Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेची जय्यत तयारी
पोद्दारेश्वर राम मंदिर, पश्चिम व उत्तर नागपुरातून आज निघणार शोभायात्रा
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूरचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव म्हणून देशभरात ओळखली जाणारी श्रीराम जन्मोत्सव

 

शोभायात्रा उद्या, शुक्रवारी शहरातील तीन मंदिरातून निघणार आहे. पोद्दारेश्वर राम मंदिर, रामनगरातील राम मंदिर आणि उत्तर नागपुरातील मोतीबागमधील प्राचीन शिवमंदिरातून श्रीरामचंद्राचा जयघोषाने शोभायात्रेला प्रांरभ होणार आहे.
पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर आधारित ७० चित्ररथ, विविध राज्यातील १२ बहारदार लोकनृत्यांसह लहानलहान चित्ररथही सहभागी होणार आहेत. शोभायात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या आकर्षक रथावर प्रभूरामचंद्रांची मूर्ती आरूढ झाल्यावर महापौर माया इवनाते यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग, सतीश चतुर्वेदी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, दुग्ध विकास मंत्री अनिस अहमद, आमदार देवेंद्र फडणवीस, दीनानाथ पडोळे, उपमहापौर किशोर कुमेरिया, पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित, विभागीय आयुक्त आनंद लिमये, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त असीम गुप्ता, माजी खासदार दत्ता मेघे, विजय दर्डा, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, गृहमंत्री नितीन राऊत, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक दयाशंकर तिवारी, मुन्नालाल गौर, श्यामसुंदर पोद्दार, सुरेश शर्मा, हरिलाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शोभायात्रेच्या मार्गावर व काही चौकातही विविध संघटनातर्फे सजावट व आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहे. शोभायात्रेला पोद्दारेश्वर राम मंदिर येथून दुपारी ४ वाजता प्रारंभ झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता इतवारी शहीद चौक, केळीबाग मार्ग, महाल रात्री ७.३० वाजता. कॉटन मार्केट येथे रात्री ९ वाजता व सीताबर्डी येथे रात्री १० वाजता पोहचेल. शोभायात्रा मार्गावरील वाहतूक व्यवस्था किशोर पाटील यांच्या नेतृत्वात २५० संघटना आणि ६ हजार स्वयंसेवक सांभाळणार आहेत. शोभायात्रेच्या मार्गावर अनेक सामाजिक संघटना व दुकानदारांतर्फे पाणी, सरबत व प्रसादाचे वाटप करण्यात येईल. शोभायात्रेच्या मार्गावर गांजाखेत चौक, इतवारी येथे गलाई ओळीजवळ, केळीबाग मार्गावर अशोका कुल्फी, महाल येथे आगरा भंडार, आग्याराम देवी चौकात गणेश पान मंदिराजवळ, शिक्षक सहकारी बँक, महालक्ष्मी देवस्थान बडकस चौक, कालभैरव मंदिर समिती, केळीबाग रोड, चावला भोजनालय, महाल, आग्याराम देवी चौक, अग्रवाल हार्ड वेअर, बर्डी मेन रोड इत्यादी १३ ठिकाणी महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मोमीनपुरा भागात शोभायात्रा आल्यावर भारतीय मुस्लिम समाज व नगर अमन शांती कमेटी या मुस्लिम संघटनांतर्फे त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. मुस्लिम युवक संघटना मोमीनपुरा भागात प्रवेशद्वार उभारणार आहेत. यावेळी आसिफ अब्दुल हमीद कर्नल व मित्रपरिवारातर्फे पुष्पवृष्टी व शांतीचे प्रतीक म्हणून कबुत्तर उडवली जातील.
पश्चिम नागपूर नागरिक संघ व श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगरातील राम मंदिरापासून प्रभूरामचंद्राची शोभायात्रा निघणार असून या शोभायात्रेत १०२ चित्ररथ व विविध आकर्षक लोकनृत्य करणारी चमू सहभागी होणार आहे. रामनवमीला दुपारी १२ वाजता राममंदिरात रामजन्म सोहोळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता प्रभूरामचंद्राच्या पालखीची पूजा होऊन शोभायात्रेला प्रारंभ होईल. यावेळी नागपुरातील सर्व वर्तमानपत्राचे संपादक व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तिरुपती तिरुमला देवस्थान परिसरातील नादस्वरम व उत्तरेतील शहनाई यावर्षी शोभायात्रेचे आकर्षण राहणार आहे. शोभायात्रेत हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. शोभायात्रेचा प्रारंभ रामनगरातून होणार असून लक्ष्मीभवन चौक, कॉफी हाऊस चौक, झेंडा चौक, जोशी मंगल कार्यालय, लक्ष्मीभवन चौक, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर चौक, डॉ. तोरणे याचा दवाखाना, श्रद्धानंदपेठ, अभ्यंकरनगर, व्हीआरसीई कॉलेजसमोरून, एलएडी कॉलेज चौक, कार्पोरेशन चौक, बाजीप्रभू चौक मार्गे श्रीराममंदिरात येईल. शोभायात्रेच्या मार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. चौकाचौकात संस्कार भारतीतर्फे रांगोळ्या काढण्यात येणार आहे.
उत्तर नागपुरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी बेलिशॉपमधील तीनशे वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मंडळ व्यवस्थापक शरदचंद्र जेठी यांच्या हस्ते पूजन होणार आहे. यावेळी गृहराज्यमंत्री नितीन राऊत, आमदार व्हिक्टर फ्रेटस, प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, मंडळ सुरक्षा आयुक्त के.के. शर्मा, वाणिज्य व्यवस्थापक प्रदीपकुमार, अ‍ॅड. अरुण कोटेचा, नगरसेवक बब्बी बाबा, संदीप सहारे, दीपक लालवानी उपस्थित राहणार आहेत. गेल्या सात वर्षांंपासून उत्तर नागपुरातून शोभायात्रा काढण्यात येत आहे. शोभायात्रेत विविध पौराणिक कथांवर आधारित चित्ररथ राहणार आहेत. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी प्रवीण डब्ली, व्ही. रामाराव, के श्रीनिवासराव, बी.आर. पाली, पी. गुरूनाथ, राजेश्वर प्रसाद, अरविंद ढवळे, नंदकिशोर पांडे, गीता श्रीवास, मनमोहन पटेल आदी समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.