Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चिखली झोपडपट्टीवासीयांना रेशन कार्ड द्या, अन्यथा तीव्र आंदोलन
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

येत्या पंधरा दिवसात रेशन कार्ड देण्यात यावे व ते देण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

 

करावी, या मागणीसाठी इतवारी झोन कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आगीची झळ पोहचलेल्या चिखली वस्तीतील नागरिकांनी पत्रकार परिषदेत दिला.
कळमना जवळील चिखली झोपडपट्टीत १ फेब्रुवारी आणि ४ मार्चला लागलेल्या आगीत ३५० झोपडय़ा जळून नष्ट झाल्या. या आगीत नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्यासह सर्वच वस्तू जळून नष्ट झाल्या तसेच दोघांचा मृत्यूही झाला. या आगीनंतर सर्व नेस्तनाभूत झालेल्या नागरिकांना शासनाकडून काही मदत मिळेल, अशी अपेक्षा असतानाच मदत तर सोडा साधी सहानुभूतीही मिळत नाही. आगीत सर्व साहित्यासोबत त्यांचे रेशन कार्डही जळाले. त्यामुळे त्यांना स्वस्त अन्न धान्य मिळत नाही. परिणामी त्यांना दुकानातून महागडे धान्य विकत घ्यावे लागत आहे. या घटनेनंतर रेशन कार्ड मिळावे, यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहे. परंतु संबंधित अधिकारी विविध कारणे सांगून रेशन कार्ड देण्यास तयार नाही. रहिवासी प्रमाणपत्र, मतदान कार्ड आदी कागदपत्रांची मागणी करत आहे. हे सर्व कागदपत्रे जळून नष्ट झाल्याने कोणते पुरावे सादर करणार असा प्रश्नही या नागरिकांनी उपस्थित केला. बेघर निवासी नागरिकाला शिधापत्रिका देण्यात यावी, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अध्यादेशात म्हटले असले तरी अधिकाऱ्यांना या अध्यादेशाचा विसर पडलेला दिसून येतो. किमान तात्पुरते रेशन कार्ड द्यावे, अशी रास्त मागणी चिखली झोपडपट्टीवासीयांची आहे.
या अध्यादेशाची पायमल्ली करून रेशन कार्ड देण्यास नकार देणाऱ्या इतवारी झोनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व येत्या पंधरा दिवसांत राशन कार्ड देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आगग्रस्त चिखली झोपडपट्टीवासी मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला राजेश बांगर, संजय गजेंद्रकर, रवींद्र घरडे, फरिदा सतार बेगम, मनसुखलाल सूर्यवंशी, सुधा नरांजे आदी उपस्थित होते.