाचित्रांसह गणवेष व साहित्य घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव संजय बोरा यांनी केले.

गोदावरी देशमुख यांचे निधन
नगर, २ एप्रिल/प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील गोदावरी भगवंतराव देशमुख यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे तीन मुले व एक मुलगी, तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार नितीन देशमुख यांच्या त्या आजी होत.