Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मुख्याध्यापिका जांभुळकर यांचा मृत्यू;अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

कामठी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भुगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील

 

मुख्याध्यापिका पंचशिला जांभुळकर यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवून निलंबित करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजकुमार घुले व गणपत राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.
आठ दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी, सह गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख या तीन अधिकाऱ्यांनी शिक्षिका जांभुळकर, पिंपळकर, पोटफोळे दाम्पत्य अशा चौघांवर वेतनवाढ थांबवण्याची कठोर कारवाई केली. या कारवाईमुळे त्या सतत मानसिक दडपणाखाली आल्या होत्या. त्यात त्यांचा ब्रेन हॅम्रेजने १ एप्रिलला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे घुले म्हणाले. गेल्या सहामहिन्यापासून हे अधिकारी त्रास देत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जांभुळकर यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी महेश करजगांवकर यांच्याकडे १५ सप्टेंबर २००८ रोजी केली होती. परंतु त्यांनी या मागणीची दखल न घेता अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही. परिणामी हे अधिकारी आणखीच त्रास देऊ लागले. त्यामुळे करजगांवकर हे सुद्धा तेवढेच दोषी असल्याने त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी घुले यांनी याप्रसंगी केली.
गेल्या एक वर्षांपूर्वी भुगाव येथे रुजू झालेल्या मुख्याध्यापिका जांभुळकर यांच्याविरुद्ध त्या गावातील नागरिकांची कुठलीही तक्रार नव्हती. त्यांचे अध्यापन कार्यही चांगले होते. तरीही हे अधिकारी कामठी पंचायत समितीतील एका पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जांभुळकर यांना त्रास देत होते. सततच्या त्रासामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाला, असेही घुले याप्रसंगी म्हणाले. जांभुळकर यांच्या मृत्यूला अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.