Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्वत: पुढाकार घेऊन काँग्रेस नेत्यांशी सुसंवाद साधणे चालू केले असून गुरुवारी नाईक यांनी ठाण्यात ज्येष्ठ नेते सुभाष कानडे व त्यांच्या समर्थकांची भेट घेतली. संजीव नाईक हे फक्त राष्ट्रवादीचे नव्हे तर आघाडीचे उमेदवार असून, जातीयवादी शक्तींना लोकसभेत जाण्यापासून रोखण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.

पाखरांना पाणी पाजा..
ठाणे/प्रतिनिधी - उन्हाळा आला की, अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. बाजारात कितीही शीतपेये, सरबते आली तरी, पाण्याशिवाय घशाची कोरड भागत नाही. माणसे किमान बिसलरीचे थंड पाणी पिऊन तहान भागवतात, पण पक्ष्यांची अवस्था उन्हाने बिकट होते. अशा पक्ष्यांना घोटभर पाणी मिळावे, यासाठी नवी मुंबईतील पक्षीप्रेमी पुढे आले आहेत. सीबीडी पूर्वेकडील टेकडीवर रोज सकाळ-संध्याकाळ अनेकजण फिरायला जातात. मोकळा वारा अंगावर घेत फिरायला जाणारे आपली तहान भागावी म्हणून पाण्याची बाटली सोबत घेऊन जातात. या टेकडीवर झाडे असल्याने अनेक पक्षी येतात. या पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे यासाठी नवी मुंबईतील पक्षीप्रेमींनी ‘पाखरांना पाणी पाजा’ ही संकल्पना कृतीत आणली. कवी शिवाजी मोटे, नितीन राणे, दीपक बनसोड, अल्ताफ इनामदार, विरसिंग कदम या पक्षीप्रेमींनी घरातील जुन्या बाटल्यांचे वाडगे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवले. जुन्या बाटल्या तळापासून कापल्या आणि त्या टेकडीवर ठिकठिकाणी जमिनीत पुरून ठेवल्या. सकाळ, संध्याकाळ टेकडीवर फिरायला येताना सोबत आणलेले पाणी जमिनीवरील वाडग्यांमध्ये ओतले जाते. परिसरात फिरायला येणारी माणसे देखील आता त्यांच्यासोबत आणलेले पाणी पक्ष्यांसाठी ठेवलेल्या भांडय़ात ओततात. उन्हाळ्याने हैराण झालेल्या पक्ष्यांना जीवदान देण्याचे काम या पक्षीप्रेमींनी केले आहे.

विरूपाक्षाने उघडला तिसरा डोळा!
पनवेल/प्रतिनिधी : ‘भगवान के घर देर है, अंधेर नही’, असे म्हणतात. पनवेलमधील प्रसिद्ध श्री विरुपाक्ष मंदिराचे पुजारी किसन भोपी यांना सध्या या उक्तीचा प्रत्यय येत आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने १९५२ साली भोपी कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी दिलेला भूखंड परस्पर विकसित करण्याची दिवास्वप्ने पाहणाऱ्या सध्याच्या विश्वस्तांना न्यायालयाने फटकारले असून, हा भूखंड ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश मंगळवारी दिला. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने १९५२ साली पनवेलच्या दिवाणी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये पुजारी भोपी यांना उदरनिर्वाहासाठी एक भूखंड दिल्याचे मान्य केले होते; परंतु काही वर्षांंपूर्वी या ट्रस्टमध्ये काही राजकीय मंडळींचा शिरकाव झाल्यानंतर भोपींवरील अन्यायास सुरुवात झाली. या विश्वस्तांनी प्रत्यक्ष श्री विरुपाक्ष देवाला कागदोपत्री मृत दाखवून तसेच भोपी कुटुंबियांना वारस नाही, असे भासवून स्वत:चे नाव या भूखंडाच्या उताऱ्यात घुसडले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज करून या भूखंडाचा विकास करण्याची परवानगी विश्वस्तांनी मागितली. या घडामोडींमुळे हक्काचा भूखंड गमावण्याची भीती प्रामाणिकपणे देवाची सेवा करणाऱ्या भोपी कुटुंबियांना वाटू लागली, परंतु खचून न जाता त्यांनी पनवेलच्या दिवाणी न्यायालयात भूखंडाच्या मालकीबाबत दावा दाखल केला. विश्वस्त मंडळाच्या नोंदीनुसार या भूखंडाचे आपणच मालक असून, सध्याच्या विश्वस्तांनी केलेल्या विकासाच्या ठरावाला तसेच धर्मादाय आयुक्तांकडे मागितलेल्या परवानगी अर्जाला अवैध ठरवून या भूखंडाचे मालक भोपीच आहेत, असा निवाडा करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. या विनंतीच्या बाजूने भोपींनी सादर केलेले पुरावे आणि ट्रस्टच्या कागदपत्रांतील नोंदी प्रथमदर्शनी ग्राह्य मानून या भूखंडाची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला. १३ एप्रिलला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. भोपी कुटुंबियांची बाजू अ‍ॅडव्होकेट दीपाली बांद्रे यांनी मांडली. सत्तेच्या बळावर गरीब पूजाऱ्याची जमीन गिळंकृत करू पाहणाऱ्यांना न्यायालयाने रोखल्याबद्दल भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पावण्यातील आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
बेलापूर/वार्ताहर - पावणे औद्योगिक वसाहतीतील धीरजलाल कंपनीला बुधवारी लागलेली आग सायंकाळी उशिरा आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलास यश आले असले, तरी ही आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या आगीमध्ये शशिकांत घोलप (२४) व किसन गुरव (२७) हे कामगार गंभीररीत्या भाजले असून, सध्या त्यांच्यावर ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार उपरोक्त दोन कामगार मोठय़ा पिंपातील थिनर लहान पिंपात ओतताना स्पार्क होऊन लहान आग लागली. ही आग विझविण्याच्या प्रयत्नात ते जखमी झाले. ही आग विझविण्यासाठी नवी मुंबई महापालिका, सिडको व एमआयडीसी अग्निशमन दलाचे १२ बंब व सहा पाण्याच्या टँकर यांचा वापर करण्यात आल्याचे अग्निशमन अधिकारी आनंद परब यांनी सांगितले. दरम्यान आग विझविण्याचा कॉल येताच आपल्या सुमारे ५० जवानांसह तात्काळ घटनास्थळी गेलेले नवी मुंबई मनपाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी बाजूची प्रताप ऑरगॅनिक केमिकल कंपनी कव्हर करण्यात विशेष मेहनत घेतली अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. टर्पेटाईन व सोल्व्हीन या तीव्रता असलेल्या रसायनांवर बाहेरील दिशेने सततचा फोमचा मारा सुरू होता. मात्र या रसायनांची तीव्रता इतकी होती की, फोमचे वरचेवर आगीत रूपांतर होत होते. आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून राणे यांनी धोका पत्करून गोदमाचे मागील शटर तोडून आत प्रवेश केला व जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले.

नवी मुंबईत मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट
बेलापूर/वार्ताहर - लग्नसराई सुरू झाल्याने नटूनथटून घराबाहेर पडताच चोरटय़ांकडून लुबाडण्याच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता सोने घालून कुठे जाणे मोठे जिकिरीचे झाले आहे. भुरटय़ा चोरांचा नवी मुंबईत सुळसुळाट असताना येथील पोलिसांना चोरटय़ांच्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यास अपयश येत आहे. यामुळे जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे. ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेत मुलाला सोडण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या श्रीशादेवी रेड्डी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ांनी लंपास केले. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या चोरीसाठी आतापर्यंत केवळ दुचाकीचा वापर केला जात होता. मात्र या घटनेत चोरटे काळ्या रंगाच्या इंडिका गाडीतून आले होते व चालत्या गाडीतून हात बाहेर काढून सदर मंगळसूत्र खेचून क्षणार्धात त्यांनी पोबारा केला. वाशी गावात पायी जाताना मेघा सुतार यांच्या गळ्यातील सहा हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी चोरून नेले. सीबीडीत राहत्या इमारतीचे मजले चढत असताना संतोषी ओबेरॉय यांच्या गळ्यातील ३५ हजारांची सोनसाखळी चोरटय़ांनी चोरून नेली. ऐरोलीमधील पटनी कंपनीजवळ अंजना चंदगुडे यांच्या गळ्यातीाल २० हजारांचे मंगळसूत्र खेचून चोरून नेले. विशेष म्हणजे भरदिवसा होणाऱ्या या चोऱ्यांमुळे पोलिसांचा बिलकुल धाक राहिला नसल्याचे चित्र शहरात आहे.

नेरुळ येथे १२ लाखांची घरफोडी
बेलापूर - नेरुळ येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी आतील पावणे अकरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादी जसबीरसिंग मथारू यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मथारू २३ ते ३० मार्चदरम्यान कामानिमित्त गावी गेला असता चोरटय़ांनी ही चोरी केली.

ऐरोलीत मंगळसूत्राची चोरी
बेलापूर - रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ांनी सोमवारी भरदुपारी पळविले. याप्रकरणी शशिकला पाटील यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील या सेक्टर ८ येथून दुपारी ४ वाजता रस्त्याने जात असताना भरधाव दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.