Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
विशेष

एका पत्रकाराची हत्या..
दहा दिवसांपूर्वीचीच गोष्ट. नवा ठाकुरियांचा गुवाहाटीहून मेल आला आणि २४ मार्चच्या रात्री 'अजी' नावाच्या गुवाहाटीहून निघणाऱ्या एका वृत्तपत्राच्या संपादकाची निर्घृण हत्या त्याच्या राहत्या घरासमोरच काही अज्ञात मारेक ऱ्यांनी केल्याचं कळलं. वेळ होती रात्री दहा-साडेदहाची. उलुबारीतील लछित नगरातील कार्यालयातलं काम संपवून अनिल मजुमदार राजगढ रोडवरील आपल्या घराकडे होंडा सिटी गाडीनं निघाले होते. ते घरासमोर आले मात्र, अंधाराचा फायदा घेऊन एका टाटा इंडिका मोटारीत लपून बसलेले पाच मारेकरी पुढे झाले, आणि त्यांनी धडधडीत समोरून मजुमदारांवर थेट छाताडातच गोळ्या झाडल्या आणि पळ काढला.

वाघ झाले बेवारस!
वाघ वाचवा, अशा हाका केंद्र सरकार रोज देत असले तरी या भागातील वन्यजीव व्यवस्थापनावर त्याचा अजिबात परिणाम झालेला दिसत नाही. गेल्या काही दिवसातल्या घटना पाहता हे व्यवस्थापन कुंभकर्णी झोपेत आहे की काय, अशीच शंका येते. ताडोबाच्या बफर झोनमध्ये फिरणाऱ्या वाघांची अवस्था सध्या भिकाऱ्यासारखी झाली आहे. भिकाऱ्याला दारावरून हाकलून दिले तर त्याला किमान दुसऱ्या दारावर जाऊन परत तरी भीक मागता येते पण, येथील मुक्या प्राण्यांना तोही हक्क नाही. काय हवे हे त्यांना सांगता येत नाही आणि ज्यांना कळायला हवे त्यांनी त्याकडे दुर्लक्षच केलेले आहे.

बंदे.. सिपाही!
सध्या मंदीच्या छायेत असलेल्या जगावर आणखी एक काळी छाया आहे ती दहशतवादाची. जी-२० परिषदेत मंदी आणि वाढता दहशतवाद यावर चर्चा होत आहेच. या दहशतवादातला परवलीचा शब्द आहे ‘तालिबान’. विशेष म्हणजे सोविएत युनियनविरोधात सर्वप्रथम हा भस्मासूर उभा करणाऱ्या अमेरिकेला आता त्याचा सामना करावा लागत आहेच पण दस्तुरखुद्द अमेरिकेतही जॉन वॉकर लिंड याच्या रुपाने निर्माण झालेल्या आणि सध्या २० वर्षांचा कारावास भोगत असलेल्या एका तालिबान्याभोवतालचे गूढ अद्याप ओसरलेले नाही. सोविएत फौजा अफगाणिस्तानातून परतू लागल्या तोपर्यंत म्हणजे १९८९ पर्यंत ‘तालिबान’चे नामोनिशाणही नव्हते. सोविएत फौजांनी अफगाणिस्तान सोडला तेव्हा देश आर्थिक संकटात होता. १० लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. लाखो लोक इराण आणि पाकिस्तानात निराश्रिताचे जिणे जगत होते. त्यात कित्येक अनाथ मुलांचाही भरणा होता. त्यांच्यात ‘बदले की आग’ धगधगत होती. त्यांच्या जीवावर काश्मीरचा ‘लढा’ रेटण्याचा व अफगाणिस्तानवर अंकुश ठेवण्याचा पाकिस्तानचा डाव होता. या निराश्रित मुलांच्या छावण्यांना भेट दिलेल्या ‘ह्यूमन राइट्स वॉच’च्या जेरी लेबर यांनी एका लेखात म्हटले होते की, ‘या हजारो मुलांना जीवनाचे गांभीर्यच जाणवू नये इतकी ती परिस्थितीने बधीर झाली होती. घरदार सोडून त्यांना सीमेवरील छावण्यांमध्ये जगावे लागत होते. जिहादचा नारा बुलंद होता आणि त्या मुशीत एक नवाच अफगाणी तरुण आकारत होता. जन्मापासूनच ही मुले अस्थिरता, दहशत आणि दमनाची शिकार होती. यातलीच अनेक मुले नंतर ‘तालिबानी’ झाली.’ मदरशात शिकणाऱ्या मुलांना अरबी भाषेत ‘तालिब’ म्हणतात. त्यांची संघटना म्हणून तिचे नाव पडले ‘तालिबान’. अस्थिर अनाथ मुलांमधून दहशतवादी घडणे शक्य आहे पण संपन्न अमेरिकेतील एका रोमन कॅथॅलिक घरातही जॉन वॉकर लिंड हा तालिबानी निर्माण व्हावा, ही गूढ बाब आहे. जॉनचे शिक्षण वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत अनेक अडथळे व आजारपण पार करत सुरू होते. आईवडिलांमधील मतभेदांची झळही तो सोसत होता. तो १८ वर्षांचा झाला तेव्हा त्या दोघांचा घटस्फोटही झाला. लहानपणापासून चर्चमध्ये जाणाऱ्या जॉनने म्हणे याच काळात ‘माल्कम एक्स’ हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या मनात इस्लामबद्दल कुतूहल निर्माण झाले. पुढे तो इस्लामी साहित्याने भारावला आणि १९९७ मध्ये त्याने इस्लामचा स्वीकार केला. मग अरबी भाषा शिकण्यासाठी तो येमेनमध्ये राहिला. पाकिस्तानी मदरशात त्याने इस्लामचे धर्मशिक्षणही घेतले. याच काळात तो स्वतला खुदा का बंदा मानू लागला होता. त्याच्या ईमेलमधील अमेरिका व एकूणच बिगरमुस्लिमांबद्दलची विखारी भाषा त्याच्या आप्तांना खटकू लागली होती. या वाटचालीत कट्टर तालिबानी झालेला जॉन अफगाणिस्तानात गेला. तिथे मजार ए शरीफजवळ २५ नोव्हेंबर २००१ ला झालेल्या चकमकीत सीआयएचा अधिकारी जॉनी माइक स्पॅन याची हत्या केल्यावर त्याला अटक झाली. या प्रकरणावरून सुरू झालेली उलटसुलट चर्चा शमलेली नाही. ‘गेटिंग अवे विथ मर्डर’ या पुस्तकात रिचर्ड मॅहोनी यांनी या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे तालिबानी जॉन लिंडप्रमाणेच त्यांच्या गोळ्यांना बळी पडलेला स्पॅनही लहानपणापासून स्वतला प्रभूचा बंदा शिपाई मानत होता! प्रत्यक्षात मात्र हे दोघे अन्य कुणाच्या हातातले कळसूत्री बाहुले तर ठरले नव्हते, हा प्रश्न गूढ वाढवितच आहे.
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com