Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारीची चौकशी -जिल्हाधिकारी
नागपूर, २ एप्रिल/प्रतिनिधी
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात गुन्हा दाखल
दोन्ही मतदारसंघात एकूण १६६८ मतदान केंद्र
४८ मतदान केंद्रावर जादा पोलिंग बुथची व्यवस्था
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंग झाल्याच्या काही तक्रारी आल्या

 

असून प्रशासन याबाबत चौकशी करीत असून लवकरच त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आचारसंहिता लागू झाल्यापासून नागपूर मतदारसंघात विनापरवानगी मिरवणूक काढल्याबद्दल आणि रामटेक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ४६ मतदान केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता जादा बुथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
निवडणुकीबद्दल माहिती देताना दराडे म्हणाले, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून त्याबाबतची संबंधित माहिती व निवडणुकीसाठी लागणारे साहित्य याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची संख्या १६ च्या वर असल्याने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची संख्या वाढली असून त्यासंबंधीची मागणी आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती दराडे यांनी यावेळी दिली. आता उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने आवश्यक त्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दोन्ही मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्राबाबत विचारले असता दराडे म्हणाले, रामटेक लोकसभा मतदारसंघात बांद्रा हे संवेदनशील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या केंद्रावर निरीक्षक आणि कॅमेरामन व इतर आवश्यक कर्मचारी वर्ग निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत ठेवण्यात यावा, असे आदेश जारी करण्यात आले असल्याचे दराडे म्हणाले. दोन्ही मतदारसंघात एकूण १६६८ मतदान केंद्र असून यातील काही ४८ मतदान केंद्रावर जादा पोलिंग बुथची व्यवस्था करण्यात आल्याचे दराडे यांनी यावेळी सांगितले.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून त्यांना निवडणुकीसंबंधी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये उमेदवारांचा दैनंदिन खर्चाची व इतर आवश्यक माहिती प्रशासनाला दररोज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश कातडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक छगन वाकडे उपस्थित होते.