Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पदयात्रा, मेळावे आणि प्रचार सभांना जोर
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात सर्व प्रमुख उमेदवारांचा जोमात प्रचार सुरू आहे.

 

पदयात्रा, मेळावे आणि सभांच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे.
सर्व आघाडय़ांवर केंद्र आणि राज्य सरकार पूर्णत अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भारनियमन, बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून त्यासाठी राज्यकर्तेच जबाबदार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेनेचे बनवारीलाल पुरोहित यांच्या प्रचारार्थ अनंतनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान करण्यासाठी पुरोहित यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे आणि राकेश बोबडे यांचेही भाषण झाले. सभेला महापौर माया इवनाते, भाजपचे अध्यक्ष सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, शेषराव काळे, अमरजितसिंह गहेरवाल, सुनील अग्रवाल, सुनील मित्रा, संजय बंगाले, दिगंबर ठाकरे, जिल्हाध्यक्ष अशोक धोटे, भूषण शिंगणे, रवी सोलव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश चोपडे यांनी, तर संचालन दिलीप खंडेलवाल यांनी केले.
देशाचा आर्थिक विकास आणि सामाजिक सलोखा हेच काँग्रेसचे ध्येय आहे. त्यासाठी जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रामटेकमधील काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी केले.
सावनेर विधानसभा मतदारसंघातील दहेगाव रंगारी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार एस.क्यू. झमा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सदानंद निमकर, चंदनसिंग रोटेले, गोविंद चौधरी, प्रेमलाल पटेल, रमेश जैन, सुरेश वानखेडे आणि चंद्रकांत गोंडाणे आदी उपस्थित होते.
नागपुरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांची शहीद चौकातून पदयात्रा काढण्यात आली. विदर्भ चंडिकेचा आशीर्वाद घेऊन मुत्तेमवार यांनी पदयात्रा सुरू केली. पंजा चिन्ह असलेले फलक, तिरंगा दुप्पटा आणि तिरंगीच टोपी परिधान केलेले कार्यकर्ते विलास मुत्तेमवार जिंदाबाद, वारे पंजाच्या घोषणा देत निघाले. टांगा स्टॅण्ड, निकालस मंदिर, अमरदीप टॉकीज, नेहरू पुतळा, मस्कासाथ, दलालपुरा, राऊत चौक, मेहदीबाग, बांगलादेश, विणकर कॉलनी, बैरागीपुरा, पिवळी मारबत चौक, बंगाली पंजा, भारतमाता चौक, तीननल चौक, गोळीबार चौक, पाचपावली, ठक्करग्राम आदी भागातून ही पदयात्रा गेली.
पदयात्रेत शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, आमदार दीनानाथ पडोळे, माजी महापौर विकास ठाकरे, रवींद्र दुरुगकर, डॉ. गजराज हटेवार, तुफैल अशर, अण्णाजी राऊत, माजी उपमहापौर अशोक जर्मन, कमलेश समर्थ, अतुल कोटेचा, यशवंत कुंभलकर, प्रशांत धवड, सुजाता कोंबाडे, कांता पराते, पिंटू बागडी, दिनेश शाहू, संदेश सिंगलकर, विक्रम संतोषवार, राजू देशमुख, विजय पखाले, भूषण दडवे, उमेश शाहू, संजय महाकाळकर, मंसूर खान आदी सहभागी झाले होते.
मुत्तेमवार यांची दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही पदयात्रा झाली. यात प्रदेश सरचिटणीस शेख हुसेन, विजय बाभरे, हीरा बडोदेकर, सुभाष भोयर, सतीश होले, कुसुम घाटे, अशोक काटले, विशाल मुत्तेमवार, अतुल सातपैसे, दिनेश वाघमारे, चंद्रशेखर महाकाळकर आदींचा समावेश होता. पदयात्रेच्या अखेरीस शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, आमदार दीनानाथ पडोळे आणि उमेश शाहू यांची भाषणे झाली. मुत्तेमवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ सीडीचे लोकार्पण करण्यात आले. यात दस्तुरखुद्द मुत्तेमवारांचाच आवाज आहे. या सीडीची संकल्पना सचिन दुरुगकर यांची असून संगीत शैलेश दाणी, पंकज सिंग यांचे आहे. यात मुत्तेमवार यांच्याशिवाय सारंग जोशी यांचाही आवाज आहे.
नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांनी गोळीबार चौकात मुत्तेमवार यांची पदयात्रा आली असता त्यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला व काळे झेंडे दाखवले.
महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक लोकशाहीच्या संकल्पनेची देशाला गरज आहे, असे प्रतिपादन बसपचे माणिकराव वैद्य यांनी केले. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांना पंतप्रधान करण्यासाठी बसपलाच विजयी करा, असे आवाहनही त्यांनी गोळीबार चौकातील जाहीर सभेत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, प्रदेश सरचिटणीस भाऊ गोंडाणे, कृष्णा बेले, शरद वंजारी, प्रा. जयंत जांभुळकर, हलबा माना भाईचारा समितीचे प्रदेश सचिव प्रदीप निमजे, दिलीप रंगारी, राजेंद्र बनसोड, डॉ. शीतल नाईक, अ‍ॅड. दिनेश चौबे आणि डॉ. पी.एस. चंगोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश छमे यांनी, तर संचालन प्रफुल्ल मानके यांनी केले.
माणिकराव वैद्य यांच्या प्रचारार्थ रिझव्‍‌र्ह बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून स्कूटरवर मिरवणूक काढण्यात आली. तेली समाजाचे नेते विजय डांगरे, सुनील भलमे प्रामुख्याने उपस्थित होते. धरमपेठेतील बौद्ध विहारात मिरवणुकीचे रूपांतर एका सभेत झाले. मिरवणुकीत अविनाश बडगे, आशीष उरकुडे, जगदीश गजभिये, सुधीर सोनकांबळे, रशीद खान, प्रमोद कडमाके, सुभाष सरोदे आदी उपस्थित होते.