Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

चुकलेले गणित
देवेंद्र गावंडे

शेतीमालाला रास्त भाव आणि कर्जमुक्ती, हे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांनी या संघटनेला उचलून धरले, हा आजवरचा इतिहास सर्वाना ठावूक आहे. संघटनेच्या स्थापनेपूर्वी बहुसंख्येने असलेला शेतकरी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कधीच संघटित झाला नव्हता. त्यामुळेच साऱ्या राजकीय पक्षांची झोप उडालेली अनेकांनी बघितली. मात्र, तीच संघटना आता राजकारणात गटांगळय़ा खात असल्याचे चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये वारंवार अनुभवायला मिळत आहे.

दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर सीबीआयचे छापे
विमानतळ संचालक, वाणिज्य व्यवस्थापक व एका कंत्राटदारावर गुन्हा

नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत ‘सीबीआय’ने त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात गुरुवारी छापा मारला. विमानतळाचे संचालक सुरेश बोरकर, वाणिज्य व्यवस्थापक महेशकुमार तसेच कंत्राटदार सुनीलकुमार माथूर ही आरोपींची नावे आहेत. विमानतळाशेजारील वसाहतीमधील या अधिकाऱ्यांचे घर आहे.

राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नागपूरचे सावरकर पुण्याला

नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत सावरकर यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण खात्यात बदली झाली आहे. लोकसभा निवडणूक निमित्ताने गृह मंत्रालयाने आज राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेची जय्यत तयारी
पोद्दारेश्वर राम मंदिर, पश्चिम व उत्तर नागपुरातून आज निघणार शोभायात्रा

नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
नागपूरचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव म्हणून देशभरात ओळखली जाणारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उद्या, शुक्रवारी शहरातील तीन मंदिरातून निघणार आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर, रामनगरातील राम मंदिर आणि उत्तर नागपुरातील मोतीबागमधील प्राचीन शिवमंदिरातून श्रीरामचंद्राचा जयघोषाने शोभायात्रेला प्रांरभ होणार आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर आधारित ७० चित्ररथ, विविध राज्यातील १२ बहारदार लोकनृत्यांसह लहानलहान चित्ररथही सहभागी होणार आहेत.

यंदा तगडे बंडखोर नाहीत
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभा निडणुकीत बंडखोरांचे पीक येईल आणि बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून ते प्रमुख राजकीय पक्षांची डोके दुखी वाढवतील, असा व्यक्त केला जाणारा अंदाज फोल ठरला आहे. भंडारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते प्रफुल पटेल यांच्या विरोधात काँग्रेचे माजी आमदार नाना पटोले यांनी केलेल्या बंडखोरीचा अपवाद सोडला तर इतर मतदारसंघात तगडे बंडखोर रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सेवादल महिला महाविद्यालयात कार्यशाळा
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
सेवादल महिला महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगद्वारा प्रायोजित ‘मायक्रोस्केल टेक्निक्स इन केमेस्ट्री’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे माजी स्नातकोत्तर रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. के.एन. मुन्शी, पुणे विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्र-पाठक डॉ. पी.डी. लोखंडे, सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केशवराव शेंडे, सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे उपस्थित होते.

कामगार नाटय़ महोत्सवात ‘काही क्षण आयुष्याचे’ प्रथम
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
५६व्या महाराष्ट्र कामगार राज्य नाटय़ महोत्सवात स्वानंद संस्कृती मंडळाने सादर केलेले व रोशन नंदवंशी लिखित, दिग्दर्शित ‘काही क्षण आयुष्याचे’ या नाटकाने अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक प्राप्त केले. पुण्यातील टिळक सभागृहात आयोजित सोहोळ्यात कामगार कल्याण आयुक्त मोहन धोत्रे, ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार, उपकल्याण आयुक्त सतीश दाभाडे उपस्थित होते. याप्रसंगी रोशन नंदवंशी यांना लेखन व दिग्दर्शनासाठी, संजय वानोडे यांना निर्मितीसाठी, वीरेंद्र लाटणकर यांना पाश्र्वसंगीताकरिता, मिथुन मित्रा यांना प्रकाश योजनेकरिता, रोहिणी मोहरील यांना अभिनयाकरिता प्रथम पारितोषिक देण्यात आले. मनिष मोहरील यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आले.

महेश्वरी देवी यांचे आज श्रीराम जन्मोत्सवावर प्रवचन
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी
जगातला प्रत्येक जीव हा नास्तिक आहे आणि तो इतका नास्तिक आहे की, कितीही प्रयत्न केले तरी तो आस्तिक होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महेश्वरी देवी यांनी केले. काटोल रोडवरील चोपडे लॉन येथे १ ते १२ एप्रिलपर्यंत प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. महेश्वरी देवी यांचे प्रवचन ऐकण्याकरता भाविकांची संख्या वाढत आहे. ३ एप्रिलला सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत श्रीराम जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व भक्तांनी जास्तीतजास्त संख्येने प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘तांदळा-एक मुखवटा’ चित्रपटावर उद्या परिचर्चा
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान व आकांक्षा मासिकातर्फे ४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता शंकरनगरातील धनवटे सभागृहात ‘तांदळा-एक मुखवटा’ या चित्रपटावर परिचर्चा आयोजित करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिचर्चेत ज्येष्ठ समीक्षक डॉ. आशा सावदेकर, समीक्षक डॉ. रवीन्द्र शोभणे, सतीश पिंपळे व पत्रकार शैलेश पांडे हे सहभागी होणार आहेत. यावेळी चित्रपटाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश द्वादशीवार तसेच निर्माती माधुरी अशिरगडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अक्षयकुमार काळे, विजय जिचकार, अरुणा सबाने व प्रा. वंदना महात्मे यांनी केले आहे.

हिंदी मोर भवनमध्ये ‘आस-पास दुरिया’
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या ‘उडान’ या उपक्रमांतर्गत, चिराग नाटय़ संस्थेच्यावतीने हिंदी मोर भवन सभागृहात ‘आस-पास दुरिया’ हे नाटक सादर करण्यात आले. नाटकादरम्यान शक्ती रतन यांनी डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या कविता सादर केल्या. संजय कुमार यांनी मोहन, संजीवनी चौधरी यांनी राधा, नरेंद्र परिहार यांनी राजन, अनिकेत वाणी यांनी बंटी, रेणुका शाहू यांनी बबली या भूमिका सादर केल्या. प्रकाश योजना किशोर बत्तासे यांची होती. गोपाल गुप्ता यांनी सहकार्य केले. संयोजक रविशंकर दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. विमलेश सूर्यवंशी यांनी आभार मानले.

डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना पारनेरकर पुरस्कार प्रदान
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना मुंबईच्या पूर्णवाद लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटतर्फे दिला जाणारा डॉ. रामचंद्र पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईच्या दादर भागातील बी.एन. वैद्य सभागृहात झालेल्या या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस.पी. कुर्डूकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. रामचंद्र पारनेरकर हे नामांकित अर्थतज्ज्ञ व तत्त्वचिंतक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावे सुरू करण्यात आलेला पहिलाच पुरस्कार अ‍ॅड. वि.रा. पारनेरकर यांच्या हस्ते डॉ. खांदेवाले यांना प्रदान करण्यात आला. पूर्णवादचे प्रणेते डॉ. आर.पी. पारनेरकर यांचे शिष्य आबासाहेब पाटील यांच्या ‘एक आहे समाज’ या पुस्तकाचे त्यांचे चिरंजीव अरुण पाटील यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतराचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच याप्रसंगी पूर्णवाद अर्थशास्त्र कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. प्रास्ताविक लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी केले.