Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘महिलांचे आरोग्य व पोषण’ विषयावर कार्यशाळा
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

इन्स्टिटय़ूट ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट व जय दुर्गा आरोग्य जागृती योग प्रसारक मंडळ यांच्या

 

संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयुर्वेदिक ले-आऊट येथील समाज भवनात ‘महिलांचे आरोग्य व पोषण’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन माजी नगरसेविका मालती मामीडवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य निर्मला कानतोडे होत्या. याप्रसंगी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धाबेकर, डॉ. वैशाली खेडीकर, डॉ. रेखा जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. अशोक धाबेकर यांनी प्रास्तविकातून कार्यक्रमाची भूमिका सांगितली. कार्यक्रमाचे संचालन सुजाता बन्सोड यांनी केले. प्रा. सीमा फडणवीस यांनी आभार मानले.
डागा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. वैशाली खेडीकर यांनी ‘रजोनिवृत्तीनंतर महिलांना उद्भवणाऱ्या समस्या व निराकरण’, मातृसेवा संघाच्या माजी अधीक्षिका डॉ. रेखा जयस्वाल यांनी ‘महिलांचे आरोग्य व स्त्री भृणहत्या’, योगतज्ज्ञ सुजाता बन्सोड यांनी ‘योगाचे महत्त्व’ आणि डॉ. अशोक धाबेकर यांनी ‘महिलांचा आहार व अन्नातील विषबाधा’ या विषयावर विस्तृत माहिती दिली.
कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात महिलांनी योग व आरोग्य या संदर्भात उपस्थित केलेल्या शंकांचे तज्ज्ञांनी निरसन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत कोलचलवार, हेमंत बन्सोड, प्रभाकर देवळे आदींनी सहकार्य केले.