Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भावगीताला सुवर्णकाळ देणारा गायक काळाच्या पडद्याआड
संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या शोकसंवेदना
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

ज्येष्ठ भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि

 

भावगीताला सुवर्णकाळ देणारा गायक काळाच्या पडद्याआड गेला असल्याची प्रतिक्रिया संगीत श्रेत्रातील मान्यवरांनी व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
गजानन वाटवे आणि भावगीत हे जणू त्याकाळी समीकरण झाले होते. त्यांच्या आवाजात दर्द होता. त्यामुळे भावगीतामधील कुठलाही प्रकार ते सहजतेने गात होते. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासोबत चिंचवडला गेलो असता त्या ठिकाणी गजाननराव वाटवे आले. त्यावेळी त्यांनी माझे गाणे ऐकले होते. महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर त्यांनी गायलेली बापूजींची प्राणज्योत हे गीत खूप गाजले होते. अतिशय सुरेल आणि भावगीताला साजेशा त्यांचा आवाज असल्यामुळे त्यावेळी त्यांनी गायलेली सर्वच भावगीते लोकप्रिय झाली होती. बबनराव नावडीकर, गोविंदराव पोवळे व गजाननराव वाटवे त्यावेळी भावगीताच्या क्षेत्रातील ही मोठी नावे होती. गजानन वाटवे यांच्या निधनाने मोठा भावगीत गायक काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुख आहे, अशा शब्दात ज्येष्ठ संगीतज्ज्ञ प्रभाकरराव देशकर यांनी भावना व्यक्त केल्या.
भावगीताचा खरा काळ गाजवला तो व्ही. एन जोशी आणि त्यानंतर गजाननराव वाटवे यांनी. मुंबईला असताना एका कार्यक्रमात गजाननरावांची भेट झाली होती. त्यांचा प्रांत हा भावगीताचा असल्यामुळे ते शास्त्रीय गायनाकडे फारसे वळले नाही पण, शास्त्रीय संगीताचा त्यांना गाढा अभ्यास होता. भावगीत गायनात व्ही. एन जोशी यांच्यानंतरचा काळ हा गजाननराव वाटवे यांनी गाजवला होता. त्यांची गायकीच मुळात शब्दप्रधान अशी होती. भावगीतामध्ये सुरासोबत शब्दाला तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे ते भावपूर्ण गायले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. फार पूर्वी ते नागपूरला आले असताना त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भावगीताच्या क्षेत्रातील दैदिप्यमान असा कलाकार गेल्याने संगीत क्षेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दात ज्येष्ठ तबलावादक गोपाळराव वाडेगावकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
गजानन वाटवे यांनी गायलेली जुनी भावगीते आजही लोकप्रिय असली तरी ती ऐकायला मात्र कमी मिळतात. गजानन वाटवे यांची गाणी आकाशवाणीवर ऐकायला मिळत असे. आता मात्र ती कमी झाली आहेत. भावगीत हा गायन प्रकार गाणाऱ्यांमध्ये जी काही मोठी नावे होती त्यात गजानन वाटवे यांचे नाव होते. त्यांच्या निधनाने संगीत श्रेत्राची हानी झाली आहे, अशा शब्दात संगीतकार प्रभाकर धाकडे यांनी भावना व्यक्त केल्या.
पाचव्या इयत्तेत शिकत असताना वडिलांसोबत संगीतकार यशवंत देव यांच्याकडे गेलो होतो .त्यावेळी तेथे गजानन वाटवे यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी म्हटलेले ‘मी निरांजनातील वात’ हे गीत आजही स्मरणात आहे. कुठलेही गीत गाताना त्या गीतातील भावना ते सुरातून व्यक्त करीत. भावगीतात सुरांइतकेच शब्दाला महत्त्व आहे त्यामुळे शब्द न तोडता ते सादर केले पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. भावगीतातील प्रत्येक शब्द सुरातून रसिकांना सांगता आला पाहिजे, यासाठी ते नवीन पिढीला मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला, अशा भावना संगीतकार राम गडकरी यांनी व्यक्त केल्या.
सुगम संगीतात मराठी भावगीत हा वेगळा असा अभिनव प्रकार गजाननराव वाटवे यांनी लोकप्रिय करून ऐतिहासिक कार्य केले आहे. वाटवे यांचे समकालीन असलेले व्ही.एन जोशी, जे. एल. रानडे, भोळे पती-पत्नी यांनीही मराठी भावगीत प्रकार ठोसपणे सादर करून लोकप्रिय केला होता. नामवंत कवींच्या कविता त्यांनी श्रोत्यांसमोर सादर करून कविता रुजवण्याचे काम केले. वारा फोफावला, निरांजन पडले तबकात, हीच राघवा हीच पैंजण, ती पहा बाबुजींची प्राणज्योत, रानात सांग कानात, गरजा जयजयकार, या रचना त्यांनी सादर करून लोकप्रिय केल्या होत्या. संगीत रचनांमध्ये ‘भारतीयत्व’ ही त्यांची वेगळी खुण होती. आपल्याकडील वाद्य वापरून त्यांनी त्यांनी विविध रचना सादर करून त्या लोकप्रिय केल्या आहेत. त्यांच्या निधनाने भावगीतातील ज्येष्ठ गायक ‘ठळक तारा’ निखळला, असा शब्दात समीक्षक सुलभा पंडित यांनी भावना व्यक्त केल्या.