Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सर्व पक्षातील असंतुष्टांना मी पर्याय -सुलेखा कुंभारे
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी
बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या उमेदवार म्हणून अ‍ॅड. सुलेखा कुंभारे या नागपूर व रामटेक या

 

दोन्ही मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवणार असून, जोगेंद्र कवाडे यांनी त्यांच्यासाठी रामटेकमधून माघार घेतली आहे. सर्व पक्षातील असंतुष्टांना मी पर्याय असून ही गोष्ट मतपेटीतून दिसून येईल, असे सुलेखा कुंभारे यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी उमेदवारी मागे घ्यावी असा निर्णय पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीने घेतला असून आता रामटेकमधून सुलेखा कुंभारे लढणार आहेत. त्यांना आमच्या पक्षाने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांना दिली.
ही आमचे अस्तित्व आणि स्वाभिमानाची लढाई असल्याचे सांगून सुलेखा कुंभारे म्हणाल्या, यापूर्वी दोनवेळा निवडणूक हरलेले मुकुल वासनिक यांची उमेदवारी रामटेकमध्ये लादली गेली आहे, तर कृपाल तुमाने कुणाला माहीतही नाहीत. याउलट मी कामठीची रहिवासी असल्याने स्थानिक उमेदवार म्हणून लढत आहे. कवाडे यांचे आशीर्वाद मिळाल्याने माझा विजय निश्चित आहे. नागपूरमधून निवडणूक लढण्यासाठी माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. विलास मुत्तेमवार यांनी कार्गो हबच्या नावावर लोकांना मूर्ख बनवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचेच लोक त्यांच्याविरुद्ध काम करत आहेत. तर पुरोहित यांची प्रतिमा पक्ष बदलणारा उमेदवार अशी आहे. नागपूर हे रिपब्लिकन चळवळीचे मोठे केंद्र आहे. तरीही येथून अनुसूचित जातीच्या उमेदवाराला वंचित करण्याचा मुत्तेमवारांचा डाव होता. त्याविरुद्ध मी लढत आहे.
अतिशय कमी कालावधीत दोन्ही मतदारसंघात आपण निवडणुकीचा प्रचार कसा करणार, असा प्रश्न विचारला असता सुलेखा कुंभारे म्हणाल्या की, रामटेक मतदारसंघाची फेररचना जाहीर झाल्यापासून आमच्या कार्यकर्त्यांनी तेथे निवडणुकीची तयारी सुरू केली होती. आता ही तयारी पूर्ण झाली असून तेथे आम्हाला प्रचाराची गरज नाही. दोन्हीपैकी कोणत्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार असे विचारले असता त्यांचे उत्तर होते- ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!’ रामटेकवर भर असला तरी नागपूरकडेही मी तितकेच लक्ष देणार आहे.
येथे रिपब्लिकन पक्षाचा आणखी एक उमेदवार असल्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले, ह्लयशवंत मनोहर यांच्याबद्दल मला आदर आहे, परंतु राजकारण आणि निवडणूक हा साहित्यिकांचा प्रांत नाही!ह्व
तुम्ही काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला आणि ती न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात लढत आहात, हे लक्षात आणून दिले असता कुंभारे म्हणाल्या, ह्लकाँग्रेस मला उमेदवारी देईल असे वाटत होते, पण त्यांनी विश्वासघात केला. सेनेच्या चिन्हावर लढायचे नव्हते, कारण भीमशक्तीचे अस्तित्व ठेवायचे होते.ह्व इतर पक्षातील लोकांची तुम्हाला मदत होत आहे काय, असे विचारले असता, सर्व असंतुष्टांना माझ्या रूपाने पर्याय मिळाला असून मतपेटीतून ते दिसून येईलच, असे उत्तर त्यांनी दिले.
नितीन गडकरी यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्यामुळे रामटेकमधून त्यांनी तुम्हाला उमेदवारी देणे अपेक्षित नव्हते काय, या प्रश्नावर जोगेंद्र कवाडे म्हणाले, ह्लविदर्भाच्या विकासासाठी आणि अनुशेषाच्या संघर्षांत एक लढाऊ नेता म्हणून गडकरी यांना आम्ही कुठल्याही अपेक्षेशिवाय पाठिंबा दिला होता. आमचा प्रमुख शत्रू काँग्रेस आहे. त्यामुळे भाजप-सेनेची आमच्यासोबत सन्मानजनक युती झाली असती, तर त्यांची उमेदवारी मी स्वीकारली असती.