Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

चुना व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरणात आणखी चार आरोपींचा सहभाग
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

चुना व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरणात आणखी चार आरोपींचा सहभाग असल्याचे समजले असून

 

त्यापैकी एकाला व्यापाऱ्याची माहिती होती, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनूपकुमारसिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
गोलू ऊर्फ हितेश कवरलाल पुरोहित (रा. सदर गांधी चौक) याचे ३१ मार्चला अपहरण झाले. याप्रकरणी लकी खान गुलामनबी खान व विनोद शंकर गिऱ्हे (दोघेही रा. न्यू कॉलनी सदर) या आरोपींना बुधवारी रात्री अकोलाजवळील बोरगाव मंजू येथे अटक करण्यात आली. आरोपी लकी खान याच्याविरुद्ध रॉबरी व विनोदविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. लकीने त्याचा वणीचा मित्र अजहर तसेच अकोल्याचा संतोष गावंडे या दोघांना बोलावून घेतले. कवरलाल पुरोहित यांना ओळखत असून ते खुप श्रीमंत असल्याचे सांगून अजहरने गोलूच्या अपहरणाची योजना आखली. हे चौघेही ३१ मार्चला दुपारी एमएच ३१ सीपी ३५१० क्रमांकाच्या टाटा इंडिकाने गोलूच्या घरी गेले. बंगला बघण्यास चल, असे म्हणून त्यांनी गोलूला कारमध्ये बसवले आणि चाकू व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले.
वर्धा येथे पोहोचल्यावर आरोपींनी गोलूच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांशी संपर्क साधत अपहरण केल्याची तसेच १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्याला यवतमाळ जिल्ह्य़ातील कळंब येथील पुरुषोत्तम राऊत याच्या शेतात नेऊन डांबले. कवरलाल पुरोहित यांनी राजुरा येथील एका परिचिताला हा प्रकार सांगितला. त्या परिचिताने विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत सावरकर यांना आणि सावरकर यांनी अनूपकुमारसिंह यांना हा प्रकार सांगितला. कवरलाल पुरोहित अनूपकुमारसिंह यांच्याकडे गेले. त्याचवेळी दुसरा कॉल आला. आरोपींनी १५ लाख रुपयांची मागणी केली. इतक्या लवकर हे शक्य नाही. उद्या ही रक्कम देतो, असे पुरोहित यांनी सांगितले. रात्रभरात सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक प्रमोद घोंगे, प्रदीप लांबट यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी शहरातीलविविध ठिकाणी शोध घेतला. आरोपींनी बुधवारी अमरावती मार्गावरील तिवसा येथे रक्कम घेऊन येण्यास सांगितले. या पथकाने पहाटेच तिवसा येथे सापळा रचला. सकाळी पुरोहित तसेच अनूपकुमारसिंह यांच्यासह रक्कम घेऊन एक पथक रवाना झाले. आरोपींनी वारंवार ठिकाणे बदलवली. आरोपींजवळ बीएसएनलचा मोबाईल असल्याने नागपुरातील सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संजय पांडे व त्यांचे सहकारी ‘बीएसएनएल’च्या मदतीने आरोपींचे लोकेशन पथकाला कळवत होते. पुरोहित यांच्यासह पोलीस असल्याचे ओळखले, असे त्यांच्या बोलण्यावरून पोलिसांना जाणवले. पोलिसांनी अमरावती येथून खाजगी कार भाडय़ाने घेतल्या आणि पुढे निघाले. अमरावतीजवळ पथकर नाक्यावर एक पांढरी कार वेगात न थांबता पुढे गेल्याने पोलिसांना शंका आली आणि त्यांनी त्या कारचा क्रमांक लिहून घेतला. बोरगाव मंजू येथे एका धाब्यावर तीच कार उभी दिसल्याने पोलिसांनी कार त्या कारजवळ नेली. कारमधील आरोपींनी लगेचच काचा लावून घेतल्याने पोलीस उतरले. चालकाला विचारत असतानाच दुसऱ्या बाजूने एक तरुण पळू लागल्याने पोलिसांनी धावून त्याला पकडले. पोलिसांशी झटापट केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत त्याला आणि कारमधील एका तरुणाला पकडले. आरोपींनी गोलूचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्याला कळंबला ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींना घेऊन कळंब गाठले.
लकीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधूनही तो होत नसल्याने अजहर व संतोष घाबरले. त्यांना गोलूला वर्धा बस स्थानकावर सोडून पळून गेले. गोलू काल रात्री साडेदहा वाजता घरी पोहोचला होता. अजहरने अपहरणाचा कट आखला. हे दोघे, शेत मालक पुरुषोत्तम राऊत तसेच आणखी एक आरोपी असून त्यांनाही लवकरच पकडले जाईल, असे अनूपकुमारसिंह यांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्याम बोरीवार, हवालदार बट्टुलाल पांडे, किशोर देशमुख, शिपाई शाहीद शेख, सतीश राऊत, नरेंद्र निंबाळकर, ताहीर शेख, प्रकाश वानखेडे, किशोर मालेकर, राजू पठाडे, मीना खानोरकर यांचाही या कारवाईत सहभाग होता.