Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

यंदा तगडे बंडखोर नाहीत
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभा निडणुकीत बंडखोरांचे पीक येईल आणि बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून ते प्रमुख राजकीय पक्षांची डोके दुखी वाढवतील, असा व्यक्त केला जाणारा अंदाज फोल ठरला

 

आहे. भंडारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते प्रफुल पटेल यांच्या विरोधात काँग्रेचे माजी आमदार नाना पटोले यांनी केलेल्या बंडखोरीचा अपवाद सोडला तर इतर मतदारसंघात तगडे बंडखोर रिंगणात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठय़ा प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागला होता. बंडखोरांनी बहुजन समाज पार्टीच्या झेंडय़ाखाली निवडणुका लढवून एक प्रकारे युतीच्या उमेदवारालाच विजयाचा मार्ग मोकळा करून दिला होता. रामटेक, वर्धा, भंडारा, चंद्रपूरसहा विदर्भातील पाच जागा काँग्रेसला गमवाव्या लागल्या. यंदाही त्याच पद्धतीच्या उमेदवारांच्या शोधात बहुजन समाज पार्टी होती, मात्र त्यांना गडचिरोली वगळता बडा मासा गळाला लागला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी नेते आणि माजी मंत्री धर्मरावबाब आत्राम यांचे बंधू सत्यवानराव यांना बसपाने गडचिरोलीतून उमेदवारी दिली आहे. नाही म्हणायला नागपूर येथेही भाजपचे माणिकराव वैद्य यांनी बसपाकडून उमेदवारी मिळवली पण यापूर्वीच्या तीन लोकसभा निवडणुकीत वैद्य यांनी घेतलेली मते पाहता त्यांचा समावेश दखलपात्र बंडखोर उमेदवारात करता येणार नाही.
वर्धा मतदारसंघात काँग्रेसचे दत्ता मेघे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख यांचे पुत्र समीर बसपाकडून निवडणूक लढविणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. समीर रिंगणात असते तर दत्ता मेघे यांना ही निवडणूक कठीण गेली असती. या मतदारसंघातून आमदार बच्चू क डू रिंगणात उतरणार अशी चर्चा होती, त्यांनी चाचपणीही केली होती, मात्र त्यांनी अर्ज दाखल केला नाही.
सुलेखा कुंभारे यांनी नागपूर आणि रामटेक येथून कायम ठेवलेली त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती करणाऱ्या शेतकरी संघटना समर्थित स्वतंत्र भारत पक्षाने लोकसभेसाठी वर्धा, चंद्रपूर येथे उमेदवार उभे केले आहेत. आमदार चटप यांची चंद्रपुरात भाजपचे हंसराज अहिर यांच्याशी लढत आहे. तगडे बंडखोर असा ज्यांचा उल्लेख करता येईल तो फक्त भंडारा येथील माजी आमदार नाना पटोले यांचाच. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. पटोले माघार घेतील अशी चर्चा होती, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रयत्न केले, मात्र त्यांनी अर्ज कायम ठेवल्याने भंडाऱ्याच्या लढतीकडे सर्वाचे लक्ष राहील.