Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

पुणे लोकसभा मतदारसंघातील इंदिरा कॉग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे शहराचा विकास नाही!
‘मनसे’च्या शिरोळेंचे कलमाडींवर टीकास्त्र

पुणे, २ एप्रिल/खास प्रतिनिधी
‘विकासाचे कितीही दावे करण्यात येत असले, तरी पुण्यातील सार्वजिक वाहतुकीसह पायाभूत सुविधांचे प्रश्न कायमच आहेत. राष्ट्रकुल युवा स्पर्धा म्हणजे संपूर्ण पुणे शहराचा विकास नव्हे,’ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रणजित शिरोळे यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्यावर आज टीकास्त्र डागले. त्याच त्या राजकारणाला कंटाळलेल्या पुणेकरांना आता बदल हवाय. त्यासाठी ‘मनसे’लाच पाठिंबा मिळेल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.

चणे खाऊ आनंदाने..
निवडून आल्यावर उमेदवारांकडून मतदारांकडे दुर्लक्ष करण्यात येते, मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार मतदारांच्या शोधात रानोमाळ भटकतात, ऊन असो की पाऊस, जेवण झालेले असो की उपास घडलेला असो. जुन्नर भागात असाच एक उमेदवार फिरत होता. भूक तर लागली होती, पण मतदार महत्त्वाचे असल्याने भुकेकडे लक्ष न देता त्याची भ्रमंती चालू होती. जेवणात वेळ घालवण्यापेक्षा मतदार शोधणे त्याला महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे त्याने खिशात ठेवलेले चणे-फुटाणे हळूहळू त्याच्या हातात येत होते आणि हातातून ते तोंडात जात होते.

खासदार लांडेवाडीचाच
शिरुरमध्ये लांडेवाडी विरुध्द लांडेवाडीची घमासान लढाई सुरु आहे. मंचरच्या लांडेवाडीचे ‘दादा’ आणि भोसरीच्या लांडेवाडीचे ‘शेठ’ एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून आहेत. नेते तयार आणि कार्यकर्ते फरार, असे काही नाही बर का! खासदार लांडेवाडीचाच होणार, एवढ मात्र खरं! दोन्ही पाटलांचे बरेच गुणधर्म जुळतात, दोघेही उद्योगपती आहेत, शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत आणि विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करुन मोठे झालेले आहेत. आधी दोघांचा चांगलाच दोस्ताना होता, असे म्हणतात. मात्र, राजकारणात मोठय़ा पाटलांशी दादांचे फाटले. मग, ही दोस्ती कशी ठेवायची, असा प्रश्न शेठला पडू लागल्याने चार हात लांब राहण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले.

अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला नकार
बालेवाडीत मतमोजणी घेण्याचा विचार
पुणे, २ एप्रिल / खास प्रतिनिधी
पुणे जिल्ह्य़ातील चारपैकी दोन लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी अन्नधान्य महामंडळाच्या (एफसीआय) गोदामात घेण्याचा जिल्हा निवडणूक कार्यालयाचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने अमान्य केला आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी ऐनवेळी नवी जागा शोधण्याची वेळ निवडणूक प्रशासनावर आली आहे.

एक लाख मतांच्या फरकाने निवडून येईन- कलमाडी
पुणे, २ एप्रिल/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत एक लाख मतांच्या फरकाने निवडून येईन, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांनी आज काँग्रेस भवनातील सभेत व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय आघाडीचे उमेदवार म्हणून पुण्यातून आज कलमाडी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेपूर्वी कलमाडी यांनी शहराचा मॅरेथॉन दौरा केला आणि अनेक व्यक्ती व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देत ते काँग्रेस भवनात आले. या धावत्या दौऱ्याची सांगता सभेने झाली.

कलमाडी यांच्यापेक्षा भाटिया श्रीमंत!
पुणे, २ एप्रिल / खास प्रतिनिधी

पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मतांची श्रीमंती कोणाकडे असेल हे मतदानानंतरच समजणार असले तरी संपत्तीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्यापेक्षा अपक्ष उमेदवार व माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी आघाडी घेतली आहे. भाटिया यांची संपत्ती कलमाडी यांच्यापेक्षा सुमारे दहा कोटींनी अधिक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना कलमाडी व भाटिया यांनी आपल्या संपत्तीचे विवरण पत्र जाहीर केले. हे दोन्ही उमेदवार कोटय़धीश आहेत.

सेन मुक्तता समितीच्यावतीने रॅली व जाहीर सभेचे आयोजन
पुणे, २ एप्रिल/प्रतिनिधी
बिनायक सेन यांच्या सुटकेसाठी रायपूर सत्याग्रहात सहभागी होणाऱ्या पुण्यातील स्वयंसेवकांना पाठिंबा देण्यासाठी डॉ. बिनायक सेन मुक्तता समितीच्या वतीने रॅली व जाहीर सभेचे आयोजन केले आहे. आदिवासीयांच्या मानवी हक्कांसाठी लढणारे डॉ. सेन यांना छत्तीसगढ सरकारने गेले २२ महिने तुरुंगात डांबले आहे. त्यांच्या सुटकेसाठी ६ एप्रिलला रायपूरला होणाऱ्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी शहरातून अभय शुक्ला, सुहास कोल्हेकर, मिलिंद चव्हाण व या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे

आंबेडकर विचारसरणीच्यावतीने विलास चौरे यांची उमेदवारी
पुणे, २ एप्रिल/प्रतिनिधी
आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने पुणे शहर भारिप बहुजन महासंघाचे माजी अध्यक्ष विलास चौरे यांची आगामी लोकसभा निवडणुकीतील आंबेडकर विचारसरणीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली, अशी माहिती लोकराज्य आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भिमाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सध्या झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या माध्यमातून झोपडपट्टीवासियांना पाचशे फुटाचे घर मिळावे म्हणून ते काम करत आहेत. तसेच येत्या चार एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती भिमाले यांनी दिली.

‘पुणे मतदारसंघामध्ये परिवर्तनाची गरज’
हडपसर, २ एप्रिल/वार्ताहर
एक कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेस सरकारने ५ कोटी तरुणांना मंदीच्या खाईत लोटले. त्यांना तुम्ही परत निवडून देणार का? आता पविर्तनाची गरज आहे. त्यात तुम्ही हडपसरवासीयांनी महत्वाची भूमिका निभवावी, असे प्रतिपादन माजी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी केले. शिरूर मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हडपसर येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन दिलीप कांबळे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी नगरसेवक महादेव बाबर, , योगेश टिळेकर, राधिका हरिश्चंद्रे आदी उपस्थित होते.

राजदचे बोईनवाड यांची पुण्यासाठी उमेदवारी
पुणे, २ एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुण्यातून राष्ट्रीय जनता दलाच्या वतीने अशोक बोईनवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. येत्या दोन दिवसांत ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील, अशी माहिती आज पक्षाच्या वतीने देण्यात आली. मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातून काही उमेदवार इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून त्यांची नावे लवकरच जाहीर होतील, असेही सांगण्यात आले.

ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे, २ एप्रिल/प्रतिनिधी

औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौकाकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. काल सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. दत्तात्रय काळुराम पवार (वय ४६, रा. निशिगंधा अपार्टमेंट, औंधगाव) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.