Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘पतंग’ न मिळाल्याने निराश झालेल्या सुलेखा कुंभारेंना ‘टेबल लॅम्प’चा दिलासा
नागपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभेच्या नागपूर आणि रामटेक मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या उमेदवार

 

सुलेखा कुंभारे यांना हवे असलेले चिन्ह मिळविण्यासाठी बरीच धावपळ करावी लागली. मात्र, अखेर त्यांना हवे असलेले पतंग हे निवडणूक चिन्ह न मिळाल्याने त्यांची निराशा झाली पण, नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदार संघात टेबल लॅम्प हेच चिन्ह मिळाल्याने कुंभारेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला. आज इतरही लहान पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.
निवडणूक जिंकण्यासाठी चिन्हाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे लोकप्रिय चिन्ह मिळविण्यासाठी लहान राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची धडपड सुरू होती. अनेक अपक्ष उमेदवारांचे भवितव्य चिन्हांवरही अवलंबून असते. त्यामुळे हवे असलेले चिन्ह मिळविण्यासाठी आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. दुपारनंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये उमेदवारांनी दिलेले प्राधान्य व एखाद्या चिन्हास एकापेक्षा अधिक उमेदवारांनी मागणी केली असता लकी ड्रॉ अशा पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये नागपूर आणि रामटेक मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या सुलेखा कुंभारे यांनी पतंग या चिन्हाची मागणी केली. मात्र, या चिन्हाला सर्वाधिक उमेदवारांनी पसंती दर्शवल्याने लकी ड्रॉ काढण्यात आला. नागपूर मतदारसंघात पतंग चिन्ह डेमोक्रेटीक सेक्युलर पार्टीच्या मेहमूद खान रहीम खान यांना मिळाले, तर रामेटक मतदारसंघात याच पक्षाच्या सीमा रामटेके यांना मिळाले. त्यामुळे सुलेखा कुंभारे यांची निराशा झाली. दोन्ही मतदारसंघात पतंग चिन्हासाठी अडून बसलेल्या सुलेखा कुंभारेंना नागपूरसाठी झालेल्या लकी ड्रॉमध्ये टेबल लॅम्प चिन्हावर समाधान मानावे लागले, तर रामटेक मतदारसंघात या चिन्हाला कुठल्याही उमेदवाराने प्राधान्य न दिल्याने त्यांना हेच चिन्ह मिळाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेदरम्यान आपला पक्ष मान्यताप्राप्त असल्याने पतंग हेच चिन्ह द्यावे, अशी मागणी कुंभारे यांनी केली होती. मात्र, निवडणूुक निरीक्षकांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली.
दरम्यान, आज झालेल्या चिन्ह वाटपात अर्ज मागे घेतल्यानंतर नागपुरात २७, तर रामटेकमध्ये २० उमेदवार रिंगणात होते. आज झालेल्या चिन्ह वाटपामध्ये भारिप बहुजन महासंघाचे डॉ. यशवंत मनोहर यांना पाटी, रिपब्लिकन पक्ष खोरिपा यांना रोड रोलर, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दिलीप मडावी यांना कपबशी हे चिन्ह मिळाले. चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेत बहुतांश उमेदवारांनी पतंग आणि कपबशी या चिन्हांना प्राधान्य दिले होते. मनासारखे चिन्ह मिळाल्यानंतर काही उमेदवार अगदी आनंदाने, तर काही काहीसे निराश होऊन जात होते.