Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर सीबीआयचे छापे
विमानतळ संचालक, वाणिज्य व्यवस्थापक व एका कंत्राटदारावर गुन्हा
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय

 

विमानतळाच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत ‘सीबीआय’ने त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात गुरुवारी छापा मारला.
विमानतळाचे संचालक सुरेश बोरकर, वाणिज्य व्यवस्थापक महेशकुमार तसेच कंत्राटदार सुनीलकुमार माथूर ही आरोपींची नावे आहेत. विमानतळाशेजारील वसाहतीमधील या अधिकाऱ्यांचे घर आहे. ‘सीबीआय’ची पथके सकाळीच धडकली आणि त्यांनी लगेचच झडती सुरू केली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विमानतळ परिसराचे सौंदर्यीकरण झाल्यानंतर त्या इमारतीत काही व्यावसायिकांना जागा देण्यात आली.
या जागांच्या निविदा काढताना तसेच जागा देताना गैरप्रकार झाल्याचे समजल्यानंतर दिल्लीहून आलेल्या ‘सीबीआय’ पथकाने १३ जानेवारीला अचानक तपासणी करून कागदपत्र जप्त केली होती. सुनील माथूर यांना पहिल्या मजल्यावर कँटिनसाठी ४३१ चौरस मीटर जागा मंजूर झाली. प्रत्यक्ष जमीन मोजली असता ती ९४५ चौरस मीटर जागेवर कँटिन होते. तळ मजल्यावरील स्नॅक्स बारसाठी ९ चौरस मीटर जागा मंजूर प्रत्यक्षात २३ चौरस मीटर जागेचा वापर सुरू होता. टर्मिनल इमारतीबाहेर कियोस्कवरही व्यवसाय सुरू होता. अकबर ट्रॅव्हल्सला २५ चौरस मीटर जागा मंजूर झाली होती. प्रत्यक्षात २५० चौरस मीटर जागेचा वापर सुरू होता. या प्रकारात बोरकर व महेशकुमार यांनी गैरव्यवहार केले असल्याची दाट शंका ‘सीबीआय’ला आहे. विमानतळ परिसरात कोणत्याही निविदेसाठी परवाना शुल्क द्यावे लागते.
नॉन एसी जागेसाठी प्रति चौरस मीटर ३५० रुपये तर एसीसाठी ४५० रुपये प्रति चौरस मीटर प्रतिमाह द्यावे लागतात. रिकाम्या जागेचा वापर करण्यासाठी १५० रुपये प्रति चौरस मीटर प्रति माह असा दर आहे. जास्तीची जागेचा वापर करू देण्यात गैरप्रकार झाल्याचीही ‘सीबीआय’ला शंका आहे. नक्की किती गैरप्रकार केला, यात इतरांचा सहभाग किती, नेमका कसा हा गैरप्रकार केला, गैरप्रकारातील रकमेची गुंतवणूक कुठे व किती झाली, याचा तपास करण्याच्या उद्देशाने आज पुन्हा ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानतळाचे संचालक सुरेश बोरकर, वाणिज्य व्यवस्थापक महेशकुमार तसेच कंत्राटदार सुनीलकुमार माथूर यांच्याविरुद्ध ‘सीबीआय’ने भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, १२० बी व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला.
‘सीबीआय’चे पोलीस अधीक्षक जॉन थॉमस, अतिरिक्त अधीक्षक पांगारकर, पोलीस निरीक्षक राजविक्रम ऋषी, एम.एस. पाटील, एस.एम. हिरडे, उपनिरीक्षक के.के. सिंह, आर.एच. कुजुर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या तिघांच्याही निवासस्थानी तसेच कार्यालयात सकाळपासून कारवाई सुरू केली. रात्री उशिपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर कागदपत्र ‘सीबीआय’ला मिळाली. या कारवाईने प्राधिकरण वर्तुळात खळबळ उडाली.