Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

दोन ‘मेसेज’!
भाऊसाहेब : आज कोन वाजत-गाजत, मिरवत जानार अर्ज भरायला, भावराव?
भाऊराव : आज रामनवमी. त्यामुळे तशी शांतता आहे. गेले दोन-तीन दिवस मुख्य उमेदवारांनी अर्ज भरायला जाताना शक्तीप्रदर्शनासाठी काढलेल्या शोभायात्रा, प्रचार फेऱ्या पाहून आपल्यालाही त्या वातावरणाची सवय झाल्यासारखं वाटायला लागलयं ना..

पक्षांतर्गत नाराजीमुळे वाटेवर काटेच अधिक
अविनाश पाटील

लोकप्रतिनिधीने ठरविल्यास आपल्या विधानसभा मतदारसंघाची बांधणी किती नियोजनबध्द पध्दतीने केली जाऊ शकते, याचे उदाहरण म्हणून शिरपूरचे आ. अमरीशभाई पटेल यांच्या कार्यपध्दतीकडे पाहिले जाऊ शकते. विकासात्मक कामांच्या मदतीने उभारण्यात आलेली या मतदारसंघाची तटबंदी इतकी भक्कम आहे की, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या झंझावातापुढे शिंदखेडा, धुळे यासारखे काँग्रेस आघाडीचे बालेकिल्ले ढासळले असताना शिरपूरचा एक चिराही निखळला नाही. धुळे जिल्ह्य़ात काँग्रेसची अब्रू वाचविण्याचे काम अमरीशभाईंनी केले. त्याचे फळ म्हणून की काय, धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविण्याची वेळ आली, तेव्हा पक्षश्रेष्ठींनी आ. रोहिदास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून पटेल यांच्या बाजूने आपला कौल दिला.

जळगावमध्ये आघाडीच्या मेळाव्यात एकीच्या आणाभाका
जळगाव / वार्ताहर

राष्ट्रवादीला दोन्ही जागा गेल्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेसजनांमध्ये पसरलेल्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दोन्ही पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचा मेळावा येथील नवजीवन मंगल कार्यालयात घेण्यात आला. मेळाव्यात दोन्ही पक्ष नेत्यांचा जल्लोश व कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहामुळे उमेदवार अ‍ॅड. वसंत मोरे यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता. एकिकडे आघाडीतील मतभेद मिटविण्यात यश आल्याचा आनंद असताना दुसरीकडे जय बाबाजी भक्त परिवारातर्फे मोरे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचा आग्रह धरण्यात आल्याने त्यांच्यापुढे समस्या निर्माण झाली आहे.

सागवान चोरी प्रकरणी १० पोलिसांविरुध्द कारवाई
वार्ताहर / जळगाव
दहा पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून सागवान लाकडाचे २७८ नग जप्त करण्यात आले. या
लाकडाची किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. जळगाव जिल्ह्य़ात यावल, रावेर आणि चोपडा या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्यातून नेहमीच मोठय़ा प्रमाणात सागवानाची चोरटी वाहतूक होत असते.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात पाच कोटींची तूट
जळगाव / वार्ताहर

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे २००९-१० वर्षांचे अंदाजपत्रक कुलगुरू प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व कुलसचिव डॉ. एम. व्ही. बरीदे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात विविध नव्या योजनांची तरतूद आणि विद्यार्थी हिताच्या योजनांना प्राधान्य देण्यात आले असून विविध उपाययोजनांचा अवलंब करून अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्याचा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला आहे.

धुळ्यातून काँग्रेसचे सखाराम घोडके यांची बंडखोरी
मालेगाव, ३ एप्रिल / वार्ताहर
धुळे लोकसभा मतदारसंघातून मालेगावचे उपमहापौर तथा काँग्रेसचे नेते सखाराम घोडके यांनी गुरूवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावेळी घोडके यांनी काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेवरही टीकास्त्र सोडले. काँग्रेसतर्फे धुळे मतदारसंघातून अमरीश पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पटेल यांच्या उमेदवारीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. रोहिदास पाटील यांनी याआधीच विरोध केला असताना आता मालेगावचे उपमहापौर घोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पटेल यांच्यासमोरील समस्या अधिक वाढवल्या आहेत. पटेल यांची उमेदवारी आधीच निश्चित झाली होती, काँग्रेसमध्ये बाहेरील व्यक्तीस उमेदवारी देण्याची काय गरज होती, असे प्रश्नही घोडके यांनी यावेळी उपस्थित केले.

नंदुरबारमध्ये योग प्रशिक्षण
नंदुरबार / वार्ताहर
शिक्षण विभाग आणि योग शिक्षकांच्या सहकार्याने ३७८ शाळेतील शिक्षकांना आणि या शिक्षकांच्या माध्यमातून गेल्या पाच महिन्यात एक लाख विद्यार्थ्यांना प्राणायाम व योगाचे प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती पतंजली योग समितीचे तालुका अध्यक्ष दिनेशकुमार रघुवंशी यांनी दिली. रघुवंशी यांनी या महिन्यात मोठय़ा प्रमाणावर शिक्षक शिबिरांचे आयोजन केले जाईल, असे सांगितले. तालुक्यातील १५८ गावांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नियमित योग वर्गही सुरू करण्यात येणार आहे. योग प्रचारासाठी गुढी पाडवा संकल्प दिन म्हणून पतंजली योग समितीने साजरा केला. या संकल्पानुसार शहर व तालुक्यात विविध ठिकाणी योग शिबिरे घेण्यात येणार आहेत. महिला समिती, गिरीकुंज सोसायटी, जगतापवाडी, श्रीकृष्णनगर या भागात एप्रिलमध्ये योग शिबिरे घेण्यात येतील. तालुका समितीच्या वतीने स्वामी समर्थनगर, माळीवाडा, नर्मदा विकास सोसायटीत तसेच तालुक्यातील कोळदा, गुजरभवाली या गावांना शिबीर घेण्यात येणार आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्राणायाम तसेच योग जागृती करण्याचा प्रयत्न पतंजली योग समिती करणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.