Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सेवादल महिला महाविद्यालयात कार्यशाळा
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

सेवादल महिला महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगद्वारा प्रायोजित ‘मायक्रोस्केल टेक्निक्स इन केमेस्ट्री’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांनी कार्यशाळेचे

 

उद्घाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे माजी स्नातकोत्तर रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. के.एन. मुन्शी, पुणे विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्र-पाठक डॉ. पी.डी. लोखंडे, सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केशवराव शेंडे, सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे उपस्थित होते.
डॉ. एस.एन. पठाण यांनी, विशिष्ट पद्धतीची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे यांचे अभिनंदन केले. अशाप्रकारच्या कार्यशाळेसंबंधी महत्त्वपूर्ण गोष्टी अभ्यासक्रमात लावण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल, जेणेकरून द्रावणांचा आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घेण्याचा विद्यार्थी व प्राध्यापक प्रयत्न करतील. त्यामुळेच ही नवीन पद्धत फायद्याची असून आपण जागरूक होणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. पठाण यांनी आवर्जून सांगितले.
रसायने किंवा द्रावणे विशिष्ट पद्धतीने वापरल्यास प्रदुषणाला आळा बसू शकेल तसेच, मनुष्याच्या आरोग्यावर होणारे परिणामसुद्धा आपल्याला टाळता येणे शक्य आहे. रसायनांची वा द्रावणांची आपण कशी बचत करू शकतो यावर लक्ष देणे तितकेच महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत डॉ. पी.डी. लोखंडे यांनी व्यक्त केले.
अभ्यासात विशिष्ट पद्धत अंमलात आणली तर कमी भांडवलात वारंवार प्रयोग करता येणे शक्य आहे तसेच, प्रदूषण, पर्यावरण यावर आपणाला संशोधनादरम्यान अनेक सफलतापूर्वक गोष्टी साध्य करून घेता येईल. त्यामुळे या विशिष्ट पद्धतीची जागृती प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना करून द्यावी, असे मत प्रा. के.एन. मुन्शी यांनी व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे व संचालन डॉ. महाकाळकर यांनी केले. डॉ. शिवणकर यांनी आभार मांडले.