Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
नवनीत

जी व न द र्श न
प्रभाव

 

मुहम्मद पैगंबरसाहेबांचे संगोपन एका दुर्गम वाळवंटी प्रदेशात आणि खुल्या वातावरणात झाल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्वदेखील एका संपूर्णपणे उमललेल्या सुगंधित फुलाप्रमाणे आयुष्यभर राहिले. दाई हलीमांनी त्यांना अरबी प्रथेनुसार अंगावर पाजले. ते तेथे शुद्ध अरबी भाषा बोलायला शिकले. अरब परंपरेनुसार साधारणपणे दोन वर्षे ही मुले दाईपाशी राहायची; परंतु दाई हलीमांना हे मूल इतके आवडले की, त्यांनी त्यांच्या गरीब मातोश्रींना आग्रह करून पुन्हा आपल्याकडे ठेवून घेतले. वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत मुहम्मद प्रेषित दाई हलीमांकडेच राहिले. ज्यामुळे त्यांची शरीरयष्टी इतर किशोरवयीन मुलांच्या मानाने खूप चांगली होती. पैगंबरसाहेबांना काही लिहिता-वाचता येत नसलं तरी त्यांची विद्वत्ता आणि भाषाशैली अरबस्तानातील थोर कवी आणि विचारवंतांना आश्चर्यचकित करून टाकणारी होती.
पैगंबरसाहेब उम्मी (निरक्षर) होते; परंतु अल्लाहने स्वत: वहय़ी (दिव्यबोध)मार्फत त्यांच्या शिक्षणाची सोय केली असल्याकारणाने त्यांना ईश्वरी प्रकाशाची दृष्टी प्राप्त झाली होती. कुरआनात एक भविष्य कथन करण्यात आले होते की, ‘बिद्अ सिनीन’मध्ये रोम इराणवर विजय मिळवील. मक्केतील अरबांकरिता ‘बिद्अ’चा शब्द नवीन होता. मक्केतील मुसलमान रोमच्या बाजूने होते, तर मूर्तिपूजक ईराणच्या बाजूने होते. त्यांच्यात चढाओढ सुरू झाली की, इराण कधीच पराभूत होणार नाही. काही लोकांनी पैज पण लावली की हे शक्य नाही. मुसलमान म्हणायचे की, कुरआनात म्हटले जात आहे तर हे शक्य आहे. हजरत अबूबक्रने दहा उंट शर्यतीत लावले. पैगंबरसाहेब त्यांना म्हणाले,‘‘परत जा आणि शंभर उंटांची शर्यत लावा आणि म्हणा की, हे नऊ वर्षांत घडेल, कारण मी लिहिलेल्या इलाख्यात विषम आणि विशेषत: नऊच्या अंकाकरिता ‘बिद्अ’ हा शब्द वापरला जायचा.’’ आणि नवव्या वर्षी रोमने इराणवर विजय मिळविला.
अनीस चिश्ती

कु तू ह ल
ग्रहणांचा अभ्यास
ग्रहणांच्या अभ्यासाचं खगोलशास्त्रीय महत्त्व काय आहे?

सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो, या घटनांना खगोलशास्त्रात विशेष महत्त्व आहे. चीन व खाल्डिअन संस्कृतीमध्ये ग्रहणांचं भाकीत करण्याची क्षमता पूर्वीच विकसित झाली होती. ग्रीक संस्कृतीमध्येही ग्रहणचक्राचा आधार घेऊन ग्रहणांचं भाकीत केलं जाई. ग्रहणामध्ये, विशेषत: चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या सावलीची वक्रता पाहून पृथ्वीचा आकार गोल असल्याचा अंदाज करण्यात आला होता. हा ग्रहणाचा पहिला शास्त्रीय उपयोग.
ग्रीक शास्त्रज्ञ हिप्पार्कस याने इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात दोन शहरांमधून केलेल्या नोंदींच्या साहाय्याने चंद्राचं पृथ्वीपासून अंतर शोधण्याचा पहिला शास्त्रीय प्रयत्न केला होता. नंतरच्या काळात युरोपमध्ये ग्रहणांचा तपशीलवार अभ्यास सुरू झाला. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणाऱ्या सौरज्वाला व प्रभामंडलाचा अभ्यास करण्याला महत्त्व आले. प्रभामंडल हा पृथ्वीच्या वातावरणामधील परिणाम नसून तो सूर्याचाच भाग आहे, हे इ.स. १८६०च्या ग्रहणात सिद्ध झाले. सौरज्वाला सूर्याच्या पृष्ठभागावरून निघतात, हे इ.स. १८६८च्या भारतातून दिसलेल्या ग्रहणात सिद्ध झाले. वेगवेगळय़ा ग्रहणांत दिसलेल्या प्रभामंडलांच्या वेगवेगळय़ा आकारांवरून प्रभामंडलाचा विस्तार हा सौरडागांशी संबंधित आहे, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले. १८६८ मध्ये भारतातून रत्नागिरी जिल्ह्य़ातील विजयदुर्ग किल्ल्यावरून केलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या निरीक्षणांवरून सूर्यावर एक नवीनच मूलद्रव्य शोधण्यात आले. पृथ्वीवर न सापडणारे हे मूलद्रव्य, सूर्याच्या ‘हेलिमॉस’ या ग्रीक नावारून हेलियम या नावाने ओळखले जाऊलागले. विसाव्या शतकात ग्रहणांचा सखोल अभ्यास सुरू झाला. खग्रास ग्रहण पट्टय़ाच्या उत्तर व दक्षिण सीमारेषांवरून ग्रहण स्पर्शाच्या अचूक नोंदींच्या आधारे सूर्याचा व्यास मोजण्यात आला. तसंच सूर्याच्या आकारात गेल्या दोन-तीन हजार वर्षांत काही बदल झाला आहे का, हेही तपासण्यात आले ते ग्रहणांच्या अभ्यासातूनच!
प्रदीप नायक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
पां. वा गाडगीळ

पां. वा. गाडगीळ या नावाने महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या या प्रख्यात पत्रकाराचा जन्म ३ एप्रिल १८९९ रोजी झाला. गरिबीमुळे बालपण कष्टाचे गेले. प्राथमिक शिक्षण जन्मगाव करुंडवाड, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. केसरी, लोकशक्ती, तसेच आचार्य अत्र्यांच्या नवयुगमध्येही सहसंपादक म्हणून काम केले. पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द बहरली ती ‘लोकमान्य’चे संपादक असताना. त्यांच्या अग्रलेखाची शैली लोकमान्य टिळकांसारखी होती. जालन्यात १९५८ साली काँग्रेसच्या पराभवावर त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे चक्क ‘लोकमान्य’ हे वर्तमानपत्रच बंद करावे लागले. यानंतर गावकरी, लोकमत, मराठा या वर्तमानपत्रांतून त्यांनी लिहिलेले अग्रलेख विशेष गाजले. ‘नवशक्ती’चेही ते काही काळ संपादक होते. अखंड वाचन आणि चिंतन ही वृत्ती जोपासल्याने त्यांनी विविध विषयांवर मुबलक लेखन केले. तत्त्वचिंतनात्मक असा ‘गीता तत्त्वमंजिरी’ हा ग्रंथ, ‘खग्रास प्रभाकर’ ही विचारप्रवर्तक कादंबरी, याबरोबरच ‘तिसऱ्या महायुद्धाची पाश्र्वभूमी’ हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ. याशिवाय ‘भारत-चीन संघर्षांचे स्वरूप’, ‘रशियन राज्यक्रांती’, ‘भारताचे आर्थिक नियोजन’, ‘मार्क्‍सचा भौतिकवाद’, ‘शांतिदूत नेहरू’, ‘समाजवादाची वाटचाल’, ‘स्वातंत्र्योत्तर भारत’, ‘फॅसिझम’, ‘चक्रव्यूह’, ‘पैशाची ओळख’ हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होय. भारत सरकारने त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल घेऊन १९६९ मध्ये ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरव केला. मुंबईत १८ एप्रिल १९८७ रोजी वयाच्या अठ्ठय़ाऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
राजेशचं दु:ख

शेवटच्या तास संपल्याची घंटा झाली. विद्यार्थ्यांचे लोंढे शाळेतून बाहेर पडू लागले. राजेशने आपल्या आकाशी रंगाच्या नव्याकोऱ्या सायकलचं कुलूप काढलं. दप्तर कॅरीअरला लावलं. सायकल स्टॅण्डवरून सायकल काढली आणि तो घराच्या रस्त्याला लागला. जाताना काही मुली घोळक्याने जाताना दिसत होत्या. मित्रमित्र एकमेकांच्या शेजारून सायकल चालवत होते. काहीजण दंगामस्ती करत शाळेच्या ग्राऊंडवर टाइमपास करत होते. आपल्याला फार मित्र नाहीत. अगदी दोघंतिघंच आहेत. शेखर शेजारी बसतो म्हणून मित्र. राजा शेजारी राहतो म्हणून मित्र आणि शैलेश बाबांच्या मित्राचा मुलगा म्हणून. कोणीतरी मित्र रोज आपल्याबरोबर घरी जाताना असले, आपल्या घरापाशी थांबून गप्पा मारून पुढे गेले तर किती बरे होईल? सायकलनेही त्याच्या मनातल्या विचारांबरोबर वेग घेतला. अचानक त्याची सायकल कॅरीअरला पकडून कुणीतरी थांबवली. तो चटकन ब्रेक दाबून खाली उतरला. त्याच्या वर्गातली वयाने मोठी आणि अंगाने थोराड असलेली चार-पाच मुलं त्याची सायकल अडवून उभी होती. ‘एऽऽऽ आमची दप्तरे लावायची आहेत, तुझ्या सायकलला!’ एकजण गुर्मीत म्हणाला. ‘बघतो काय नुसताऽऽ, घे अडकव तुझ्या सायकलला!’ दुसरा खेकसला. ‘हां आणि आता आमच्याबरोबर चालत चल आमच्या घरापर्यंत’, सगळ्यात धिप्पाड मुलाने हुकूम केला आणि त्याच्या डोक्यावर जोरात चापटी मारली. बिचारा राजेश. घसा कोरडा पडला होता. ही वर्गात दादागिरी करणारी मुले होती. त्यांच्यामुळे ‘८वी ब’चा वर्ग शाळेत बदनाम होता. काही बोलायची राजेशची हिंमत झाली नाही. निमूटपणे त्या दप्तरांचे ओझे वागवत तो सायकल ढकलत निघाला. वयाने मोठय़ा आणि अंगाने थोराड मुलांचे विनोद, गप्पा, खिदळणे चालूच होते. त्यांची कॉलनी आली तशी एकाने राजेशच्या पाठीत बुक्का घालत म्हटले,‘‘बघतोस काय, काढून दे ती दप्तरं!’’ आणि मुले हसत आपापल्या घरी निघून गेली. राजेशने सायकल परत फिरवली आणि घामाघूम होऊन तो घरी पोहोचला. पलंगावर गप्प बसून राहिला. झालेल्या अपमानाने त्याला रडू कोसळले. नेहमी घरी येताच ‘भूक लागली, खायला दे’ असा पुकारा करणारा राजेश गप्प पाहून ताई त्याच्याजवळ येत म्हणाली,‘‘काय झालं रे? शाळेत सर रागावले का?’’ राजेशने रडे आवरत सांगितलं,‘‘मला शाळेत जायचं नाही. मला कुणीच मित्र नाहीत. मी कुणाला आवडत नाही. सगळे मला खूप त्रास देतात.’’ ताईने त्याला शांत केले. दूध आणि शिरा दिला. तो शांत झाल्यावर त्याच्याकडून काय झालं ते ऐकून घेतलं. ती म्हणाली,‘‘अरे, तू त्या मुलांना खंबीरपणे नाही म्हणायचं, नाहीतर कुणा मोठय़ांना सांगायचं. अशी मुलं जे दुबळे असतात त्यांनाच त्रास देतात आणि काही मुलांनी त्रास दिला म्हणजे तू कुणाला आवडत नाहीस असे नाही. तुझ्यासारख्या आवडी असणारे मित्र शोध, मैत्री कर.’’ राजेशला त्याच्या आवडीचे मित्र लवकरच मिळाले आणि दादा मुलांनीही त्याच्याशी दोस्ती केली. विनाकारण आपण आपल्या अडचणींचा बाऊन करता त्यांना सामोरे जावे. आपला मानसिक ताण कमी होतो. आपण आनंदी होतो.
आजचा संकल्प - मी माझे प्रश्न खंबीरपणे सोडवेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com